मुघल संस्कृतीची साक्ष

एका वेगळ्या धाटणीचा, अजूनही भारतीय पर्यटकांमध्ये फारसा परिचित नसलेला आणि सौंदर्याने नटलेला एक वेगळाच देश म्हणजे उझबेकिस्तान!
uzbekistan country
uzbekistan countrysakal

- विशाखा बाग

सौंदर्याने नटलेला; पण पर्यटकांमध्ये फारसा परिचित नसलेला उझबेकिस्तान देश लालबहादूर शास्त्री यांच्यामुळे भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडा मोठ्या असलेल्या उझबेकिस्तानमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. आजूबाजूला संपूर्ण बर्फाच्छादित डोंगर आणि समोर शांत स्वच्छ तलावातील पाणी... अजून काय लागतं आपल्याला मनःशांतीसाठी? ऐतिहासिक घटनांबरोबरच मुघल संस्कृतीची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती असं सर्व काही इथे बघायला मिळतं...

उझबेकिस्तानच्या या ट्रीपमध्ये लालबहादूर शास्त्री जिथे अनंतात विलीन झाले ते हॉटेल आणि त्याचबरोबर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथील सरकारने उभा केलेला पुतळा हे दोन्ही पाहण्याची संधी मिळाली. पर्यटनाबरोबरच शास्त्रींबद्दलचा अभिमान आणि आदर पुन्हा एकदा अनुभवयास मिळाला. शहरात मध्यवर्ती ठिकाणी हा पुतळा असल्यामुळे भेट देण्यास सोपा आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला छोटी बाग आहे आणि या रस्त्यालासुद्धा लालबहादूर शास्त्रींचं नाव देण्यात आलेलं आहे.

आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडा मोठ्या असलेल्या उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद या राजधानीशिवाय समरकंद, बुखारा आणि फरगाना व्हॅली यांसारखी महत्त्वाची गावं बघण्यासारखी आहेत. त्यामध्ये चार्वाक तलाव, चिमग्यान हा बर्फाच्छादित डोंगर, सुंदर कलाकुसरीच्या वस्तूंनी, खाद्यपदार्थांनी, फळांनी आणि मसाल्यांनी भरलेले स्थानिक बाजार आणि मुघल संस्कृतीची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती असं सर्व काही बघायला मिळतं. ऐतिहासिक घटनांबरोबर पुरातन संस्कृतीची साक्ष आणि आधुनिकतेचा साक्षात्कार असे सर्व काही तुम्हाला इथे बघायला मिळेल.

ताश्कंद विमानतळावरून उतरून हॉटेलमध्ये जाईपर्यंत जेवढी गावं बघितली ती नक्कीच आवडण्यासारखी होती. मोठे रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक, ठिकठिकाणी बागा, भव्य इमारती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सगळं ताश्कंदमध्ये बघायला मिळत होतं. अतिशय पुरातन असा वाहतुकीचा आणि व्यापाराचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा सिल्क रोड ताश्कंदजवळूनच जात होता आणि त्यामुळेच हजारो वर्षांपासून जागतिक पटलावर ताश्कंदचे महत्त्व आहेच.

इस्लामिक आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या उझबेकिस्तानमध्ये त्याची साक्ष देणाऱ्या आणि सुंदर कलाकुसर असलेल्या मोठ्या मशिदी अन् मदरसे बघायला मिळतात. ताश्कंदमध्ये हजरत इमाम कॉम्प्लेक्स बघण्यासाठी आम्ही गेलो. इस्लाम धर्माबरोबरच बाकीच्यांनासुद्धा इथे येण्यास परवानगी आहे. या कॉम्प्लेक्समध्ये दोन-तीन छोट्या मशिदी आणि मदरसे बघायला मिळाले.

त्याचबरोबर संपूर्ण संगमरवरी बांधकाम असलेली आणि बऱ्यापैकी नवीन असलेली मिनार मशीदसुद्धा आम्ही बघितली. कालव्याच्या पाण्यालगत असलेल्या या मशिदीचा परिसर भव्य आणि शांत वाटत होता. स्थानिकांसह देशोदेशीच्या पर्यटकांचीही गर्दी इथे होत होती.

ताश्कंदपासून साधारण दीड तासाच्या अंतरावर चिमग्यान हा बर्फाच्छादित पर्वत आहे. रॉक क्लाईंबिंग, माऊंटेनिंग, पॅराग्लायडिंग इत्यादींसारखे साहसी खेळ या पर्वतावरून खेळता येतात. वर जाण्यासाठी चेअर कारची सुविधा आहे; वर पोहोचल्यावर आजूबाजूचं चित्र अतिशय निसर्गरम्य आणि आकर्षक दिसत होतं. लांबच लांब बर्फाच्छादित डोंगर आणि चार्वाक लेकसुद्धा तुम्हाला इथून बघायला मिळतो.

