Todays Our Language
sakal
आजचं जगणं पकडायची धडपड करताना आजच्या लेखक-कवींना भाषिक संकराशिवाय पर्याय नाही. गेल्या काही वर्षांत अनेक क्रांती झाल्या. विविध ‘सोशल नेटवर्किंग साइट्स’ आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाल्या. त्यातून आभासी जग, प्रत्यक्ष जग अशी दोन जगं तयार झाली.
त्यामुळे सध्याच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुकच्या काळात चिन्हांचा आणि प्रतिमांचाही समावेश आमच्या भाषेत झालाय. उदा. विन्डोज ११. इथे इलेव्हनऐवजी अकरा असं लिहिलं तर चालणार नाही. तिथे तो अंकच हवा, तोही इंग्रजीच हवा. कारण ११ हे त्या सॉफ्टवेअरच्या व्हर्जनचे नाव आहे. तो एक संकेत आहे जो आहे तसाच कोणत्याही भाषेत घेणं अपरिहार्य आहे. किंवा सोशल साइट्सवर भावना व्यक्त करणारी इमोटिकॉन्स. त्यांनी नेणिवेत आणि भाषेतही शिरकाव केला आहे. (आपण पुन्हा चित्रलिपी वापरायला लागू की काय अशी शंका यावी एवढा!) त्यामुळे जगण्यावर पडत असलेला तंत्रज्ञानाचा प्रभाव, इमोटिकॉन्ससारख्या चिन्हांचा वापर करून व्यक्त केल्या जाणाऱ्या भावना आणि आभासी जग व वास्तव जग यांचा एकमेकांवर पडत असलेला प्रभाव, त्यातले ताणेबाणे व्यक्त करण्यासाठीही वेगळी भाषा घडवण्याचं काम आजचे लेखक-कवी करताना दिसतात.