हव्यात सायकली आणि संगणक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal social foundation

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

हव्यात सायकली आणि संगणक...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. दर आठवड्याला एका उपक्रमाची माहिती आपण घेतो...

शाळांसाठी ‘अ‍ॅक्ट फॉर एज्युकेशन’

शाळांमध्ये अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे किंवा चांगल्या स्वच्छतागृहांच्या अभावामुळे प्रामुख्याने मुलींची मोठी गैरसोय होते. शाळांमध्ये चांगली स्वच्छतागृहं असणे गरजेचं आहे, त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, विद्यार्थ्यांनी डिजिटल साक्षर होणे आवश्यक आहे, हे ओळखून ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ या अभियानांतर्गत स्वच्छतागृह उभारणी, डिजिटल ई-लर्निंग सुविधा अशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागाच्या व सामूहिक मदतीच्या (क्राउड फंडिंगच्या) माध्यमातून ‘अ‍ॅक्ट फॉर एज्युकेशन’ उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत भोर तालुक्यातील तांभाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं असून, वेल्हे तालुक्यातील सरस्वती माध्यमिक विद्यालय येथे स्वच्छतागृहाचं काम सुरू आहे. तसंच, पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळांना ई-लर्निंग सेटअप उपलब्ध करून दिला आहे.

शाळेला व मुलींना मदतीची गरज...

औरंगाबादहून जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे जाताना अवघ्या वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर फुलंब्री तालुक्यात राजूर गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसलेलं पिंपळगाव गांगदेव हे एक टुमदार गाव आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून, शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. १९५९ मध्ये शाळेची स्थापना झाली असून, चालू शैक्षणिक वर्षात शाळेत एकूण ९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसंच, ४ शिक्षक कार्यरत आहेत.

पिंपळगावपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा असूनही गावातील शाळेची विद्यार्थी संख्या वाढतच आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने पालकांचा ओढा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आहे. शाळेत मुलांना खेळण्यासाठी मैदान, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, बोलक्या भिंती असलेल्या वर्गखोल्या, फुलांनी व झाडांनी बहरलेला शालेय परिसर, नियमित शालेय पोषण आहार, दर शनिवारी योगा ही शाळेची काही खास वैशिष्ट्यं आहेत. शाळेतील मुलांची शैक्षणिक प्रगती उल्लेखनीय आहे. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, प्रश्नमंजूषा, विज्ञान प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा यात मुलांची लक्षणीय प्रगती आहे.

शाळेत मुलांना मोबाईलद्वारे डिजिटल शिक्षण दिलं जातं. डिजिटल शिक्षणाद्वारे मुलांना अभ्यासक्रम समजण्यास अधिक सुलभ जातं. परंतु, शाळेत डिजिटल शिक्षणासाठी संगणक नाहीत. संगणकाद्वारे डिजिटल शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना एकाचवेळी प्रभावीपणे देता येतं. संगणक नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक युगाशी स्पर्धा करताना अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेला संगणक कक्षाची अत्यंत आवश्यकता असून, शाळेला संगणक देण्यासाठी समाजातील सर्वच स्तरांतून मदतीची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक कंपन्या सीएसआर निधीतून संगणक कक्ष उभारणीसाठी आर्थिक मदत करू शकतात, किंवा शाळेला संगणक देऊ शकतात.

शाळेत सुसज्ज वाचनालय असून, मुलांच्या गरजेनुसार व आवडीनुसार पुस्तकं उपलब्ध आहेत. मोबाईलद्वारे झूम मीटिंग घेऊन विशेष तासिका घेतल्या जातात. शाळेला संगणक उपलब्ध झाल्यास, प्रत्येक विद्यार्थी डिजिटल माध्यमातून अभ्यास करून या तंत्रज्ञानाच्या युगात जगाबरोबर स्पर्धा करण्यास सज्ज होईल. शाळेत शिक्षणासोबतच मुलांच्या आरोग्याकडेही विशेष लक्ष दिलं जातं. वैयक्तिक स्वच्छता, सकस आहार, व्यायाम, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो.

गरज सायकल बँक प्रकल्पाची...

पिंपळगाव गांगदेव इथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. पुढील माध्यमिकचं शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पाथ्री इथे जावं लागतं. परंतु गावाबाहेर शाळा असल्याने अनेक पालक आपल्या मुलींना पुढील शिक्षणासाठी पाठवत नाहीत. त्याचबरोबर जाण्या-येण्यासाठी मोठा प्रवास खर्च लागत असल्याने मुलींना शाळेसाठी सुमारे पाच ते सहा किमी पायपीट करावी लागते. परिणामी अनेक मुलींचं शिक्षणही पालकांनी बंद केलं आहे. शाळेत मुलींना जाण्या-येण्यासाठी गावात सायकल बँक प्रकल्प राबवणं गरजेचं असून, सायकल बँक प्रकल्पासाठी सुरुवातीला प्राथमिक स्तरावर पन्नास सायकलींची अत्यंत आवश्यकता आहे. तसंच, हळूहळू सायकलींची संख्या वाढविण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून मदतीची गरज आहे. सायकल बँक प्रकल्पासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक कंपन्या सीएसआर निधीतून सायकल बँक प्रकल्पासाठी आर्थिक मदत करू शकतात, किंवा सायकली देऊ शकतात.

अशी करा मदत

https://socialforaction.com/ ही लिंक ओपन करून, ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक ‘अ‍ॅक्ट फॉर एज्युकेशन’ व इतर अभियानाची माहिती घेऊ शकतात. तसंच ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट ‘सोशल फॉर अ‍ॅक्शन’ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल.

अधिक माहितीसाठी संपर्क - ८६०५०१७३६६