

Travels in India by Jean-Baptiste Tavernier
esakal
जाँ बातीस्त तावर्निये यांचा जन्म १६०५ मध्ये पॅरिस येथे झाला. ‘‘आपल्याला मिळालेले पहिले ज्ञान हे आपल्यासाठी पुनर्जन्मासारखे असते असे मानले, तर मी असे म्हणेन की प्रवास करण्याची इच्छा घेऊनच मी या जगात आलो,’’ असे तावर्निये आपल्या मनोगतात म्हणतात. लहानपणापासूनच तावर्निये यांच्या आजूबाजूला भूगोलविषयक वातावरण होते आणि विद्वान लोकांच्या त्यांच्या वडिलांशी होणाऱ्या चर्चा ते कुतूहलाने ऐकत असत. त्यामुळे विविध देश बघण्याच्या इच्छेने त्यांच्या मनात मूळ धरले व त्यांनतर जो काही प्रवास सुरू झाला, तो थक्क करणारा आहे.
‘बघणे’, ‘पर्यटन’, ‘निरीक्षण करणे’, ‘अभ्यास करणे’ हे शब्द फिके पडतील असा त्यांचा अवघड, पण कुतूहल वाढवणारा प्रवास या पुस्तकातून वाचायला मिळतो. मूळ फ्रेंच भाषेत असलेले हे पुस्तक १६७६ मध्ये प्रसिद्ध झाले. १८८९ मध्ये त्याची प्रथम इंग्रजी आवृत्ती आली. दुसरी आवृत्ती १९२५ मध्ये प्रसिद्ध झाली. आता या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचकांच्या हाती आला आहे. अनुवादाचा हा प्रवासही एक, दोन नाही तर तब्बल १७ वर्षे चालला. त्यामुळे हा विषय निवडायला, त्याचा अनुवाद करण्याचे व्रत सुरू करून निष्ठेने ते पूर्ण करणाऱ्या तिन्ही अनुवादकांच्या सहनशीलतेला, जिद्दीला सलाम! तीन भागांतील एकूण ७५ प्रकरणे, आठ परिशिष्टे व ११ नकाशांचा वापर करून या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तावर्निये यांनी केलेला प्रवास व त्याबाबत केलेले लिखाण हे नुसते वर्णन नसून एक मोठा दस्तऐवज आहे.