

Tarkateertha Laxmanshastri Joshi Works and Thoughts
esakal
डॉ. विश्वास सुतार - saptrang@esakal.com
‘आधुनिक भारताचे शिल्पकार : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी’ हा वैचारिक ग्रंथ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरतर्फे नुकताच प्रकाशित करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे आणि शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यासकेंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी प्रस्तुत ग्रंथाचे संपादन केले आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे महात्मा गांधी अध्यासन केंद्र आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी : कार्य आणि विचार’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रातील मुलाखती व भाषणांचे ग्रंथरूप म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या समग्र साहित्याचे संपादन १८ खंडांत केलेले आहे. २०२५ मध्ये या समग्र खंडांचे प्रकाशन ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई’मार्फत करण्यात आले. आता शिवाजी विद्यापीठाने अल्पावधीत अभिनव चर्चासत्र आयोजित करून विद्यापीठाचे वेगळेपण अधोरेखित केले. २७० पृष्ठांमध्ये व्यापलेल्या या ग्रंथात पानोपानी तर्कतीर्थांचे पुरोगामी विचार मांडलेले आढळतात. तर्कतीर्थ म्हटलं की, ज्ञानी, पंडित, विद्वान असंच व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते, तेही विद्वान लोकांच्याच. मात्र, हा ग्रंथ सामान्य वाचकांनी वाचायलाच हवा. त्यामुळे तर्कतीर्थांच्या अनेक दुर्लक्षित पैलूंविषयी वाचकांना सजग माहिती मिळेल.