जगण्यावरचं अमर प्रेम... !

कोकणात वेंगुर्ल्यात जन्मलेले मंगेश पाडगावकर शिक्षणानिमित्त मुंबईला आले आणि मुंबईकर झाले.
Love for Living life
Love for Living lifesakal
Updated on

- दिलीप कुंभोजकर, kumbhojkar.dilip@gmail.com

कोकणात वेंगुर्ल्यात जन्मलेले मंगेश पाडगावकर शिक्षणानिमित्त मुंबईला आले आणि मुंबईकर झाले. ते मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत मधून एम.ए. झाले. ते रुईया महाविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत होते, नंतर आकाशवाणीवर ते निर्माता म्हणून काम पाहत. त्यांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ आणि ''बोलगाणी'' हे काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.

वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या काव्यवाचनाची भूल मराठी मनाला पडली होती. त्यांना ''सलाम'' या कवितासंग्रहासाठी १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांना पद्म भूषण, महाराष्ट्र भूषण, मसाप सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

प्रत्येकाचे जीवन सुंदर आहे. ते जगताना सौंदर्य टिपता आले पाहिजे. तसे आपण स्वतःला घडविले पाहिजे. आपली सौंदर्यदृष्टी आपणच विकसित केली पाहिजे. जीवनातील अनेक गोष्टी आपणास जीवन जगण्यास, आनंदित राहण्यास उत्साह, प्रेरणा देत असतात. म्हणूनच कवी मंगेश पाडगावकर म्हणतात -

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे ॥

आपल्याला मिळालेला हा मानवी जन्म अमूल्य आहे. नियती आणि प्रारब्ध काहीही असले, तरी आपण चांगले कर्म करीत आपल्या या जन्मावर, आयुष्यावर ''प्रेम'' करा. एकदा नव्हे तर शंभरदा म्हणजेच जीवनभर प्रेम करा. ''प्रेम'' ही कल्पना दुसऱ्याचा निरपेक्ष विचार करते, यात त्यागाची भूमिका असते. यात हास्य आहे, आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे. हे जीवन समजून घ्या, उमजून घ्या ! ह्या जीवनावर प्रेम करा !

चंचल वारा... या जलधारा,

भिजली काळी माती

हिरवे हिरवे प्राण तशी ही,

रुजून आली पाती

फुले लाजरी बघून कुणाचे,

हळवे ओठ स्मरावे ॥१॥

या कडव्यात निसर्गकवी पाडगावकर आपणास भेटतात. निसर्गातील सौंदर्य किती सहज आणि सोप्या शब्दांत व्यक्त केले आहे पाहा... वारा कसा आहे? चंचल; पाऊस कसा आहे ? अरे या तर ‘जलधारा’ आहेत, जणू शंकराच्या पिंडीवर अभिषेक चालू आहे.

परिणाम: भिजली काळी माती ! आपण या भूमीला आपली ''काळी आई'' मानतो. भिजणे म्हणजे प्राशन करणे, संतोषणे. आपण मृदगंध अनुभवतो, मनाला प्रसन्न करून सोडतो. या मातीत दडलेले अंकुर, लपलेली गवताची पाती या पाण्याच्या स्पर्शाने वर येतात, ही हिरवी हिरवी पाती मनाला संतोष देतात. ही पाती ताकदवान आहेत, संत तुकाराम म्हणतात, ‘‘ महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती.’’ आपण गणपतीला याच हिरव्या रंगातून डोकावणारी ‘दूर्वांची जुडी’, पत्री वाहतो. हा निसर्गाचा सन्मान आहे. या निसर्गातील नाजूक वेलींवर उमलणारी फुले पाहून कवीला एखाद्या सौंदर्यवतीचे ओठ आठवतात. सौंदर्यशास्त्रात, शृंगारात ओठांना प्रेमाचे स्थान आहे आणि पाडगावकर तर "प्रेम पुजारी" होत. प फ ब भ म ही ओष्ठ्य अक्षरे आहेत, येथे ओठाला ओठ भिडल्याशिवाय उच्चारता येत नाही. प्रेम हा शब्दच ओष्ठ्य आहे. मनातला अंकुर हा आनंदाच्या वर्षावानंतर प्रेम रूपात वर येतो. मग जीवनच सुंदर होते. अशा सुंदर जीवनावर - या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे !

रंगांचा उघडूनीया पंखा,

सांज कुणी ही केली

काळोखाच्या दारावरती,

नक्षत्रांच्या वेली

सहा ऋतूंचे सहा सोहळे,

येथे भान हरावे ॥२॥

आपण आपल्या बालपणातील वस्तूंची, खेळण्यांची आठवण उजळली तर वेंगुर्ल्याजवळच्या सावंतवाडीतील लाकडी खेळणी, बांबूपासून केलेला घडीचा पंखा, त्यावर रंगवलेले डोंगराच्या पाठीमागील सूर्यदर्शन; तो सूर्य उगवतीचा होता का मावळतीचा, पूर्वेचा का पश्चिमेचा हा प्रश्न कधी पडलाच नाही. ‘‘जो न देखे रवी, वो देखे कवी’’ या उक्तीनुसार कवी पाडगावकर सहज म्हणतात - ‘‘ रंगांचा उघडूनीया पंखा, सांज कुणी ही केली’’. सायंकाळी सूर्यास्तानंतर रात्रीच्या अंधाराचे साम्राज्य पसरण्यापूर्वी एक संमिश्र असा रंगीत उजेड सर्वत्र आढळतो. संध्याप्रकाश, संध्याकाल आणि संधिकाल हे तसे एकाच अर्थाचे शब्द, संधि म्हणजे दिवस व रात्र यांना जोडणारा, त्यांच्या मीलनाचा काळ.

