थॉट ऑफ द वीक : माझे महत्व...

My-Importance
My-Importance

Entertainment प्रेमाची गरज आपल्या भावना, विचार आणि कृती यांवर कसा प्रभाव पाडते हे आपल्याला समजले आहे. आता आणखी एक भावनिक गरज समजून घेऊ या. म्हणजेच ‘महत्त्वाची’ गरज. काही प्रसंग, चर्चा, वाद व संवाद आपल्याला एका प्रश्‍नापर्यंत येऊन थांबतात. तो म्हणजे, ‘मला महत्त्व नाहीच का?’ ‘माझ्या मताला किंमत नाही का?’, ‘माझ्या मताला कधीच किंमत नाही मिळणार का?’ या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याआधी त्यांचे अर्थ समजून घेऊ.

एका आईने मुलांचे संगोपन करण्यासाठी जास्तीत जास्त आयुष्य व्यतीत केले. ती नेहमी ‘परिपूर्ण आई’ होण्यात व्यग्र असायची. तथापि, परिपूर्ण आई होण्याच्या प्रक्रियेत तिला तिच्या कुटुंबातील सदस्यांकडून खूप महत्त्व हवे होते. ‘परिपूर्ण असणे आणि इतरांमध्ये दोष शोधणे आपल्याला अधिक महत्त्वाचे बनवते,’ असा तिचा समज झाला होता. परिणामी, कौटुंबिक वातावरण कायम तक्रारींचे बनू लागले. 

याचा परिणाम तिच्या मुलांवरही झाला. तिचा मुलगा देखील प्रत्येक गोष्टीत दोष कसे शोधायचे, हे शिकला. त्याने असे सर्व काही करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याचे महत्त्व वाढेल. जिथे महत्त्व मिळत नाही, अशा लोकांना त्याने टाळण्यास सुरुवात केली. त्याला इतर मुलांबद्दल ईर्षा वाटू लागली. एवढेच नव्हे, तर तो विचार न करता काही लोकांना जास्त महत्त्व देऊ लागला. परिणामी, त्याची मानसिक स्थिती दु:खी झाली. ‘कायम तक्रार करणारा मुलगा,’ अशीच ओळख झाली.

अशा परिस्थितीत, एखाद्याने हे समजून घेतले पाहिजे की हे सर्व का होते? लोक असे का वागतात? अनेक गरजांपैकी एक गरज प्रामुख्याने पूर्ण होत नव्हती, ती म्हणजे ‘माझे महत्त्व’. अशावेळी काही प्रश्‍न उपयोगी पडतात. मी प्रत्येक गोष्टीत दोष का शोधत आहे? माझ्याकडे जे आहे त्यात मला आनंद का नाही? मी माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी का धडपडत आहे? वरील परिस्थितीत त्या आईचे देखील बालपण थोडेसे कठीण गेले होते. तिच्या पालकांनी तिच्या भावनांना, तिच्या विचारांना कधीही महत्त्व दिले नाही. याचा परिणाम म्हणून ही गरज विकसित झाली. हीच गोष्ट तिच्या मुलाने अजाणतेपणे आत्मसात केली. विशिष्ट लोकांकडून हे ‘महत्त्वाचे प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी त्याने गोष्टी करण्यास सुरुवात केली. ‘मी महत्त्वाचे आहे’ची आवश्यकता पूर्ण केली जाते, तेव्हा आपल्याला चांगले वाटते. गरज पूर्ण होत नाही, तेव्हा आपण काय करतो?

1) ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत, त्यांना आपण सतत खूष ठेवायचा प्रयत्न करत राहतो.

2) महत्त्व येईपर्यंत आपण आपला मुद्दा, आपण दुसऱ्यांसाठी काय केले हे पटवीत राहतो.

3) आपण स्वतःच्या विचारांवर शंका घ्यायला लागतो. आपण सतत इतर लोकांवर अवलंबून राहून आपली ऊर्जा वाया घालवितो. एखाद्याच्या आयुष्यात महत्त्वाचे राहणे चांगले, परंतु त्यावर पूर्णपणे अवलंबून असणे हानिकारक आहे.

जेव्हा ही आवश्यकता खूप जास्त असते, तेव्हा येथे आपण प्रयोग करू शकता.

‘का’ हा प्रश्‍न विचारा
कोणीतरी आपल्याला महत्त्व द्यावे ही अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःला विचारा ‘मी महत्त्व का शोधत आहे?’, ‘केवळ विशिष्ट लोकांकडूनच का’, ‘मी स्वतःला महत्त्व का देत नाही?’

संतुलन शोधा
संतुलन याचा उत्तम मार्ग आहे. काही लोकांकडून मला किती प्रमाणात महत्त्व अपेक्षित आहेस, हे ठरवावे लागेल. नेहमीच महत्त्व मिळवण्याचे आणि नेहमीच स्वतःला महत्त्वाचे बनविण्याचे संतुलन. महत्त्व न देणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्हाला न मागता जे महत्त्व देतात त्यांच्याकडे लक्ष द्या. त्याची जाणीव ठेवा. त्यांना महत्त्व द्या.

आनंद घेण्यासाठी आपली ऊर्जा वाचवा
महत्त्व देणे आणि महत्त्व मिळविण्याच्या संघर्षात आपण या क्षणाचा आनंद घेण्यास विसरून जातो. ऊर्जा वाया घालविण्याऐवजी, काही क्षणांचा आनंद घ्या. आपणच प्रेमाचे स्रोत बनल्यावर आपले महत्त्व काही प्रमाणात स्वयंचलितपणे संतुलित होते. परंतु योग्य भावनिक गरज शोधायला हवी.

स्वतःला  विचारा
1) मला प्रेम की महत्त्व हवे आहे?

2) मी या गरजेचा उगम न शोधता विशिष्ट लोकांनाच महत्त्व देत आहे किंवा अपेक्षा करत आहे का?

3) मी माझे ‘महत्त्व देण्याचे’ व ‘महत्त्व घेण्याचे’ संतुलन कसे आखू?

लक्षात ठेवा, जेव्हा आपण नेहमीच इतर लोकांकडून महत्त्व मिळावे ही अपेक्षा करत राहतो, तेव्हा बिनशर्त प्रेम आणि कनेक्शन स्थापित होत नाही. आवश्यकतेनुसार स्वत:ला महत्त्वाचे बनविणे व अपेक्षा न ठेवता इतरांना महत्त्व देणे चुकीचे नाही. भावनिक गरजेची जागरूकता हाच आनंदी आयुष्याचा पाया आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com