

The Critic Movie Review
esakal
सुहास किर्लोस्कर- suhass.kirloskar@gmail.com
क्रिटिक (समीक्षक) हा शब्द लॅटिन शब्द क्रिटिकस पासून आणि ग्रीक शब्द क्रिटिकॉस शब्दापासून तयार झाला. या शब्दांचे मूळ क्रिटेस या ग्रीक शब्दात आहे, ज्याचा अर्थ जज म्हणजेच न्यायाधीश/परीक्षक असा आहे. अशाप्रकारे शब्दाचे मूळ सांगितल्यानंतर लंडनमधील १९३४ मध्ये ड्युक्स थिएटरमध्ये ‘द डार्क टॉवर’ हे नाटक बघण्यासाठी समीक्षक जिमी अर्स्किन याचे आगमन होते. सगळेच त्याची बडदास्त ठेवताना दिसतात, याचा अर्थ त्याचा दरारा आहे. ‘‘नाट्य समीक्षकाला सगळे वचकून असतात, काहीजण त्याचा तिरस्कार करतात. खरे तर समीक्षकाचे काम जाणकार या नात्याने प्रेक्षकांना एका विश्लेषकाच्या भूमिकेतून दिशा देणे हे असते, असावे.’’ अशी वाक्ये समीक्षक जिमीच्या आवाजात ऐकल्यानंतर पडद्यावर एखाद्या नाटकाची जाहिरात दिसावी तसे निओन साईन बोर्डवर अक्षरे उमटतात ‘द क्रिटिक’.
हा वयस्कर समीक्षक एका वृत्तपत्रात नाटकांचे परीक्षण लिहीत असतो. त्या वृत्तपत्राची मालकी वडिलांच्या निधनानंतर आता मुलाकडे आली आहे. वृत्तपत्राची सूत्रे हाती घेताच तो म्हणतो की आता काळ बदलला आहे, आता खप वाढवण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. नव्या धोरणानुसार खर्चामध्ये काटछाट केली जाते, काही धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत त्यामुळे ज्येष्ठ कर्मचारी आता सावध होत आहेत. ज्येष्ठ समीक्षक जिमी मात्र अशा बदलाला सामोरा जाण्यास तयार नाही, तो पूर्वीच्याच पद्धतीने नाटकाचे समीक्षण करताना त्यातील उणिवा दाखवून देण्यास आसुसलेला आहे. नाटकातील कलाकार, दिग्दर्शक त्याला घाबरतात, याचे जिमीला अप्रूप वाटते. काही प्रेक्षकांना समीक्षक जिमी उद्या काय लिहिणार याची उत्सुकता असते पण कलाकारांना मात्र त्याची नाट्यगृहातील उपस्थिती खटकते. परीक्षण छापून यावे असे कलाकारांना वाटते परंतु ते चांगलेच यावे असा कलाकारांचा आग्रह असतो.