

Indian Women Hockey Team News
esakal
जयेंद्र लोंढे - jayendra.londhe@esakal.com
भारतीय महिला हॉकी संघाने हैदराबाद येथे पार पडलेल्या विश्वकरंडक पात्रता फेरीमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना उल्लेखनीय खेळ केला. अजिंक्यपदाच्या लढतीत इंग्लंडकडून हार पत्करावी लागली असली तरी यावर्षी बेल्जियम व नेदरलँड्स येथे होत असलेल्या विश्वकरंडकाची पात्रता मिळवण्यात भारतीय महिला हॉकी संघाला यश मिळाले. याच संघातील सेंट्रल मिड फिल्डर वैष्णवी फाळकेशी संवाद साधताना भारतीय महिला हॉकी संघाच्या आगामी ध्येयाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर पुढील दोन वर्षांतील विश्वकरंडक, आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिंपिक या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचा ध्यास भारतीय महिला हॉकी संघाने बाळगल्याचे तिने आवर्जून सांगितले.
भारतीय पुरुष हॉकी संघाने मागील काही वर्षांमध्ये कात टाकली आहे. सलग दोन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदकांची कमाई, आशियाई करंडक व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकावर मोहर, अशा देदीप्यमान यशासह भारतीय पुरुष हॉकी संघ प्रगतिपथावर रूढ झाला आहे. आगामी विश्वकरंडक व ऑलिंपिकमध्ये घवघवीत यश मिळवण्याचा ध्यास हा संघ बाळगून आहे. अर्थात हा प्रवास सोपा नसेल, हा भाग वेगळा. तरीही आशा बाळगायला हरकत नाही. याचप्रसंगी भारतीय महिला हॉकी संघाला २०२२मध्ये झालेल्या आशियाई करंडक, राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ब्राँझपदकांची कमाई करता आलेली आहे. विश्वकरंडक व ऑलिंपिक या दोन अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धा पदकापासून भारतीय महिला हॉकी संघ दूरच राहिला आहे. यामुळे आगामी काळ हा भारतीय महिला हॉकी संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.