

विष्णूचे एकूण किती अवतार आहेत? ‘दहा’ असंच बहुतेकांचं यावर उत्तर असतं : मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की.
- विवेक देबरॉय
हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जुळे दैत्य होते. सध्याच्या काळात आपण ज्या वेळी जुळ्यांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की, ज्याचा जन्म प्रथम होतो, तो मोठा असतो. मात्र, आपल्या प्राचीन ग्रंथांनुसार, गर्भात जो जीव प्रथम निर्माण झाला आणि नंतर जन्माला आला, तो मोठा असतो.
अवतार या शब्दाचा अर्थ पृथ्वीवर अवतीर्ण होणं. विष्णूचे एकूण किती अवतार आहेत? ‘दहा’ असंच बहुतेकांचं यावर उत्तर असतं : मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. यांपैकी पहिले नऊ अवतार भूतकाळात होऊन गेले आहेत.
कल्की हा अवतार भविष्यात होणार आहे. ‘दहा’ हे उत्तर तसं चुकीचं नाही. जयदेवांच्या ‘गीतगोविंदा’तील प्रसिद्ध ‘दशावतारस्तोत्रा’त दहा अवतारांचा उल्लेख आहे. अनेकांना हे माहीत नसेल की, ‘दशावतारस्तोत्रा’तल्या दहा अवतारांमध्ये कृष्णाचा समावेश नाही.
कृष्णाऐवजी ‘बलराम’ हा अवतार त्यात सांगण्यात आला आहे. वैष्णव धर्माच्या काही आवृत्त्यांमध्ये कृष्ण हा, अवतारसंकल्पनेच्याही पलीकडे असणारा सर्वोच्च आहे. त्यामुळे ‘विष्णूचे अवतार किती’ या प्रश्नाचं खरं उत्तर त्या त्या प्राचीन ग्रंथातील माहितीवर अवलंबून आहे.
मी यापूर्वीही उल्लेख केला आहे की, वैष्णव धर्मातील अनेक संकल्पना भागवतपुराणावर आधारित आहेत. भागवतपुराणात वर्णन केल्यानुसार, सुतांनी ऋषींना विष्णूचे पुढीलप्रमाणे अवतार सांगितले आहेत :
१) कुमार, ज्यांनी ब्रह्मचर्याचा कधीही त्याग केला नाही आणि कायम तपस्येत मग्न राहिले. कुमार म्हणजे किशोरवयीन आणि हे चार ऋषी आजन्म किशोरवयीनच होते. सनक, सानंद, सनातन आणि सनत्कुमार अशी त्यांची नावं असून हे सर्व ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते.
हे ऋषी संख्येनं चार असल्याचा उल्लेख भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायातील सहाव्या श्र्लोकातही आहे. २) पृथ्वी जेव्हा रसातळाला जात होती, त्या वेळी रानडुकराच्या रूपात विष्णूनं वराहावतार धारण केला. एकूण सात पाताळलोक आहेत : अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तलातळ, महातळ आणि पाताळ. या सर्वांचा सर्वसाधारणपणे ‘पाताळ’ असाच उल्लेख केला जातो.
आख्यायिकेनुसार, एक डोळा सुवर्णाचा असलेल्या हिरण्याक्ष या दैत्यानं पृथ्वी आणि वेद पाताळात पळवून नेले नकुल आणि सहदेव हेदेखील जुळेच होते. पांडव प्रवास करत असताना सहदेवच का यज्ञाग्नी सांभाळत असे?
आपण जुळ्यांकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो, त्यातच याचं उत्तर सामावलेलं आहे. त्यामुळेच, काही ग्रंथ म्हणतात की हिरण्याक्ष हा मोठा होता, तर काहींनुसार हिरण्यकश्यपू मोठा होता. ३) देवर्षी नारद, ज्यांनी ‘सात्वततंत्र’ नावाच्या ग्रंथाचं संकलन केलं. अनेकांनी ‘सात्वततंत्र’ हे नाव कधी ऐकलं नसेल. हाच ग्रंथ ‘सात्वतसंहिता’ किंवा ‘पंचरत्न-आगम’ म्हणूनही ओळखला जातो. ‘सात्वत’ म्हणजे कृष्णाची पूजा करणारे.
हा ग्रंथ त्यांच्याबद्दलच आहे. ४) नर आणि नारायण हे ऋषी. हे दोघं धर्म आणि दक्षकन्या मूर्ती यांची मुलं होती. महाभारताच्या किंवा पुराणांच्या पठणाची सुरुवात करताना नर आणि नारायण यांना आवाहन केलं जातं. ५) सांख्य तत्त्वज्ञानाचे उद्गाते कपिलमुनी.
कपिलमुनींनी आपला शिष्य असुरी याला सांख्यदर्शन शिकवलं, असा भागवतपुराणात उल्लेख आहे. ६) अनसूया ही अत्री ऋषींची पत्नी होती. अत्री आणि अनसूया यांच्या पोटीच या अवताराचा जन्म झाला आणि त्यानं अलर्क, प्रल्हाद आणि इतरांना ज्ञानदान केलं.
