
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
वाहन उद्योगाचे पितामह हेन्री फोर्ड यांचे एक मौलिक वाक्य आहे, ‘‘एखादी व्यक्ती शिकायचे थांबवते तेव्हा ती वृद्ध होते, मग ती विशीतला तरुण असो किंवा ऐंशी वर्षांची ज्येष्ठ. जो शिकत राहतो तो तरुण. जगातील सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे तुमचे मन तरुण ठेवणे.’’ हेच ब्रिद समोर ठेवून जगातील प्रत्येक वाहन कंपनी गाड्यांची निर्मिती आणि आराखडा करताना आपले वाहन आकर्षक, जीवंत आणि दर्जेदार कसे राहील याचा विचार करत असते आणि त्यादृष्टीने त्यास बाजारात आणत असते. आपले वाहन कालबाह्य वाटू नये, यासाठी या कंपन्या नावीन्यपूर्ण प्रयोग करीत असतात. पूर्वीच्या काळी मोटारीत गाणे ऐकणे कौतुकास्पद असायचे आणि या तंत्राने लोक भारावून जायचे. पण आज स्थितीत बदल झाला आहे. ‘एआय’च्या सुविधेमुळे प्रत्येक मोटार मिनी थिएटर वाटते. साहजिकच नव्याने दाखल होणाऱ्या गाड्या प्रसंगानुरूप वाटू लागतात आणि ती गाडी आपल्या पार्किंगमध्ये असावी, अशी इच्छा मनात आल्याशिवाय राहत नाही. भारतीय वाहन बाजाराचा विचार केला तर आलिशान, आकर्षक, दमदार असणाऱ्या नव्या वाहनांचा नेहमीच बोलबाला राहिला आहे.