

Feminist Interpretation of Ramayana
esakal
डॉ. राजेंद्र माने - saptrang@esakal.com
इंद्र, अहल्या आणि गौतम ऋषी यांची पौराणिक कथा सर्वश्रुत आहे. याच कथेशी संबंधित बलदेव वंशी यांनी एक खंडकाव्य अर्थात दीर्घ कविता ‘आत्मदान’नावाने लिहिली आणि त्या काव्याचा अतिशय सुंदर अनुवाद ज्येष्ठ साहित्यिक विश्वास वसेकर यांनी ‘अहल्या’ या नावाने केला आहे. सर्वसाधारणपणे अहल्येचा इंद्राशी संबंध आल्यामुळे गौतम ऋषी क्रोधित झाले. त्यांनी अहल्या हिला शाप दिला आणि तिची शिळा बनली. काही कालावधीनंतर प्रभू रामचंद्र तिथे आले आणि त्यांच्या पदस्पर्शाने त्या शिळेचा कायापालट होऊन पुन्हा अहल्या मुक्त झाली अशी एक कथा आहे. मात्र, श्रीमद्भागवत पुराण, वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस या तिन्हीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा आली आहे. कवी बलदेव वंशी यांना त्यातली वाल्मिकी रामायणातील अहल्येसंबंधीची कथा जास्त मानवीय वाटली आणि जास्त पटण्यासारखीही वाटली. तुलसी रामायणात अहल्येचा शिळा बनण्याचा उल्लेख येतो, पण वाल्मिकी रामायणात मात्र हजारो वर्षातील एकांतवासाची कैद केल्यासारखी तिची अवस्था आहे आणि एक वेळ अन्न घेऊन जगण्याचा शाप तिला आहे.