उपेक्षितांचा भक्कम आधार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aambi Students

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.

उपेक्षितांचा भक्कम आधार...

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा वेबसाइट स्वरूपात नवा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला. या वेबसाइटला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यातूनच स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार यांना एकत्र आणण्यासाठी ‘सोशल फॉर अॅक्शन’ हा क्राउड फंडिंगसाठी नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ही संकल्पना उदयास आली. या उपक्रमात दर आठवड्याला एका स्वयंसेवी संस्थेची माहिती दिली जाते. नगर येथील ‘केअरिंग हॅन्डस्’ संस्थेविषयी...

अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील स्थलांतरित भिल्ल कुटुंबातील पूनम सोपल (नाव बदललं आहे), वय अवघं १४ वर्षं; ही शेतमजुरी, वीटभट्टी कामगार म्हणून काम करत होती. लाकूडफाटा गोळा करून आणणं, स्वयंपाक करणं आणि भावंडांना सांभाळणं, ही कामंही तिलाच करावी लागत. वडिलांनी दोन वर्षांपूर्वी दारूच्या नशेत आत्महत्या केली आणि सर्व जबाबदारी तिची आई आणि पूनमवर आली. ती आठवीत असताना तिची शाळा सुटली. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने शालेय साहित्य व गणवेश घेणं शक्यच नव्हतं, शिवाय शाळाही सुमारे सहा किलोमीटर लांब असल्याने, गावकुसाबाहेरील वस्तीतून येण्या-जाण्यासाठी कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं. यावर उपाय शोधण्यापेक्षा तिला घरीच ठेवून वर्ष-दोन वर्षांत लग्न उरकून टाकू, असं आईने ठरवलं.

‘केअरिंग हॅन्डस्’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पूनमशी व तिच्या आईशी संवाद साधून, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. तसंच, तिच्या आईला विश्वासात घेऊन, तिला पुढील शिक्षण घेऊ देण्यास तयार केलं. दोन दिवसांत संस्थेच्या माध्यमातून व देणगीदारांच्या मदतीने शालेय साहित्य, गणवेश, बूट-चप्पल, दप्तर आणि विशेष म्हणजे, नवीकोरी सायकल तिच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. तिच्या शाळेत संपर्क साधून, तिचं थकलेलं शालेय शुल्कदेखील भरण्यात आलं.

संस्थेच्या शिक्षिका तिचा नियमित अभ्यास घेऊ लागल्या. तिचं शिक्षण सुरू झाल्याचं पाहून तिची मैत्रीण वैष्णवी (नाव बदललं आहे) हीदेखील शाळेत जाण्यासाठी तयार झाली. आता एकाच सायकलवरून दोघी नियमित शाळेत जातात. आता त्या खेळ, वक्तृत्व आणि इतर कला-कौशल्यं आणि अभ्यासातही इतर मुला-मुलींची बरोबरी करू लागल्या आहेत. आता थांबायचं नाही, असं त्यांनी ठरवलं आहे. दोघीही वस्तीवरील इतर मुला-मुलींसाठी आदर्श बनल्या आहेत.