कवी पाडगावकर यांना ''सलाम'' केला पाहिजे तो या ओळीवर - ‘‘ काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली.’’ संध्याप्रकाश बाजूला सारून आता काळोख पसरणार आहे, जसाजसा आकाशात काळोख वाढत आहे, तशा चांदण्या, ग्रह, तारे लुकलुकत चमकू लागले आहेत. नक्षत्र म्हणजे तारकासमूह ! हे आकार कवीला वेलींप्रमाणे भासत असून ताऱ्यांची नक्षी ही जणू काही या वेलींना लटकलेली फुले आहेत. स्त्रियांचा नाकात घालायचा दागिना म्हणजे नथ, नथीचा विशिष्ट आकार, त्यातील चमकणारे खडे हे नक्षत्रांच्या वेलीवरील फुलेच आहेत. हे वर्ष विभागले आहे सहा ऋतूंमध्ये ! वसंत ऋतूमधली नवी पालवी, नवनिर्मिती; ग्रीष्म ऋतूतील दाहकता, वर्षा ऋतूमधील पर्जन्य (जीवन) वर्षाव, शरदाचे चांदणे, हेमंतातील आल्हाददायक, हवीहवीशी, रोमांचकारक थंडी आणि शिशिरामधल्या पान गळतीतून नववर्षाची नांदी. कवी म्हणतो, ‘‘ सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे.’’ खरोखरच सहा ऋतूंचे सहा सोहळे निसर्ग साजरा करतो.

बाळाच्या चिमण्या ओठांतून,

हाक बोबडी येते

वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते

नदीच्या काठी सजणासाठी,

गाणे गात झुरावे ॥३॥

किती सुंदर कल्पनाविलास आहे. प्राणिमात्रात सर्वांत श्रेष्ठ आणि निरपेक्ष प्रेम म्हणजे आईचे. संत जनाबाई म्हणते, ‘‘ घार हिंडते आकाशीं, चित्त तिचें बाळापाशीं॥’’ बाळाची पहिली हाक, आई : आ म्हणजे आत्मा आणि ईश्वर म्हणजे ईश्वर ! त्या मोहक चेहऱ्यावरील नाजूक ओठातला तो स्वर म्हणजे वेलीवरती, तीला पेलणारे उमलेले आकर्षक फूल, हे अनुभवासाठी ह्या जगण्यावर प्रेम करावे. सांज सायंकाळ मंद वाऱ्यासोबत नदीचा झुळुझुळुणारा, खळखळणारा शांत प्रवाह, म्हणजे जणू नदी काळोखाच्या प्रियकरासाठी गाणे गात आहे...

या ओठांनी चुंबून घेईन,

हजारदा ही माती

अनंत मरणे झेलून घ्यावी,

इथल्या जगण्यासाठी

इथल्या पिंपळ पानावरती,

अवघे विश्व तरावे

या जन्मावर, या जगण्यावर,

शतदा प्रेम करावे ॥४॥

‘जीव ओवाळून टाकावा’ असा आपल्याकडे एक शब्दप्रयोग आहे. आपल्याला सर्वांत जास्त मौल्यवान काय आहे तर आपला जीव ! सर्वांत मोठा त्याग काय आहे तर आपले जीवन समर्पित करणे. प्रत्येकाच्या मनातील प्रेम वेगळे असेल, प्रत्येकाचा त्याग वेगवेगळा असेल, सुखदुःखाचे फटके कमीजास्त असतील पण हे जीवन सुंदर आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन...’ कर्म हे केलेच पाहिजे, जीवन हे जगलेच पाहिजे, फलाची, यशाची अपेक्षा न करता जगा म्हणजेच यशामागे धावू नका, यश तुमचे आहेच, तेच तुमच्या मागे येईल. चुंबन हे प्रेमाचे प्रतीक आहे. आई बाळाचा पापा वारंवार घेते, तसे आपण या जीवनावर प्रेम करावे. कवीला माहीत आहे, की हे जीवन क्षणभंगुर आहे. या कालचक्राच्या गतीत आपले जीवन हे पिंपळाच्या पानावरील थेंबाइतके चंचल आहे, प्रत्येकाचे जीवन वेगळे आहे पण मोहक आहे, ते आनंद देते. हे जीवन जरूर उपभोगा, त्याच्यावर अंतःकरणापासून प्रेम करा, संकटांचा सन्मान करा, त्यांचा स्वीकार करा, संकटात संधी लपलेली असते.

‘या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती ॥ अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी’ या पंक्तीतून ते आपल्या संस्कृतीतील पुनर्जन्म कल्पनेला पाठिंबा देत आहेत का ? मला आद्य शंकराचार्य यांच्या पंक्ती आठवत आहेत -

‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी, जठरे शयनं॥’

पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण; नवी आई, नवे जठर... मोक्ष मिळेपर्यंत हे चालू आहे, चांगल्या कर्माचे फल म्हणजे मोक्ष ! पाडगावकर जणू कर्माचा सिद्धान्त सांगत आहेत, प्रेम करा, आनंदी राहा आणि दुसऱ्याला ठेवा. कर्माचा, सत्कृत्यांचा संचय करा. म्हणजेच -

‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे !’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com