धडपड सर्वांगीण विकासासाठी...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.
Sarthk Seva Sangh
Sarthk Seva SanghSakal
Summary

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा ऑनलाइन वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. या वेळी पुणे जिल्ह्यातील ‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेविषयी...

देशातील कोणत्याही लहान-मोठ्या शहरात कायम दिसणारं एक चित्र म्हणजे, गजबजलेली असंख्य दुकानं, धावपळीत स्वतःच्याच विश्वात धावणारी माणसं, सतत वर्दळ असणारे रस्ते, चौक आणि या रस्त्यांवर व चौकाचौकांत भीक मागून किंवा भंगार व इतर वस्तू विकून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे लोक. रस्त्यांवरील कचराकुंड्या स्वतःच्याच हक्काच्या समजणारे आणि नानाविध व्यसनं जडलेले लोक, जे कचराकुंड्यांतील कागद, काच, पत्रा, प्लास्टिक पिशव्या, बॉटल व पुठ्ठे आदी गोळा करून नजीकच्या भंगाराच्या दुकानांत विकतात. अशा लोकांनी आपलं घर रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर किंवा कचराकुंड्यांच्या शेजारीच केलेलं असतं. अशा कुटुंबांतील महिला कडेवर लहान लेकरू घेऊन कचरा गोळा करण्याचं काम करतात, किंवा कुटुंबातील इतर लहान मुलांकडून करवून घेतात; पण आपल्याला राजरोसपणे दिसणाऱ्या अशा चित्रापेक्षा वास्तव खूप भयंकर आहे.

अशा स्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांमध्ये बदल करून, त्यांना सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं अवघड काम आहे; परंतु अशा कुटुंबांतील लहान मुलांना वेळीच या दलदलीतून बाहेर काढलं, तर नक्कीच काही अंशी अशा मुलांचा व पर्यायाने अशा कुटुंबांचा विकास होण्यास मदत होईल. यासाठी समाजातील सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येऊन अशा मुलांचं पुनर्वसन करण्यासाठी व मुलांना समाजोपयोगी बनविण्यासाठी समाजाभिमुख लोकचळवळ उभी करणं गरजेचं आहे. याच उद्देशाने ‘सार्थक सेवा संघ’ या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला. अहमदनगरचे रहिवासी व एका सेवाभावी संस्थेत बरीच वर्षं कार्यरत असलेले डॉ. अनिल कुडिया हे नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांना अशा वंचित मुलांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक समविचारी लोकांना सोबत घेऊन, वंचित घटकांतील मुलांना उत्तम स्वास्थ्य व शिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने ‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेची स्थापना केली.

‘सार्थक सेवा संघ’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला पुणे शहरातील मुख्य भागातील कचराकुंड्या, रस्त्यांच्या कडेलगतच्या वस्त्या, नशेची ठिकाणं, पुलांखालील वस्त्या, रेडलाइट एरिया अशा ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या विस्थापित व विस्कळीत कुटुंबांतील मुला-मुलींच्या पालकांशी मुलांच्या समस्येविषयी त्यांना जागरूक करण्यासाठी संवाद साधला. पालकांचा विश्वास संपादन करून मुलांना जवळील उद्यानांमध्ये व बागांमध्ये दिवसातून काही वेळासाठी एकत्र जमवून त्यांना खाऊ देणं, खेळ घेणं, गोष्टी सांगणं असे उपक्रम सुरू केले. यातील काही मुलांची रात्री डॉ. कुडिया यांनी स्वतःच्या घरी झोपण्याची व्यवस्था केली व त्यांना स्वच्छतेचे धडे देणं असं कार्य सुरुवातीच्या काळात सुरू केलं.

अशा मुलांचं पूर्ण पुनर्वसन करायचं असेल, तर त्यांना त्यांच्या रोजच्या वातावरणापासून दूर नेणं अत्यावश्यक होतं. म्हणून डॉ. कुडिया व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अशा मुलांच्या पालकांची समजूत काढून, काही मुलांना आधी हांडेवाडी, शेवाळेवाडी व नंतर उरुळीकांचन इथं काही काळ ठेवलं. परंतु मुलांच्या पुनर्वसनासाठी एक स्वतःचं व संस्थेच्या मालकीचं कायमस्वरूपी ठिकाण असणं आवश्यक होतं. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आंबळे गावी कुडिया कुटुंबाने ५० गुंठे जागा विकत घेऊन, वंचित घटकातील मुलांच्या निवासी प्रकल्पासाठी डॉ. अनिल कुडिया व भारती कुडिया यांनी संस्थेला दान केली.

आंबळे गावात डॉ. कुडिया यांनी व संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून वंचित मुलांसाठी घर व वसतिगृह सुरू केलं. ‘सार्थक सेवा संघ’ संस्थेच्या मदतीने कधीही शाळेची पायरी न चढलेली मुलं वयोगटाप्रमाणे गावातील शाळेत दाखल झाली व शिक्षण घेऊ लागली. संस्थेच्या वसतिगृहात मुलांना शालेय शिक्षण, वैद्यकीय सेवा, पोषक आहार, विविध प्रकारचे मैदानी खेळ, स्वच्छ व आरोग्यपूर्ण वातावरण, तसंच सर्व आवश्यक सोयी-सुविधा पुरविल्या जातात. सध्या वसतिगृहात ९४ मुलं-मुली वास्तव्यास आहेत.