अत्री आणि अनसूया यांना खरं तर तीन मुलं होती. विष्णूचा अवतार दत्तात्रेय, शिवाचं रूप असलेले दुर्वास आणि ब्रह्माचा अवतार असलेले सोम. दत्तात्रयाच्या रूपातून विष्णूनं काशीचा राजा अलर्क आणि हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद यांना शिकवलं.
७) यज्ञ हा आकुती आणि रुची प्रजापती यांचा पुत्र होता. स्वयंभूव मन्वंतराच्या काळात हा अवतार झाला होता, असं भागवतपुराणात म्हटलेलं आहे. सध्या आपण सातव्या, म्हणजे वैवस्वत मन्वंतरात आहोत, असं मी पूर्वी सांगितलेलं आहे.
स्वयंभूव मन्वंतर हे पहिलं मन्वंतर होतं. मी आधी सांगितलं त्यानुसार, प्रत्येक मन्वंतरात देव, ऋषी आणि इंद्रपद हे बदलत असतात. उदाहरणार्थ : इंद्र ही देवांच्या राजाला मिळालेली उपाधी आहे, तर सध्याच्या वैवस्वत मन्वंतरात इंद्र हा पुरंदर आहे.
त्याचप्रमाणे, स्वयंभूव मन्वंतरात इंद्र ही उपाधी विष्णूचा अवतार असलेल्या यज्ञाकडे होती. ८) राजा नाभी आणि राणी मेरू यांचा पुत्र उरुक्रमा. हाच पुत्र ऋषभ किंवा आदिनाथ म्हणूनही ओळखला जातो. ९) पृथ्वीवरील पहिला राजा असलेला पृथू. संस्कृत भाषेत राजा या शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत. नृप, म्हणजे नरांचा अधिपती, हा त्यांपैकीच एक अर्थ आहे.
राजन म्हणजे आपल्या जनतेला समाधान देणारा राजा. पृथू हा असा पहिला राजन होता. (राजा हा शब्दच ‘राजन’पासून तयार झालेला आहे). पृथूनं पृथ्वीचं दोहन केलं, पर्वत फोडून भूमी समतल केली, नगरं वसवली आणि शेतीसाठी नियम आखून दिले. त्यानं मूल्यांचं संरक्षण केलं आणि दुष्टांना शासन केलं. पृथ्वी ही त्याची कन्या झाली आणि म्हणूनच ती ‘पृथ्वी’ किंवा ‘पृथिवी’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
१०) वैवस्वत मन्वंतराच्या आधी असलेल्या चक्षुषा मन्वंतराच्या काळात महाप्रलय आला होता. विष्णूनं मीन किंवा मत्स्यरूप धारण करत वैवस्वत मनूला जहाज बनवण्यास भाग पाडलं आणि त्याचे प्राण वाचवले. तुम्हाला यात विरोधाभास वाटतो आहे का? मी पुन्हा सांगतो, त्यानं चक्षुषा मन्वंतराच्या काळात वैवस्वत मनूला वाचवलं.
महाप्रलय चक्षुषा मन्वंतराच्या अखेरीस, वैवस्वत मन्वंतर सुरू होण्याच्या आधी आला होता. ११) हा अवतार आपल्या सर्वांना परिचित आहे. समुद्रमंथनाच्या वेळी, विष्णूनं कूर्मावतार (कासव) धारण करत आपल्या पाठीवर मंदारपर्वत तोलून धरला होता. १२) समुद्रमंथनातून केवळ अमृतच नव्हे तर, इतरही अनेक रत्ने बाहेर आली होती.
देवांचा वैद्य असलेला धन्वंतरी आपल्या हातात अमृतकुंभ घेऊन समुद्रातून वर आला. धन्वंतरी हाच बारावा अवतार आहे. १३) समुद्रमंथन करून अमृत बाहेर काढण्यासाठी देवांनी आणि असुरांनी एकमेकांना सहकार्य केलं होतं.
मात्र, असुरांना अमृतपानापासून दूर ठेवत ते देवांना कुणी दिलं? आकर्षण आणि भ्रम निर्माण करणाऱ्या मोहिनी या तेराव्या अवतारातील हा विष्णूच होता. १४) नरसिंह अथवा नृसिंहावतार. अर्धं शरीर मनुष्याचं आणि अर्धं सिंहाचं असलेल्या या अवतारात विष्णूनं हिरण्यकश्यपूला फाडलं आणि आपला भक्त प्रल्हाद याचं रक्षण केलं.
माझी यादी अद्याप पूर्ण झालेली नाही. पुढील सदरात ती मी पूर्ण करेन. मी आतापर्यंत दिलेल्या यादीतील अनेक नावं अनेकांना अपरिचित असतील, याची मला खात्री आहे!
(अनुवाद : सारंग खानापूरकर)
(लेखक हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष असून पुराणे आणि वेद, तसंच भारतीय संस्कृतीबद्दल त्यांचा अभ्यास आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.