मराठी वृत्तपत्रांइतकीच त्यातल्या व्यंगचित्रांची परंपराही जुनी आहे. व्यंगचित्रांमध्ये चित्र, शब्द यांच्या साहाय्याने मत, विचार कल्पकतेने मांडले जातात. डॉ. प्रवीण मस्तुद यांच्या ‘मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास’ या पुस्तकात मराठीतील व्यंगचित्रांच्या याच परंपरेचा आढावा घेण्यात आला आहे.
लेखकाने ‘मराठी भाषिक वृत्तपत्रांतून प्रकाशित होणाऱ्या व्यंगचित्र सदराच्या संदेशातून प्रसारित होणाऱ्या परिणामांचा वाचकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास’ या विषयावर टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पीएचडी केली आहे. मराठीत व्यंगचित्रे, त्यांची परंपरा, व्यंगचित्रांनी जागतिक व देश पातळीवरील वाटचाल, त्यामुळे राजकीय चळवळींना मिळालेले बळ असा एकत्रित आढावा घेणारी पुस्तके फारशी नाहीत.
मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास अद्याप कुणी एकत्रितरीत्या मांडला नाही. त्यामुळे हे या विषयावरील पहिलेच पुस्तक असावे. या पुस्तकात व्यंगचित्रांचे प्रकार, राजकीय व्यंगचित्रे, जागतिक व्यंगचित्र दिन, भारतातील पहिले वृत्तपत्र सिटीज गॅझेट, लादलेली बंधने, वाद आदींची माहिती आहे.
महात्मा गांधी, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींच्या संदर्भातील व्यंगचित्रे तसेच ''सकाळ''मध्ये नानासाहेब परुळेकर यांनी जोपासलेली व्यंगचित्रांची परंपरा, केवळ बालगोपाळच नव्हे तर मोठ्यांमध्येही कमालीची लोकप्रिय झालेली ‘चिंटू’ सारखी लोकप्रिय व्यंगचित्र मालिका आदींचा ऊहापोह या पुस्तकात आहे.
आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर आदी दिग्गज व्यंगचित्रकारांची माहितीही पुस्तकात आहे. मराठी व्यंगचित्रांवर भर असला, तरी जगातील पहिले व्यंगचित्र व या विषयाला अनुसरून इतर माहितीही पुस्तकात आहे.
पुस्तकात एकूण ४० प्रकरणे आहेत. यात संवादाची मानवी गरज, व्यंगचित्रांमधून साधला जाणारा संवाद, अगदी छोट्या जागेत वैचारिकदृष्ट्या मोठा संदेश पोहोचवणाऱ्या व्यंगचित्रांचे महत्त्व, समाजातील व्यंगांवर केले जाणारे प्रहार, उपहास आदींवर भाष्य केले आहे. अमेरिका किंवा पाश्चात्त्य देशांतील वृत्तपत्रांतील व्यंगचित्रांची उदाहरणेही दिली आहेत.
व्यंगचित्रांतून मानवी भावनांना हात घातला जातो, राजकारण्यांपासून सामान्य नागरिक व्यंगचित्रांची दखल घेतात, असं लेखकाचे मत आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी अभ्यासलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी दिली आहे. कला या प्रकरणातून चित्रकलेच्या इतिहासाचाही आढावा घेतला आहे. हास्य-व्यंगाची भूमिकाही विशद केली आहे.
व्यंगचित्रांचे संपादकीय, हास्यचित्रे, व्यंगरेखने, विनोदी चित्रपट्टी, सचेतन व्यंगचित्रे हे पाच प्रकार लेखकाने स्पष्ट केले आहेत. पुस्तकाचा विषय मराठी भाषिक व्यंगचित्रे असा असला, तरी गरजेनुसार लेखकाने जागतिक संदर्भ, जगातील पहिले व्यंगचित्र आदींचा उल्लेख केल्याने मूल्यवर्धन होण्यात मदत झाली आहे.
भारतातील पहिले वृत्तपत्र, पहिले इंग्रजी व्यंगचित्र पत्र, स्वातंत्र्यांनंतरची वृत्तपत्रे, उर्दूतील व्यंगचित्र पत्र, मराठीतील पहिले वृत्तपत्र - दर्पण, मराठीतील पहिले व्यंगचित्र तसेच पहिले व्यंगचित्रपत्र हिंदूपंच आदींचा प्रवास लेखकाने उलगडला आहे.
पाच व्यंगचित्रकारांच्या कथाही लिहिल्या आहेत. एकूणच व्यंगचित्र पत्रकारितेचा विविध अंगाने, विविध बाबींचा ऊहापोह करण्यासाठी तसेच वृत्तपत्र व्यंगचित्रांसंदर्भात काय घडले, याचा ऐतिहासिक अंदाज येण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे लेखकाने समारोपात म्हटलं आहे.
अतिशय छोट्या जागेत, कमीत कमी शब्दांत दैनंदिन ताणतणाव, धावपळीतून वाचकाचे घटकाभर मनोरंजन, प्रबोधन करत त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम व्यंगचित्रे करतात. मराठी व इतर व्यंगचित्रांचा हा रंजक आढावा वाचनीय आहे.
पुस्तकाचे नाव : मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास
लेखक : डॉ. प्रवीण सुरेखा मच्छिंद्र मस्तुद
प्रकाशक : पुस्तक मार्केट पब्लिकेशन, पुणे
संपर्क : ९९६०३१२९६३
पृष्ठं : २३६
मूल्य : ४०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.