
सुनंदन लेले - sdlele3@gmail.com
प्रसंग होता पुण्यातील सुप्रसिद्ध चितळे बंधूंच्या व्यवसायाला ७५ वर्षं पूर्ण झाली त्या सोहळ्यातील. सचिन तेंडुलकरची मुलाखत घेत असताना मी सचिनला प्रश्न विचारला होता, की ‘‘कर्तृत्वाने किंवा वयाने माणूस कितीही मोठा झाला तरी कान पकडणाऱ्या माणसाचे काय महत्त्व असते?’’ सचिनने कान पकडणाऱ्या माणसाचे मोल समजावून सांगताना किस्सा सांगितला होता. एकदा ऑस्ट्रेलियासमोर महत्त्वाचा सामना खेळत असताना सचिन चांगली फलंदाजी करत होता. समोर साथीला व्हीव्हीएस लक्ष्मण होता. लक्ष्मणने मारलेल्या फटक्यावर दोन धावा सहज पळता येतील या विचारांनी सचिन धावला; पण लक्ष्मण पळाला नाही. परिणामी, सचिन सहजी धावचीत झाला. चांगला खेळ होत असताना धावबाद झाल्याने सचिन वैतागला आणि त्याने तंबूत परतत असताना त्याने लक्ष्मणकडे स्पष्ट नाराजी व्यक्त केली.