
Leva Dialect
esakal
खान्देशात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या विविध समाजांसारख्याच येथील बोलीभाषाही! गुजरातमधून स्थलांतरित झालेल्या लेवा पाटीदार समाजाची लेवा गणबोली ही अहिराणीपेक्षा वेळी असून तिचे साम्य वऱ्हाडीशी जास्त जाणवते. कानाला ही बोली मुलायम व कर्णमधुर वाटते.
मी आणि माझी पत्नी ऊर्मिला पाटील- आम्ही ‘खान्देश वऱ्हाडातील लेवा पाटीदार समाज- एक अन्वयार्थ’ हे पुस्तके लिहिले तेव्हा आमची या समाजाच्या बोलीभाषेशी ओळख झाली. २००५ मध्ये आम्ही त्यांच्या बोलीभाषेचा कोष लिहिला. १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत या समाजास खान्देशात ‘लेवा पाटीदार’ नव्हे, तर ‘पांजणा कुणबी’ म्हटले जात असे. हा समाज गुजरातच्या रेवा चरोतरमधील पावाखंड- अर्थात पांजणा प्रदेशातून खान्देशात आला. प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आर. ई. एन्थोवेन, जेम्स एम. कॅम्पबेल, ए. ई. नेल्सन, डॉ. इरावती कर्वे, डॉ. त्रिं. ना. वाळुंजकर यांनीही हे गुर्जरवंशी लोक गुजरातमधून स्थलांतरित झाल्याचे नमूद केले आहे. त्यांना आता ‘लेवा पाटीदार’ असेच ओळखले जाते. त्यांची बोलीभाषा ‘पांजणी बोली’ असल्याचे अहिराणीचे गाढे संशोधक डॉ. कृष्णा पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. सातपुड्याच्या मेळघाट पर्वतरांगांमध्ये या बोलीसदृश असलेली ‘घाटोळी-वऱ्हाडी’ बोली बोलली जात होती. स्थलांतरण प्रक्रियेत हीच बोलीभाषा लेवा पाटीदार समाज खान्देशात घेऊन आला आहे.