वंचितांचा व्यापक आधार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

saint crispins home

पुण्यातील एरंडवणे येथे ‘सेंट क्रिस्पीन्स या सामाजिक संस्थेकडून निराधार, बेघर, एकल पालक मुलींसाठी निवासी बालगृह प्रकल्प चालविला जातो.

वंचितांचा व्यापक आधार!

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. यावेळी‘सेंट क्रिस्पीन्स होम’ या ऐतिहासिक संस्थेविषयी...

पुण्यातील एरंडवणे येथे ‘सेंट क्रिस्पीन्स या सामाजिक संस्थेकडून निराधार, बेघर, एकल पालक मुलींसाठी निवासी बालगृह प्रकल्प चालविला जातो. संत क्रिस्पीन्स यांच्या नावानं ही संस्था पुण्यातील एरंडवणे येथे १९ व्या शतकापासून कार्यरत आहे. क्रिस्पीन यांचा जन्म १६६८ मध्ये इटलीच्या विटर्बो शहरात झाला. त्यांनी कॅपचिन ब्रदर होण्यापूर्वी एक संन्यासी म्हणून स्वयंपाकी, परिचारिका, न्हावी, माळी म्हणून काम केलं आणि गरिबांसाठी मदत मागितली. त्यांच्या कामांना दोन शतकांनंतर मान्यता मिळाली आणि पोप पायस सातवे यांनी १८०६ मध्ये त्यांना सेंट क्रिस्पीन म्हणून मान्यता दिली.

sakal social foundation

sakal social foundation

संस्थेच्या माध्यमातून सन १९०० पासून आजपर्यंत निराधार, बेघर, एकल पालक असलेल्या, बाल कल्याण समिती मार्फत व पोलिसांमार्फत दाखल केलेल्या वंचित व दुर्लक्षित अशा असंख्य मुलींचे चांगल्या रीतीने पुनर्वसन झाले आहे. आजमितीस संस्थेत १५० मुली आहेत. या मुली इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत संस्थेच्या आवारातच असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकतात आणि महाविद्यालयीन वाणिज्य, कला, होम सायन्स व बी.सी.ए. अशा अभ्यासक्रमांचे शिक्षण एसएनडीटी महाविद्यालयात घेत आहेत.

तसंच, काही मुली नर्सिंग कॉलेजमध्ये ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत आहेत. संस्थेमध्ये कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांची व शिक्षणाची सोय आहे. सेंट क्रिस्पीन्स होम संस्था सन १९५५ सालापासून अस्तित्वात असल्यामुळे आतापर्यंत या संस्थेतून हजारो मुलींनी लाभ घेतला असून, संस्थेच्या शाळेमध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाणही खूप मोठे आहे.

संस्थेत सन १९९५ मध्ये रिंकू - वय १० वर्षे, रचू - वय ८ वर्षे आणि सिंधू - वय ५ वर्षे या तीन बहिणी दाखल झाल्या(मूळ नावं बदलली आहेत). त्यांच्या आईचा आधीच मृत्यू झाला होता आणि वडील बांधकाम कंपनीत कामावर असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यामुळे या तीन बहिणी संस्थेत दाखल झाल्या. तिन्ही बहिणी समजूतदार आणि अभ्यासू वृत्तीच्या असल्याने त्यांनी संस्थेने दिलेल्या सर्व सुविधांचा योग्य उपयोग करून घेतला व स्वतःची प्रगती करून पूर्णपणे स्वावलंबी झाल्या.

तिन्ही बिहिणींचं शिक्षण संस्थेच्या आवारातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत झालं. रिंकू हिने संस्थेत राहून नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि स्वकर्तृत्वावर नोकरी मिळवली. संस्थेच्या मदतीने तिने भाडेतत्त्वावर घर घेतलं आणि धाकट्या दोन्ही बहिणींची जबाबदारी स्वीकारून तिघी एकत्र राहू लागल्या, कारण त्यांना एकत्र कुटुंब म्हणून राहायचं होतं.

रचू व सिंधू यादेखील आपलं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. रिंकू ही आता विवाहित असून, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयामध्ये नर्स म्हणून काम करत आहे, तसंच, रचू व सिंधूदेखील वैवाहिक जीवन सांभाळून एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. मागील अनेक वर्षांपासून संस्थेतून असंख्य मुलींचं संपूर्ण पुनवर्सनाचं कार्य सुरू असून, संस्थेतील मुली पोलिस, इंजिनिअर, शिक्षक, ब्यूटिशियन (बिझनेस वूमन) म्हणून सेवेत आहेत. पुण्यातील बहुतांश नामांकित दवाखान्यांत संस्थेच्या मुली नर्स म्हणून कार्यरत आहेत. तसंच, काही मुली देश-विदेशांत उच्चपदावर कार्य करीत आहेत.

संस्थेच्या निवासी प्रकल्पात असलेल्या सोयी-सुविधा

(१) निवासी बाल संगोपन सुविधा (RCCF)

(२) प्राथमिक शाळा (इयत्ता पहिली ते सातवी)

(३) माध्यमिक शाळा (इयत्ता आठवी-दहावी)

(४) एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र (सध्या फक्त टेलरिंग आणि संगणक)

(५) एक व्यक्तिमत्त्व विकास केंद्र, ज्यामध्ये समुपदेशन सुविधेसह औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षण कार्यक्रम आणि परिषदांचा समावेश आहे.

संस्थेला १५० मुलींच्या निवासी प्रकल्पासाठी मासिक किराणा साहित्य, भाजीपाला आणि फळं, शिक्षणासाठी पंधरा संगणक (फक्त CPU) संस्थेकडे Monitors आणि Keyboards उपलब्ध आहेत, त्यामुळे CPU ची मदत झाली तर संस्थेला पंधरा संगणक संचांचा सेट पूर्ण करता येईल. तसंच, मुलींच्या संरक्षणासाठी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, संस्थेच्या तीन एकर प्लॉटच्या भोवती कुंपण (आत्ताचं कुंपण हे जवळपास १८ वर्षं जुनं आणि कमी उंचीचं आहे.) मुलींसाठी शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकं इत्यादीसाठी संस्थेला समाजाच्या सर्व स्तरांतून सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत...

‘सेंट क्रिस्पीन्स या संस्थेमध्ये वास्तव्यास असलेल्या समाजातील निराधार व गरजू, अल्पवयीन मुलींच्या पालन-पोषणासाठी, शिक्षणासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेला मदतीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘सेंट क्रिस्पीन्स होम’ या संस्थेच्या उपक्रमांची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘ सेंट क्रिस्पीन्स’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. या अभियानाच्या माध्यमातून पाच हजार व त्यापुढील देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावं पुढील भागात प्रसिद्ध केली जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६.

Web Title: Team Sfa Writes Saint Crispins Home Sakal Social Foundation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SakalTeam SFAsaptarang
go to top