कर्तव्यदक्ष अधिकारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tehsildar Vijay Talekar did work awareness about Corona rural areas panvel

कर्तव्यदक्ष अधिकारी!

काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच मुख्य उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि त्यातून लोकसेवा करता येऊ शकते. हे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत येतात. जनतेशी एकरूप होतात. विजय तळेकर हे असेच एक अधिकारी. तहसीलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या तळेकर यांच्याकडे चित्र बदलवण्याची ताकद आहे. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे तहसीलदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे पनवेलसारख्या सर्वात मोठ्या महसुली तालुक्याचे तहसीलदार म्हणून ते काम करीत आहेत. गेल्या वर्ष-दीड वर्षांमध्ये तळेकर यांनी आपल्या कार्यतत्परतेने त्याची चुणूक दाखवून दिली आहे.

कोरोना काळामध्ये ते पनवेलचे तहसीलदार झाले. मनपा क्षेत्रांमध्ये ज्याप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती, त्याप्रमाणे ग्रामीण पनवेलमध्येही कोविडचा प्रादुर्भाव झाला होता. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः जनजागृती केली. सार्वजनिक ठिकाण गर्दी होणार नाही, सामाजिक अंतर पाळले जावे या सह इतर गोष्टींची त्यांनी खबरदारी घेतली.

कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीही तालुक्याचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. कळंबोली येथे एफसीआय गोदामात सिडकोने जम्बो कोविड सेंटर उभारले. संबंधित जागा आणि गोदाम ताब्यात घेण्याची प्रक्रिया तहसीलदार विजय तळेकर यांनी अत्यंत जलद गतीने केली. त्यानंतर येथे मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले. तालुका प्रशासनाने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केले. कोरोनाबरोबरच त्यांनी तहसीलदार म्हणून कार्यभार घेतल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली. आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना केल्या.

विजय तळेकर हे तहसीलदार म्हणून आल्यानंतर तहसील कार्यालयातील कामाचा उरक वाढला. सर्वसामान्यांची बऱ्याच अंशी गैरसोय टळली. त्यांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात निपटारा होऊ लागला. येणाऱ्या नागरिकांना तहसीलदारांची सहज भेट होत असल्याने ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन होऊ लागले. जातीचे, त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे दाखले त्यांना त्याच ठिकाणी उपलब्ध व्हावेत याकरता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारची शिबिरं घेऊन हजारो दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याव्यतिरिक्त दुर्गम भागातील आदिवासी वाड्यातील नागरिकांनासुद्धा आवश्यक दाखले सहज उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार विजय तळेकर यांनी पुढाकार घेतला. स्वातंत्र्याला पाऊणशे वर्षे झाली तरी कित्येक आदिवासी वाड्यांवर मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. या सर्वांना पायाभूत सुविधा मिळाव्यात याकरता तळेकर यांनी सर्व शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून सुविधा पोचण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या सहकार्याने दोन आदिवासी वाड्यांवर रस्ता नेण्याचे काम सुरू झाले आहे. चौकटीच्या बाहेर जाऊन सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम तहसीलदार विजय तळेकर करीत आहेत.

पनवेल तालुक्यातील गरजवंतांना पनवेल तहसीलदारांचा आधार वाटू लागला आहे. तालुक्यातील शेवटच्या निराधार गरजू व गरीब व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहचवण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. आजपर्यंत संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पाच हजारांच्यावर नागरिक लाभ घेत आहेत. महसूल विभागात काम करत असताना उत्तम प्रशासकीय कामाच्या अनुभवाच्या जोरावर व संवेदनशील राहून समाजातील दुर्लक्षित तसेच गरजू व्यक्तींच्या मदतीस नेहमी धावून जाणारे पनवेलचे तहसीलदार तळेकर अनेक निराधारांना आधार वाटत आहेत. समाजातील असे अनेक गरजू शासकीय योजनेचा लाभ घेत असतात. तहसील कार्यालयात संपर्क करून स्वतः अर्ज करत असतात; परंतु अशा लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.

पनवेल तालुक्यातील लोणीवली येथील कातकरी समाजाचा ४५ वर्षीय मनोहर देहू कातकरी. अनाथ असलेला मनोहर जन्मापासून मूकबधिर असल्याने हाताला येईल ते काम करून कसाबसा पोटाची खळगी भरत होता. राहायला नीट घर नसल्याने तो दिवसभरात कमावलेले पैसे दगडाखाली लपवून ठेवत असे. पण काही वेळात ते पैसे चोरीला जात असल्याने त्याच्यावर उपाशी राहायची वेळ येत असे. ही बाब लोणीवली येथील सील आश्रमाने तहसीलदार विजय तळेकर यांच्या कानावर घातली. त्यानंतर लगेच तहसीलदार तळेकर लोणीवली येथे त्या व्यक्तीला भेटायला गेले. परिस्थिती बघून तहसीलदार तळेकर यांनी लगेचच यंत्रणा कामाला लावली. त्या व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिले. अलिबाग येथे मनोहर कातकरी याला पाठवून वैद्यकीय तपासणी करून अपंगांचा दाखला मिळवून दिला. तळेकर नुसते यावर न थांबता संजय गांधी योजनेच्या बैठकीत मनोहर कातकरी यांना दरमहा आर्थिक मदत सुरू करून दिली.