केअरिंग हॅन्डस् - एक आशेचा किरण

‘केअरिंग हॅन्डस्’ म्हणजे काळजी घेणारे हात; सात वर्षांपूर्वी अहमदनगर इथं भटक्या जाती-जमातींतील मुलांच्या संस्कारक्षम सर्वांगीण विकासाचं व पुनर्वसनाचं कार्य संस्थेने हाती घेतलं. पारधी, डोंबारी, भिल्ल, धनगर, कैकाडी, लमाण आणि कातकरी अशा भटक्या जमातींतील कुटुंबांना स्थैर्य व स्थिरता मिळवून देत त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची व जबाबदारीची एक नागरिक म्हणून जाणीव करून देण्याचा प्रयत्न संस्थेने केला. वाड्या-वस्त्यांवर एकूण ३५० हून अधिक कुटुंबांसमवेत संस्थेने विविध समाजविधायक उपक्रम राबविले. यामध्ये संस्थेकडून कार्य करत असताना मुख्यतः अंधश्रद्धानिर्मूलन - जनजागृती, आरोग्य तपासणी व स्वच्छता आणि प्रबोधन, याशिवाय युवकांना रोजगाराच्या संधी आणि बालकांना सुरक्षित वातावरणासहित संस्कारपूर्ण शिक्षण व मूल्यशिक्षण यांवर भर देण्यात आला. अहमदनगर शहराच्या वीस किलोमीटर परिसरातील भटक्या विमुक्त जाती-जमातींतील कुटुंबांतील मुलांसाठी व महिलांसाठी केअरिंग हॅन्डस् संस्थेचं कार्य चालतं. कुटुंबातील मुलांसाठी शिक्षण, तरुणांसाठी रोजगार व महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण असे उपक्रम संस्थेच्यावतीने राबविण्यात येतात.

संस्कार वर्ग :

वस्तीपातळीवर भटक्या-विमुक्त जमातींतील व स्थलांतरित कुटुंबांतील तीन वर्षं ते सहा वर्षं वयोगटांतील मुलांसाठी संस्कार वर्ग उपक्रम राबविला जातो. यामध्ये लहान मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी व त्यांना अक्षर ओळख होण्यासाठी व शिक्षणाची गोडी लागण्यासाठी वस्ती-वस्तीमध्ये संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून अशा मुलांना एकत्र केलं जातं आणि त्यांना स्वच्छता, खेळ व गप्पा-गाणी यांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं. अशा मुलांना संस्थेकडून पोषण आहार दिला जातो.

आजमितीस संस्कार वर्गात १८० मुलं शिक्षण घेत आहेत. वय वर्षं सहापुढील मुलांच्या पालकांना भेटून, पालकांचं समुपदेशन करून व त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊन, संस्थेच्या माध्यमातून अशा मुलांना स्थानिक शाळेत दाखल करण्यात येतं

तरुणांना रोजगार :

भटक्या विमुक्त जमातीतील व स्थलांतरित कुटुंबांतील तरुणांना आयुष्याच्या स्थिरतेसाठी परिसरातील हॉटेल्स व हॉस्पिटल्समध्ये संस्थेच्या माध्यमातून हाउसकीपिंग, वेटर, स्वयंपाकी अशा स्वरूपाचं काम मिळवून देण्यात येतं. अशा तरुणांना संबंधित आस्थापनांकडून प्रशिक्षण देण्यात येतं.

महिलांना व्यवसाय प्रशिक्षण :

भटक्या विमुक्त जमातीतील व स्थलांतरित कुटुंबांतील महिलांना ब्यूटिपार्लर, कापडी पिशव्या तयार करणं, शिवणकाम, फळ-भाजीविक्री, चहा स्टॉल अशा स्वरूपाचं व्यावसायिक प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिलं जातं.

आज समाजात अनेक नवीन सामाजिक प्रश्न आहेत. तसंच, समाजात विविध जुन्या समस्याही आहेत. कोणाचा जन्म कोणत्या वंशात, जातीत व परिस्थितीत कसा व्हावा हे आपल्या हातात नसतंच; पण जन्मानंतर योग्य आणि जगण्यास पूरक परिस्थिती निर्माण करणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन, सात दशकांपेक्षाही अधिक काळ लोटला; पण आज समाजात काही भटक्या जमातींतील कुटुंबांना अजूनही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिरता प्राप्त झालेली नाही. हा समाज शिक्षणापासून, आर्थिक साक्षरतेपासून व रोजगार आणि व्यवसायांच्या संधींपासून आजही वंचित व मागास आहे. परिणामी स्थलांतरित व भटक्या जमातींतील असंख्य कुटुंबं विकासाच्या दृष्टीने समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. या जमातींतील लोकांना त्यांचे मूलभूत हक्क प्राप्त झालेले नाहीत. दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि समाजातील इतर घटकांचं दुर्लक्ष या दुष्टचक्रात अनेक भटक्या जमाती आजही आपलं जीवन व्यतीत करीत आहेत. यातही या भटक्या जमातींतील मुलांची केवळ जन्माने लाभलेल्या जमातीच्या शिक्क्यामुळे दुरवस्था झालेली आहे.

