

British Humor in Cinema
esakal
सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं... खरंच असं असतं का? प्रत्येकाची प्रेमकथा वेगळी असते, प्रेमकथा यशस्वी होण्यासाठी केलेला संघर्ष वेगळा असतो. त्याची परिणती म्हणून विवाह झालाच तर त्यानंतरची कथा अतिशय रोमांचकारक असते. खरा सिनेमा तर लग्नानंतर सुरू होतो, जो रोमँटिक कमी आणि कधी कॉमेडी तर कधी सस्पेन्स थ्रिलर होतो. दोघांनी एकमेकांवर कुरघोड्या करायला सुरुवात केली तर त्याचे रूपांतर सवाल-जवाब करता करता नाट्यमय होते. आजचा दिवस कसा गेला, यापेक्षा आज जो डाव टाकला गेला, त्याचा प्रतिवाद कसा करायचा, ‘ती अशी बोलली तर त्यावर उत्तर काय द्यायचे’ अशा पद्धतीचे नियोजन सुरू होते आणि संसाराचे रूपांतर बुद्धिबळामध्ये होते. अशाच स्वरूपाची कादंबरी वॉरेन अडलर यांनी लिहिली,
‘जोनाथन रोज’ एक यशस्वी वकील आहे आणि त्याची पत्नी ‘बार्बरा रोज’ हिला एक यशस्वी उद्योजक बनण्याची आस आहे. दोन मुलांचे आई-बाप असणाऱ्या ‘रोज’ पती-पत्नीचा संसार सुख-दुःखाचा आहे, ज्यामध्ये प्रेम आहे, भांडणे आहेत, रुसवे-फुगवे आहेत. एक दिवस भांडण विकोपाला जाते आणि बार्बरा घटस्फोटाची मागणी करते. दोघांनी मिळून बांधलेल्या घराची संकल्पना बार्बराची होती आणि त्यामध्ये पैसा ओतला होता जोनाथनने. बार्बरा घटस्फोट मागताना घर तिच्या नावावर करण्याची मागणी करते आणि इथेच प्रकरण विकोपाला जाते. एकमेकांवर कुरघोड्या करण्यामध्ये वकील हातभार लावतात, घराचा ताबा हातातून सुटू नये, या कारणास्तव त्याच घरात एकत्र राहून आज भांडता भांडता उद्याच्या बुद्धिबळ चालींचे नियोजन करतात.