इथून उतरल्यानंतर आम्ही चार्वाक लेक बघण्यासाठी गेलो. या तलावाचं पाणी अतिशय स्वच्छ आणि निळं आहे. मला इथे गेल्यानंतर आपल्या लेह येथील पँगाँग लेकची आठवण झाली. आजूबाजूला संपूर्ण बर्फाच्छादित डोंगर आणि समोर शांत स्वच्छ तलावातील पाणी... अजून काय लागतं आपल्याला मनःशांतीसाठी? इथून निघाल्यानंतर अजूनच ताजेतवाने झाल्यासारखं वाटलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ताश्कंदहून समरकंदला जाण्यासाठी आम्ही बुलेट ट्रेन पकडली. सेंट्रल एशियामधलं सर्वात जुनं गाव म्हणून समरकंदला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. समरकंद हे उझबेकिस्तानमधलं तिसरं मोठं शहर. त्याचबरोबर गेल्या अडीच हजार वर्षांपासून चीन आणि मध्य एशिया यांना जोडणाऱ्या सिल्क रोडवरचं एक महत्त्वाचं उद्योग केंद्र आणि व्यापार पेठ म्हणूनसुद्धा नावारूपाला आलेलं आहे.

रेगिस्तान म्हणजेच एक मोठा चौक हे महत्त्वाचं पर्यटन केंद्र समरकंदमध्ये बघायला आम्ही गेलो. आता या ठिकाणी तीन मोठे मदरसे आहेत. पर्शियन आर्किटेक्चरची साक्ष देणाऱ्या या मोठ्या इमारतींची दारं वेगवेगळ्या रंगीत टाइल्स, दगड आणि मिनार कामाने अन् चबुतऱ्यांनी सजवलेली आहेत. हजारो वर्षांपूर्वी या ठिकाणी गावातली महत्त्वाची बाजारपेठ होती आणि इथूनच पुरातून सिल्क रोडवरचा व्यापार होत असे.

इथूनच जवळ १३ किलोमीटरवर असलेल्या कोनिगिल या गावात आम्ही हॅण्डमेड पेपर फॅक्टरी बघण्यासाठी गेलो. तिथे हॅण्डमेड पेपर कसा बनवला जातो याचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आमच्यासाठी येथीलच एका मोठ्या घरात स्थानिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. घरातल्या सदस्यांनी स्थानिक उझबेकी आणि पर्शियन पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ जेवणात केले होते.

मांसाहारासह शाकाहारी पदार्थ आणि वेगवेगळ्या सॅलॅड्सवरही इथे भर देण्यात आला होता. इथून मग आम्ही गुरे मिझोलियन बघण्यासाठी गेलो. तुर्की मंगोलियन बादशाह तैमूर याची ही कबर आहे. हेसुद्धा एक महत्त्वाचं पर्यटनाचं केंद्र आहे. इसवी सन १४०० मध्ये बांधलेल्या या इमारतीवर मुघल आणि पर्शियन संस्कृतीची अन् आर्किटेक्चरची छाप बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसून येते.

त्यानंतरच संपूर्ण आशियामध्ये मुघलांकडून अशा प्रकारच्या अनेक मोठ्या नावाजलेल्या इमारती बांधण्यात आल्या. ज्यामध्ये दिल्लीतील हुमायूनची कबर आणि आग्र्यामधील ताजमहाल यांचासुद्धा समावेश होतो. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध अशा समरकंदच्या सियाब बाजारामध्ये फिरण्यासाठी गेलो. स्थानिकांसह देश-विदेशातल्या पर्यटकांसाठी हा बाजार म्हणजे त्यांचं अतिशय आवडीचं खरेदीचं ठिकाण.

त्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांसह वेगवेगळ्या प्रकारचे नान, ब्रेड, फळं, मिठाई, मसाले, सुका मेवा, गालिचे, वेगवेगळी कलाकुसर आणि एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, जॅकेट्स आणि घर सजावटीच्या वस्तू अशा एक न अनेक गोष्टी मनपसंत दरात खरेदी करायला मिळतात. आमचे दोन-तीन तास तिथे कसे गेले हे कळलेसुद्धा नाही. भारतीय पर्यटकांनी आता सरधोपट मार्ग न स्वीकारता चोखंदळ ठिकाणी जाऊन पर्यटनाची आवड पूर्ण करायला नक्कीच हरकत नाही, असा हा देश आहे.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com