

Marathi Literature Childhood Stories
esakal
माझा आनंद डबल झाला होता. मनात विचारांचे तरंग, त्यावर मी स्वार... मी स्लो मोशनमध्ये चालतोय विचार करत... पहिले बिस्किटाचे दोन्ही भाग वेगळे करायचे. मग साखर पेरणी केलेला जॅमचा भाग बाजूला ठेवून द्यायचा. सगळ्यात शेवटी खायचा तो! मग दोन्ही भागाचं क्रीम चाटून खायचं. मग मागचा भाग खायचा. मग खायचं ते जॅमच्या बाजूचं बिस्किट आणि सगळ्यांत शेवटी तो साखर पेरलेला, मऊसर, थोडा दाटसर जॅमचा भाग... अहाहा! आणि क्रीमची बिस्किटं? त्यांचं काय करू या?...
पाचवी-सहावीत असल्यापासून मी भाजी आणायला जातो आहे. आई-बाबांनी मला तशी सवयच लावली. आजही ती सवय तशीच आहे. सकाळी सकाळी ताज्या, हिरव्या-पिवळ्या-लाल रंगांच्या भाज्या पाहिल्या की मन ताजंतवानं होतं. फ्रेश वाटतं. दिवसाची सुरुवात छान होते.
कल्याणला आमच्या घरापासून काही मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावर, टिळक चौकात छोटासा भाजी बाजार लागायचा. तिथे आसपासच्या गावातल्या स्त्रिया-पुरुष आपापल्या टोपल्यांमध्ये भाज्या, फुलं किंवा सुकी मासळी वगैरे जिन्नस घेऊन येत. काहींकडे घासण्या, ब्रश, टिकल्या, कंगवे अशाही वस्तू असायच्या. जवळच पोस्ट ऑफिस, बँका असल्याने तिथे कामासाठी येणारे-जाणारे लोक आवश्यक ती खरेदी करून जायचे.