

Theatre Education and Marathi Theatre Economics
esakal
आशुतोष पोतदार- potdar.ashutosh@gmail.com
विद्यापीठात एका विद्यार्थिनीला नाटकाशी संबंधित एका विषयासाठी प्रवेश घ्यायचा होता. तिला नाटक पाहायला, करायला, त्याबद्दल लिहायला आणि बोलायला आवडतं. ह्युमॅनिटीज आणि विज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील विषयांतही तिला चांगली गती आहे. घरची आर्थिक परिस्थिती उत्तम, आईवडील उच्चशिक्षित. मी म्हटलं, ‘‘मग घे की प्रवेश. तुला जे शिकायचं आहे ते शिक.’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मला नाटकाचे कोर्स करता येणार नाहीत.’’ कारण विचारल्यावर तिने सांगितलं, तिचे वडील म्हणाले, ‘नाटक करके झोला लेकर घुमना है क्या.’
हे ऐकून मी थोडा नाराज झालो. मुलांनी काय शिकावं, याबद्दल आईवडिलांच्या काही अपेक्षा असतात. कधी त्या लादल्याही जातात आणि मुलांना आवडीचं शिकता येत नाही. कला, साहित्य आणि नाटक म्हणजे छंद म्हणून जोपासायच्या गोष्टी, फावल्या वेळात करायचे उद्योग, असं अनेकदा गृहीत धरलं जातं. नाटक शिकावं, परंतु पोटापाण्यासाठी नाही हा विचार असतो. नाटक करणाऱ्याचा झोला म्हणजे रिकामा खिसा, अनिश्चित उत्पन्न आणि अस्थिर भविष्य, अशी प्रतिमा समाजात आहे. या प्रतिमेला काही अनुभवांचा आधार असला, तरी ती संपूर्ण वास्तव दाखवते का, हे तपासून पाहायला हवं.
‘नाटक करताय ते ठीक आहे, पण पोटापाण्यासाठी काय करता?’ हा प्रश्न फक्त नाटक करणाऱ्यांनाच नाही, तर गाणं, चित्रकला, नृत्य आणि साहित्य अशा कलाक्षेत्रांतही विचारला जातो. आवडणारं काम आणि त्यातून मिळणारं उत्पन्न यांची सांगड कशी घालायची, हा कळीचा मुद्दा आहे. नाटकाचं अर्थकारण एका प्रयोगापुरतं नसतं. नाटकाची संकल्पना तयार होण्यापासून तालमी, प्रयोग आणि दौऱ्यांपर्यंत अनेक जण वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत असतात. अभिनय, तंत्र, प्रयोगस्थळ, निर्मिती, नियोजन आणि व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी त्यात येतात. विशेषतः मराठी नाटकात हौस, प्रायोगिकता आणि व्यावसायिकता यांची सरमिसळ असल्यामुळे त्यामागचं अर्थकारणही अनेकदा गुंतागुंतीचं असतं.