esakal | स्मरण : निरलस समाजसेवी अरणकर डॉक्टर स्मरण
sakal

बोलून बातमी शोधा

स्मरण : निरलस समाजसेवी अरणकर डॉक्टर स्मरण

स्मरण : निरलस समाजसेवी अरणकर डॉक्टर स्मरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टेंभुर्णीसारख्या ग्रामीण भागात अद्ययावत रुग्णालय उभे करून हजारो रुग्ण बरे करणारे डॉ. मधुकर ज्ञानेश्वर कुलकर्णी तथा डॉ. एम. डी. कुलकर्णी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून देणारा हा लेख.

संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पावन भूमीत म्हणजे तीर्थक्षेत्र अरणमध्ये १९३४ साली ह.भ.प. ज्ञानेश्वर बाबुराव कुलकर्णी व सौ. जानकी (अक्का) ज्ञानेश्वर कुलकर्णी यांचे पोटी जन्माला आलेल्या मधुकर कुलकर्णी अर्थात डॉ. एम. डी. कुलकर्णी यांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी मोडनिंब येथील उमा विद्यालयात मॅट्रीकपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथे बीएएमएसची पदवी प्राप्त केली. उभारीच्या काळात त्यांनी गंभीर किडनीच्या विकारावर आयुर्वेदाच्या उपचाराने आजारावर मात केली. वैद्यकीय सेवेच्या वस्तूची पेटी एकशे पन्नास रुपयाला दुकानदाराकडून उधार घेतली आणि टेंभुर्णी येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनंदाकाकू यांनी त्यांच्या कुडाच्या घरात राहून वैद्यकीय सेवेत सहकार्य केले.

दांडगी जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती आणि स्वकर्तुत्वावर त्यांनी टेंभुर्णीत पहिले हॉस्पिटल उभे केले. खेड्या-पाड्यात कुठेही, कधीही, कोणत्याही वेळी रात्री- अपरात्री निरोप आला की, रुग्ण तपासणीकरीता जायचे. अगदी चोवीस तास रुग्णसेवा. प्रसंगी नदीतून होडीतून प्रवास, प्रचंड पावसात ओढ्यातून दोराच्या साह्याने ओढा पार करून अत्यवस्थ व असाहाय्य महिलांची प्रसूती व्यवस्थितपणे केल्याची उदाहरणे आहेत. टेंभुर्णी पंचक्रोशीतील बहुसंख्य कुटुंबाचे हे फॅमिली डॉक्‍टरच नव्हे तर मित्र, सल्लागार व मार्गदर्शक झाले. टेंभुर्णी परिसरात ‘अरणकर डॉक्‍टर’ म्हणून त्यांची ख्याती होती. रोग निदान करण्यामध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता. कितीही दुर्धर आजार ते अगदी सहजपणे बरे करत होते. अत्यंत कमी फीमध्ये लोकांना खूप चांगले उपचार त्यांनी दिले. फिरता दवाखाना म्हणून एक मेटॅडोर विकत घेत गावोगावी रुग्ण तपासणी सुरू केली. डॉक्‍टरांनी जन्मभर गरजूंना पन्नासहून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा दिल्याने ते खऱ्या अर्थाने या भागाचे देवदूतच होते.

डॉक्‍टरांना वैद्यकीय सेवेसोबत साहित्य, संस्कृती, कला यामध्येही विशेष अभिरुची होती. त्यांनी नाटकाच्या नंदीला पेटीवर गायलेले बहु असोत सुंदर संपन्न... हे महाराष्ट्र गीत आजही अनेकांच्या स्मरणात आहे. कुटुंबाचे नाव कुठेही कमी न होऊ देता आयुष्यात यशस्वीपणे प्रगती करावी अशी त्यांची शिकवण देत त्यांनी डॉ. अजित कुलकर्णी, अतुलचंद्र कुलकर्णी (अतिरिक्त पोलिस महासंचालक सीआयडी पुणे), डॉ. विवेक कुलकर्णी यांना उत्तम व उच्च दर्जाचे शिक्षण देऊन त्यांची प्रगती साधली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते लहानपणापासून खंदे कार्यकर्ते होते. टेंभुर्णीचे संघचालक होते. डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेतून गोरगरिबांना मोफत उपचार, गरजूंना मदत, कित्येकांना नोकरी व व्यवसायासाठी मदत करत स्वतःच्या पायावर उभे केले. स्व.अटल बिहारी वाजपेयी यांनी टेंभुर्णी येथील डॉक्‍टरांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तत्कालीन जनसंघाचे माढा तालुक्‍याचे नेते कै. विष्णुपंत दादा बेंबळकर तसेच श्री भैय्यासाहेब केळकर, गौरीहर स्वामी, गौतम भाऊ कोठारी, गोरख मोहिते, डॉ. भालचंद्र जोशी (वैराग), डॉ. श्रीखंडे (पंढरपूर), डॉ. हासेगावकर (बार्शी) हे त्यांचे घनिष्ठ मित्र होते.

अरण मध्ये संत सावतामाळी महाराज यांच्या संजीवन समाधी जीर्णोद्धार समितीचे खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले. कुटुंबात अविरतपणे चालू असलेली एकनाथ पालखीची सेवा त्यांनी कधीही चुकवली नाही. डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूरच्या स्थापनेत त्यांचे सक्रीय योगदान होते. शेवटी पांडुरंगाच्या या निस्सीम भक्ताला इंद्रायणीने आपल्या उदरात सामावून घेतले. आज जरी डॉक्‍टर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणी कार्य पुढील कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

-ॲड. आनंद कुलकर्णी, अरण, ता. माढा, मो. ९२८४१०१९७३

loading image
go to top