सारसई येथे एक वृद्ध महिला फाटी विकून दोन नातवंडांचं पालनपोषण करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार तळेकर यांना प्राप्त झाली. या विषयाची शहानिशा करण्यासाठी तळेकर सारसई या गावात गेले. तिथे त्या बयो सोमा वघे वृद्ध महिलेला भेटल्यावर खरी परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. त्या वृद्ध महिलेच्या मुलाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या विधवा पत्नीने दुसरे लग्न केले; परंतु दुसरं लग्न केल्यावर दोन्ही लहान मुलांना तिच्या सासूकडे सोडून गेली. त्या वृद्ध महिलेला कोणी नातेवाईक नसल्याने दोन्ही नातवंडांची जबाबदारी तिच्यावर आली. वयोवृद्ध असूनसुद्धा ती महिला जंगलातून फाटी जमा करून रसायनी रेल्वेस्थानकाजवळ विकून दिवसाला तीस ते चाळीस रुपये कमवत होती. त्यातून नातवंडांना थोडं फार अन्न खाऊ घालत होती. तहसीलदार तळेकर यांनी महिला बाल विकास कमिटीच्या माध्यमातून दोन्ही लहान मुलांना पोयनाड येथील एसओई या आश्रमात पाठवले. आता ती दोन्ही लहान मुले इंग्रजी माध्यमातील शाळेत शिक्षण घेत असून, संजय गांधी योजनेच्या माध्यमातून बयो सोमा वघे या वृद्ध महिलेस दरमहा एक हजार रुपये आर्थिक मदत तिच्या बँक खात्यात जमा होत आहे. तहसीलदार विजय तळेकर यांची कार्यतत्परता व घडवलेल्या माणुसकीच्या दर्शनाने पनवेल तालुक्यातील निराधारांना एक प्रकारे आधार मिळाला आहे.

श्रावण बाळ योजनासुद्धा अत्यंत प्रभावी पद्धतीने ते राबवत आहेत. सर्वसामान्य शिधापत्रिका धारकांना रेशन वेळच्यावेळी मिळाले पाहिजे. त्याचबरोबर त्यांना त्यांचा हक्क प्राप्त व्हावा या अनुषंगाने तहसीलदारांचे विशेष लक्ष असते. निवडणूक यंत्रणा अत्यंत सक्षम आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यातसुद्धा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांना मोठ्या प्रमाणात महसूल जमा करण्यामध्ये यश मिळाले आहे. महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी तहसीलदार म्हणून त्यांचे काम उजवे ठरले आहे. बेकायदेशीर रेती आणि माती उत्खनन करणाऱ्यांना तहसीलदारांनी वठणीवर आणले आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तपासणी केंद्र सुरू करून बेकायदेशीर रेती उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यात विजय तळेकर यांना यश मिळाले आहे.

कोरोना काळामध्ये गर्दी जमवणाऱ्या मंगल कार्यालय मालकांनासुद्धा दंडात्मक कारवाई करून, शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगई त्यांनी केली नाही.

अधोरेखित कार्य

  • जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर येथे कार्यरत असताना पहिल्या लाटेमध्ये परदेशी अडकलेल्या विद्यार्थी / नागरिक यांना भारतात परत आणण्यासाठी ‘वंदे भारत अभियाना’त सक्रिय सहभाग.

  • पनवेलचे महानगर पालिकेबाहेरील क्षेत्रामध्ये उलवे, वहाळ, विचुंबे, देवद, सुकापूरची लोकसंख्या मोठी असूनही एकही कोविड हॉस्पिटल नव्हते. ही बाब लक्षात घेऊन खाजगी हॉस्पिटल्सच्या साह्याने हॉस्पिटलची उभारणी केली.

  • ऑक्सिजन तुटवड्याच्या काळात ऑक्सिजन कंपनी -रिफिलर सेंटर -हॉस्पिटल असा पुरवठा सुरळीत ठेवला.

  • पनवेल तालुक्यामधील १३ अनाथ आश्रमांना तीन महिने धान्य पुरवठा केला.

  • रेड लाईट भागातील महिला, सिग्नलवरील भिक्षेकरी यांना अन्नधान्य पुरवठा केला.

  • तिसऱ्या लाटेमध्ये कोविड अनुरूप वर्तनाचा भंग करणाऱ्या हॉटेल्स /रिसॉर्ट /मंगल कार्यालये आस्थापनेवर कडक कारवाई केली.

  • आदिवासी वाडे-पाडे दुर्गम भाग येथे ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ या द्वारे लसीकरणाचे प्रमाण वाढवले.

पनवेल तहसीलमध्ये येणाऱ्या उलवे, करंजाडे, नैना क्षेत्रासह ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे काम तहसीलदार विजय तळेकर यांनी केले. येथील रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न केले. लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी स्वतःहून लक्ष घातले. तालुक्यातील वृद्धाश्रम आणि तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये कोविड लसीकरण करून घेण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला. स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले.पनवेल तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

- विजय तळेकर

Web Title: Tehsildar Vijay Talekar Did Work Awareness About Corona Rural Areas Panvel

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..