

Marathi Literature Fiction
esakal
‘‘सहज डाव्या हाताने गेलं असता नदीकाठाने जाता येतं. उजवीकडे मात्र डोंगर रस्ता लागतो. मी दोन्हीकडूनही पुढे गेलो नाही कधी. या अशा वादळी वाऱ्यात तर साधा अंगणातही कधी थांबलो नाही. तू जेव्हा पलीकडे जाऊ, येतोस का? म्हणालास तेव्हा मनातही वादळ उठले. माझ्यासारख्या शिवही न ओलांडलेल्या अननुभवी तोंडाळ माणसाची सोबत तू अशा अनोळखी प्रवासात का अपेक्षावी या प्रश्नाचे ते आवर्त होते. मग मी अगदीच नवखेपणा दिसू नये म्हणून गावात थोडी विचारणा केली. बऱ्याच जणांना ‘आत्ता पलीकडे जायचंच कशाला?’ हा प्रश्न पडलेला दिसला. घाईने गुरे गोठ्यात घालणाऱ्या एका गुराख्याने मात्र सांगितलं की ‘‘सहज डाव्या हाताने गेलं असता नदीकाठाने जाता येतं. उजवीकडे डोंगर रस्ता लागतो.’’ पण पलीकडे काय आहे? किंवा रस्त्यात काही विसाव्याची ठाणी आहेत का? या माझ्या प्रश्नांना मात्र ‘‘जाऊन पाहा’’ असं त्यानं तुझ्या शैलीचं त्रोटक उत्तर दिलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हमखास खोटं बोलू शकणाऱ्या द्वाड शाळकरी मुलाचे भाव होते. आता त्याच्या हवाल्यानं मी ‘‘सहज डाव्या हाताने गेलं असता नदीकाठाने जाता येतं आणि उजवीकडे डोंगर रस्ता लागतो’’ असं म्हणणं तुला पटावं असा आग्रह नाही. जरा पुढे जाताच आपल्याला खरे काय ते कळेलच. पण एकूणच दिशा मला कधी ठरवता आली नाही. लोटल्यासारखा मी कुणामागे तरी जात आलो आहे. एकट्यानं कुठे जावं, काही करावं, नवं शोधावं असं मला कधी जमलं नाही. एकटेपणाची भीती वाटून नाही तर त्या एकांतात कुणी राक्षस प्रकटेल किंवा कुणी चेटकीण आपल्याला उडू न शकणारा कीटक बनवेल अशा काल्पनिक गोष्टीत तथ्य वाटून मी आजवर एकट्यानं प्रवास टाळला आहे. मला कल्पनेचीच भीती वाटत आली आजवर. तिला कसली बंधने नाहीत. उंच डोंगरावरून आपण पाय घसरून निमुळत्या अरुंद खोबणीत पडलो असता सुटकेसाठी हाका मारायला आवाजच नसेल किंवा एकट्या माणसाठायी तयार होणारी शांतता चकवा तयार करून एकाच ठिकाणी स्वतःशी गरगरवत राहील, अशा भित्या ती सहजी तयार करते ! वस्तू आणि प्रतिसाद नसलेल्या भवतालात केवळ निसर्ग आणि आपण ही कल्पना असह्य आहे ! प्रतिसादाकरता सजीव चेतना भोवती हवीच.