Indus Valley Civilization sites in Maharashtra
sakal
Daimabad Bronze Chariot and Sculptures : दायमाबादच्या कांस्य मूर्तींचा गूढ इतिहास; सिंधू संस्कृतीच्या काळातील अनमोल ठेवा
राकेश मोरे - rakesh.more@esakal.com
रानोमाळ भटकणारा आद्य मानव प्रथम नद्यांच्या काठी स्थिर झाला. नदीप्रवाहाच्या परिसरात लहान-मोठी नगरे वसवून मानवी संस्कृतीचा पाया घातला. महाराष्ट्रात पुरातत्त्वज्ञांना आजपर्यंत मानवी संस्कृतीचा वेध घेण्याच्या प्रयत्नात जी स्थाने आढळली, त्यातील बहुतांश स्थाने नद्यांच्याच परिसरात विकसित झाली आहेत. त्यातीलच एक प्रवरा नदीच्या खोऱ्यातील दायमाबाद.
गोदावरीची उपनदी असलेल्या प्रवराच्या डाव्या तीरावर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या शहरापासून १८ कि.मी. अंतरावर आग्नेय दिशेस दायमाबाद असून, त्या ठिकाणी सध्या वस्ती नाही. या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे बी. पी. बोपर्डीकर यांनी लावला. येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे १९५८-५९, १९७४-७५ व पुन्हा १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये असे एकूण चार वेळा उत्खनन करण्यात आले. त्यामधून ताम्रपाषाणयुगीन दायमाबादविषयी भरपूर माहिती मिळाली. पहिली दोन उत्खनने मर्यादित स्वरूपाची होती व नंतर मिळालेल्या पुराव्यांमुळे त्या वेळी काढलेल्या निष्कर्षांमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