मुलांना केवळ शालेय शिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसन होणार नाही हे ओळखून, तसंच मुलांना पूर्वी ज्या मुक्त व स्वछंदी आयुष्याची, नशेची सवय होती ती सोडवणं व त्यांना येथील नवीन वातावरणात सामावून घेणं कठीण आहे याची पूर्ण कल्पना असल्याने मुलांना इथं टिकवून ठेवण्यासाठी, त्यांना स्वबळावर उभं करण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील अन्य कलागुणांना प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. यासाठी मुलांना विविध खेळांची गोडी लावण्याचं काम संस्थेअंतर्गत केलं जातं. संस्थेच्या वसतिगृहातील मुलं उत्तम क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी व टेबल-टेनिस खेळतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू सन्मय परांजपे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘इंडिया खेलेगा’ या उपक्रमांतर्गत संस्थेच्या निवडक नऊ मुलांना टेबल टेनिसचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत संस्थेच्या मुलांनी विजेतेपद मिळवलं असून, फुटबॉल खेळात मुलं जिल्हा स्तरावर विशेष नैपुण्य दाखवत आहेत.

सर्व मुलांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेअंतगर्त सर्व मैदानी व इन-डोअर खेळांसाठी सुसज्ज क्रीडा ॲकॅडमी सुरू करण्याचा संस्थेचा निर्धार आहे, जिथं संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांवर राहणाऱ्या, व्यसनाधीन, गरजू, वंचित, निराधार, लालबत्ती भागातील मुला-मुलींसाठी मोफत क्रीडा प्रशिक्षण दिलं जाईल. ही मुलं तिथं शिकतीलही आणि शिकवतीलही. या क्रीडा ॲकॅडमीसाठी संस्थेला पुणे जिल्ह्यात जागेची गरज आहे.

तसंच, भविष्यात या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून मोठ्या मुलांना लहान-सहान बांधकाम, प्लॅस्टरिंग, छोटं-छोटं आर.सी.सी. काम, कटिंग, ग्राइंडिंग, वेल्डिंग, लांबी-पुट्टीसहित कलरिंग, प्लम्बिंगची कामं व शेतीची कामं अशी विविध कामं संस्थेत शिकविली जातात. आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातून मुलांनी शिकता-शिकताच संस्थेच्या वसतिगृहातील पूर्वीचं छोटं घर बांधून त्यावर पत्रे बसविले, तसंच फरशा बसवून रंगकामही केलं. याशिवाय वसतिगृहाच्या आवारात शेती केली आहे. खेळण्यासाठी प्रांगणात क्रिकेट पिच बांधून त्यासाठी रोलरही तयार केले आहेत. याचबरोबर वसतिगृहातील खोल्यांना व टॉयलेटना दारं बसवून पार्टिशन्स तयार केले आहेत आणि वसतिगृहाच्या संपूर्ण परिसराभोवती कंपाउंड बांधलं आहे. तसंच, वसतिगृहात शिवणकाम प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं असून, ८ शिवणयंत्रांवर मुला-मुलींना शिवणकामाचे प्राथमिक धडे दिले जात आहेत. वसतिगृहास मिळालेल्या जुन्या साड्या व कपड्यांपासून मुली कापडी पिशव्या, पंजाबी ड्रेसेस, घागरा-चोली, ब्लाऊज, पॅन्ट, शर्ट व फ्रॉक शिवतात. संस्थेतील २१ मुलं १० वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासोबतच सासवड व पुण्यात विविध ठिकाणी नोकरी करत आहेत.

संस्थेतील मुलांना भविष्यात समाजातील मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून त्यांना शालेय शिक्षणासोबतच गरजेपुरतं विविध लहान-सहान व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण संस्थेअंतर्गत दिलं जातच आहे; पण याव्यतिरिक्त मुलांना स्वबळावर उभं राहण्यासाठी तज्ज्ञांमार्फत पूर्णवेळ अभ्यासक्रमांचं व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न संस्थेमार्फत सुरू आहेत. या प्रशिक्षण केंद्रात बांधकाम, आरसीसी बांधकाम, वेल्डिंग, प्लंबिंग, फ्लायअॅश विटा बनवणं, इलेक्ट्रिक कामं, टेलरिंग, पेपर डिश बनवणं, बेकरी, गोपालन, डेअरी फार्म, ब्यूटी पार्लर, कॉम्प्युटर इत्यादी अभ्यासक्रमांचं मुक्तशाळा संकल्पनेअंतर्गत व्यवस्थित व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं नियोजन आहे.

समाजातील दानशूर लोकांच्या मदतीने संस्थेने मुला-मुलींसाठी आंबळे गावात स्वतंत्र वसतिगृह बांधलं आहे. वसतिगृहातील मुला-मुलींच्या दैंनदिन खर्चासाठी (कपडे, जेवण इत्यादी), मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहात लोखंडी कपाटं, बंक बेड, फर्निचर, खुर्च्या इत्यादींची आवश्यकता आहे. तसंच, संस्थेअंतर्गत वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांसाठी संस्थेला सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत...

‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेला कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान मिळत नाही. ही संस्था पूर्णपणे समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळावर उभी आहे. संस्थेला आपलं कार्य वाढविण्यासाठी सामूहिक मदतीची व निधीची गरज आहे. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘सार्थक सेवा संघ’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन, ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८०-जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क :- ८६०५०१७३६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com