

India-China Gopolitics
esakal
श्रीराम कुंटे - saptrang@esakal.com
हिंदी महासागरातला चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी २००७ पासून विचारात असलेला क्वाड हा भारतासाठी चीनला रोखण्याचा चांगला पर्याय होऊ शकतो. क्वाडमुळे भारताला कोणत्याही प्रकारच्या करारांमध्ये बांधून न घेता कराराचे फायदे मिळतील. भारतासाठी हिंदी महासागर अत्यंत महत्त्वाचा आहे. या महासागरात चीनची ढवळाढवळ सुरू झाली असताना, क्वाडमुळे भारताला इतर सदस्यांकडून टेहळणीत मदत, संयुक्त नाविक कसरतीचे फायदे आणि अत्याधुनिक उपकरणं मिळतील. क्वाडमुळे चीन काही आगळीक करायच्या आधी दोनदा विचार करेल.
२० मे १४९८. याच दिवशी वास्को द गामाने केरळच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवलं आणि जगाचं आर्थिक केंद्र पश्चिमेकडे सरकलं. त्यानंतर तब्बल ५०० वर्षांनी २००८ च्या आर्थिक मंदीनंतर ते पुन्हा एकदा आशियाकडे सरकायला लागलं. त्याचा परिणाम म्हणून आज भारताची अर्थव्यवस्था जगात सहाव्या क्रमांकावर आहे आणि लवकरच आपण पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असू. तसं झाल्यावर जगात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर गरीब आणि उपेक्षित जनता असलेल्या दोन अर्थव्यवस्था पहिल्या तिघांमध्ये असतील. जागतिकीकरणाच्या या विरोधाभासाचं प्रतिबिंब भारतातल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत दिसू लागलंय हे तुम्हाला जाणवलं असेलच.