

Self-driving car technology 2030 forecast
esakal
एकेकाळी केवळ विज्ञानकथांपुरती मर्यादित असलेली संकल्पना आज वास्तवात उतरू लागली आहे. रिमोटवर चालणाऱ्या खेळण्यांच्या गाड्यांपासून ते स्वतः निर्णय घेणाऱ्या, कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या मोटारींपर्यंतचा प्रवास मानवी कल्पनाशक्ती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे द्योतक आहे. चालकाविना रस्त्यावर धावणारी वाहने केवळ सोयीची बाब नसून ती जबाबदारी, सुरक्षितता आणि निर्णयक्षमतेचे नवे प्रतीक ठरत आहेत. अशा या नव्या युगातील स्वयंचलित वाहनास रस्त्यावरचा ‘धुरंधर’ म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
अमेरिकेतील रस्त्यांवर रोबोटॅक्सी आणि इतर स्वयंचलित वाहनांची संख्या येत्या काही वर्षांत लक्षणीय वाढण्याचा अंदाज ‘गोल्डमन सॅक्स रिसर्च’ने वर्तवला आहे. खर्च कमी करणे आणि व्यवसायाचा विस्तार (स्केल-अप) करण्यावर आघाडीच्या ‘एव्ही’ कंपन्यांचा भर असल्यामुळे ही वाढ शक्य होणार आहे. सध्या अमेरिकेतील पाच शहरांमध्ये दीड हजारांहून अधिक रोबोटॅक्सी व्यावसायिक वापरात आहेत. ही संख्या २०३० पर्यंत सुमारे ३५ हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. त्या टप्प्यावर स्वयंचलित वाहनांमधून दरवर्षी सुमारे सात अब्ज डॉलरचा महसूल निर्माण होईल. तसेच, अमेरिकेच्या राइडशेअर बाजारातील सुमारे आठ टक्के वाटा रोबोटॅक्सींचा असेल. सध्या एक टक्क्यांपेक्षा वाटा कमी आहे. रोबोटॅक्सींबरोबरच स्वयंचलित ट्रकसुद्धा व्यावसायिक ट्रकिंग फ्लीटमध्ये वेगाने दाखल होतील, असा अंदाज आहे. सध्या केवळ मोजकीच स्वयंचलित ट्रक वाहने वापरात आहेत. २०३० पर्यंत ही संख्या सुमारे २५ हजारांपर्यंत पोहोचेल. यामुळे लॉजिस्टिक्स आणि मालवाहतूक क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
स्वयंचलित वाहनांचा ट्रेंड प्रस्थापित करणारे टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ‘स्वयंचलित स्मार्ट मोटार ही मानवी चालकांनी चालवलेल्या मोटारीपेक्षा खूप अधिक सुरक्षित असेल’, असे म्हटले आहे. त्यांच्या या मताचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील नागरिक उत्सुक आहेत. आपल्याकडील रस्त्यांवरही स्वयंचलित मोटारीची वर्दळ वाढावी, अशी अपेक्षा केली जात आहे. चालकविरहित वाहनांमुळे या उद्योग क्षेत्राने नव्या युगात प्रवेश केला असून, आगामी काळात त्याची आणखी उत्क्रांती पाहावयास मिळू शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने विकसित झालेल्या स्वयंचलित मोटार मानवी हस्तक्षेप कमी करून सुरक्षित आणि सोईस्कर प्रवासाचा मार्ग मोकळा करत आहेत. वाहन किती प्रमाणात स्वतः चालू शकते, हे ठरवण्यासाठी एसएई (Society of Automotive Engineers) या संस्थेने स्वयंचलिततेचे शून्य ते पाच असे सहा स्तर निश्चित केले आहेत. ही मानके एसएई- जे ३०१६ या दस्तावेजात (Taxonomy and Definitions for Terms Related to Driving Automation Systems) नमूद करण्यात आली आहेत. १९०५मध्ये अमेरिकेत स्थापन झालेली एसएई ही संस्था वाहन उद्योग, विमानवाहतूक व मोबिलिटी क्षेत्रातील तांत्रिक मानके विकसित करण्याचे काम करते. ही संस्था कायदे बनवत नाही, मात्र तिची मानके सरकारे, वाहन उत्पादक आणि नियामक संस्था स्वीकारतात.