‘केअरिंग हॅन्डस्’ ही संस्था नेमकं याच मुलांच्या जीवनात सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. संस्थेचा अहमदनगरसारख्या छोट्या नगरातून सुरू झालेला प्रवास आज पुण्यासारख्या महानगरापर्यंत येऊन पोहोचला आहे. संस्थेचे प्रमुख सुधीर नाईक यांच्या प्रयत्नाने व समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने संस्थेला पुण्यातील मावळ तालुक्यातील आंबी या गावात दोन एकर जागा मिळाली आहे. या जागेत संस्थेकडून ‘कलाश्रम प्रकल्प’च्या माध्यमातून निराश्रित व सामाजिक स्नेहापासून दुर्लक्षित राहिलेल्या मुलांच्या जीवनात शिक्षण आणि सुसंस्कारांचं प्रकाशपर्व सुरू करण्यासाठी निवासी वसतिगृह चालविण्यात येतं. सध्या या वसतिगृहात ४० मुलं असून मुलांची संख्या वाढत आहे. तसंच, संस्थेला किमान ६०० मुलांसाठी याच परिसरात पहिली ते दहावीपर्यंत शाळा सुरू करावयाची आहे. शाळा मान्यतेसाठी संस्थेकडून शासनास अर्ज केला आहे. तसंच, या वसतिगृहासाठी संस्थेला अंडरग्राउंड आरसीसी दोन लाख लिटर क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधायची आहे. त्याचबरोबर संस्थेला पाण्यासाठी एका बोअरवेलची गरज असून, मुलांचे कपडे स्वच्छ करण्यासाठी इंडस्ट्रिअल वॉशिंग मशिनचीही गरज आहे. अशा भटक्या विमुक्त व स्थलांतरित कुटुंबांतील विद्यार्थ्यांना व निराश्रित व सामाजिक स्नेहापासून दुर्लक्षित राहिलेल्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘केअरिंग हॅन्डस्’ संस्थेला आपल्या सर्वांच्या सामूहिक मदतीची गरज आहे.

कशी कराल मदत...

‘केअरिंग हॅन्डस्’ या स्वयंसेवी संस्थेला कोणतंही शासकीय अनुदान नाही. सकाळ माध्यम समूहाच्या ‘सोशल फॉर अॅक्शन’ या डिजिटल क्राउड फंडिंगच्या प्लॅटफॉर्मवर ‘केअरिंग हॅन्डस्’ या संस्थेच्या उपक्रमाची माहिती मिळेल. समाजातील दानशूर व्यक्ती, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या, सीएसआर कंपन्या व परदेशी-भारतीय नागरिक https://socialforaction.com/ या वेबसाइटला भेट देऊन, ‘केअरिंग हॅन्डस्’ या संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेऊन ‘डोनेट नाऊ’ या बटनवर क्लिक करून थेट वेबसाइटद्वारे देणगी देऊ शकतात. या क्राउड फंडिंगद्वारे देणगी देणाऱ्या प्रत्येक देणगीदारास देणगीची पावती व ८० जी हे प्राप्तिकरात ५० टक्के सवलतीचं प्रमाणपत्र मिळेल. या अभियानाच्या माध्यमातून पाच हजार व त्यापुढील देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावं पुढील भागात प्रसिद्ध केली जातील.

अधिक माहितीसाठी संपर्क : ८६०५०१७३६६

Web Title: Team Sfa Writes Social For Action Sakal Social Foundation Pjp78

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Team SFAsaptarang