

Modern Indian Art and Artists
esakal
हर्ष भटकळ - saptrang@esakal.com
मनीष पुष्कले आज निरनिराळ्या आर्ट गॅलरी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वसाहतीत प्रदर्शन भरवण्यात व्यग्र आहेत. फक्त बाजारपेठ त्यांच्या कामाचे मूल्य काय ठरवते, यावर आपले यशापयश मोजायला ते तयार नाहीत. ‘बाजारपेठ ही नंतर तयार झाली. ती आपण होऊन बनत गेली’, याची त्यांना जाणीव आहे. आपला कलात्मक शोध सुरू ठेवणे हे खरे काम आहे. अजूनही ते बऱ्याचदा देशभर लहरीनुसार फिरत असतात. ते अनपेक्षित जागी गाडी थांबवतात आणि नवीन विचार सुचतील अशा अनुभवांचा शोध घेत असतात. ‘कुठे काय वाट पाहत असेल, ते सांगता येत नाही’ असे ते म्हणतात.
पेंटिंग्ज मी करतो, पण माझ्यातला कलावंत हा अनेक कारणांनी घडत गेलाय.’ मनीष पुष्कले हे जे सांगतात ते बव्हंशी त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. पुष्कले यांची कला आर्ट स्कूल, तिथून मिळणारे शिक्षण आणि पदव्या अशा पारंपरिक पद्धतीने जोपासली गेली नाही. ती त्यांना मिळालेला म्युझियममधील अनुभव, कलाकारांशी परिचय, पुरालेख खात्यातील काम, साहित्यसृष्टीतील विहार आणि दीर्घकाळ स्वतः शिकत राहणे, यांतून झालेली आहे. त्यांच्यासमोर काही निश्चित अभ्यासक्रम नव्हता. तरी आज त्यांना समकालीन कलावंतांत मानाचे स्थान मिळाले आहे. याच महिन्यात त्यांना न्यूयॉर्कच्या ‘आर्ट ऑम्नी’ची फ्रान्सिस जे. ग्रीनबर्गर अभ्यासवृत्ती जाहीर झाली आहे. मागे वळून पाहताना पुष्कले आपण जे कलाकार म्हणून घडत गेलो ते एखाद्या आखीव प्रक्रियेमुळे नव्हे तर परिस्थितीने निर्माण होत गेलेल्या संधीमुळे असे नेहमी सांगत असतात. ते नम्रपणे म्हणतात, ‘मी कोणत्याही कला शिक्षणातून गेलो नाही त्यामुळे माझे कलाशिक्षण चालूच राहिले आहे.’