

US Iran Geopolitical Trap
esakal
‘मॅचो मॅन’ ही प्रतिमा जपण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला अनिश्चिततेच्या गर्तेत लोटले आहे. डॉलरचे घसरते मूल्य आणि जागतिक बाजारपेठेतील अमेरिकेचा कमी होत असलेला धाक, हे नवीन जागतिक व्यवस्थेचे संकेत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, ट्रम्प यांनी आपल्या आक्रमक स्वभावातून अमेरिकेला एका अशा वळणावर आणून ठेवले आहे, जिथून मागे फिरणे कठीण आहे. हे युद्ध केवळ इराणपुरते मर्यादित नसून, ते अमेरिकेच्या महासत्ता असण्याच्या कल्पनेलाच सुरुंग लावणारे आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हटले जाते. पण महासत्ता जेव्हा इतिहासातील चुकांपासून धडा घेण्यास नकार देतात, तेव्हा ती पुनरावृत्ती विनाशाकडे नेणारी ठरते. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध युद्धाचे बिगुल अतिरेकीवादी विचारानं पुन्हा फुंकलं आहे, त्याकडे पाहताना प्रकर्षाने जाणवते, की हे केवळ एका देशाने दुसऱ्या देशाविरुद्ध पुकारलेले युद्ध नाही, तर अमेरिकेने स्वतःच्या हाताने स्वतःसाठी रचलेला एक ‘भू-राजकीय सापळा’ आहे. गुरुवारी जागतिक पटलावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युद्धाचे बिगुल वाजवून संपूर्ण जगाला अनिश्चिततेच्या गर्तेत लोटले आहे. व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानमधील पराभवातून अमेरिका काहीही शिकलेली नाही, हेच आजच्या परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे. गुरुवारी ट्रम्प यांनी जे भाषण केले, ते केवळ गर्जना करणारे नसून अमेरिकेच्या घसरत्या वर्चस्वाचा एक पुरावाच ठरत आहे. या भाषणात ट्रम्प यांनी इराणमधील कारवाईला ‘मोठे यश’ म्हटले असले, तरी जमिनीवरचे वास्तव वेगळे आहे. त्यांनी इराणला ‘पाषाण युगात" पाठवण्याची धमकी दिली. त्याबरोबर हे सर्व पुढच्या दोनतीन आठवड्यांत पूर्णत्वाला आणून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचे संकेत दिले. मात्र, हा केवळ एक ‘पॉलिटिकल सर्कस’चा भाग वाटतो. इराणसारख्या देशावर युद्ध लादणे सोपे आहे, पण तिथून बाहेर पडणे अमेरिकेला पुन्हा एकदा जड जाणार आहे. ट्रम्प यांचे हे भाषण म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे, ज्यामुळे आखाती देशांमधील शांतता कायमची भंग पावली आहे.