कासवांचं गाव - वेळास

अरविंद तेलकर
शुक्रवार, 7 जून 2019

गेल्या काही दशकांत वेळासचा समुद्रकिनारा अधिक प्रसिद्धीस आला आहे, तो ऑलिव्ह रिडली टर्टल्समुळं.

वीकेंड पर्यटन
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला वेळास नावाचं एक टुमदार कोकणी गाव आहे. विविध कारणांमुळं हे गाव प्रसिद्ध आहे. मराठेशाहीच्या अखेरच्या पर्वात शर्थीनं पेशवाई राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाना फडणवीसांचं हे मूळ गाव. वेळासपासून जवळच ऐतिहासिक बाणकोटची खाडी आणि किल्ला आहे. गेल्या काही दशकांत वेळासचा समुद्रकिनारा अधिक प्रसिद्धीस आला आहे, तो ऑलिव्ह रिडली टर्टल्समुळं. वेळासचे नागरिक आणि चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेमुळं आयुष्यभर समुद्रात राहणाऱ्या आणि विणीसाठी वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या कासवांना आणि त्यांच्या पिलांना अभय मिळालं आहे.

वेळासला समुद्रकिनारा आहे आणि जवळच बाणकोटची खाडीही असल्यानं पर्यटकांची इथं चांगलीच वर्दळ असते. वेळास बीचबरोबरच या परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. गावातच एक पुरातन श्री भैरी रामेश्‍वराचं मंदिर आहे. या मंदिराला जगभरातील पर्यटक भेट देत असतात. मंदिरात आल्यानंतर मनाला अपार शांती मिळते, असं अनेक भाविकांचं मत आहे. नाना फडणवीसांचं मूळ घर आणि लक्ष्मीचं मंदिर ही आणखी दोन ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. संध्याकाळी वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्तही छान दिसतो. वेळासपासून जवळच बाणकोट गाव आहे. गावाजवळूनच वाहणारी सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते. नदीचं गोडं पाणी आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळं नदीचं रूपांतर खाडीत झालं आहे. बाणकोट गावाजवळच एका टेकडीवर बाणकोटचा चौकोनी किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास पहिल्या शतकापर्यंत जातो. त्या काळात त्याचं नाव मनगोर किंवा मंदारगिरी असं होतं. त्या काळात बाणकोटची खाडी परदेशी व्यापारासाठी प्रसिद्ध होती. देश-विदेशातील व्यापाऱ्यांची गलबतं बाणकोटच्या खाडीत मालाची चढ-उतार करत असत. मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर या किल्ल्याचं नाव हिंमतगड असं ठेवण्यात आलं. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची सुमारे ३०० फूट आहे. हा किल्ला १५४८ मध्ये विजयपूरच्या (विजापूर) आदिलशहाच्या ताब्यात गेला. सन १५४८ ते १६९९ पर्यंत तो पोर्तुगीजांच्या, १६९९ ते १७१३ पर्यंत जंजिऱ्याच्या सिद्दींच्या, १७१३ ते १७५५ पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात आणि सन १७५५ ते १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता.

कोकणात मुबलक आढळणाऱ्या जांभा दगडातच या किल्ल्याची तटबंदी आणि आतील बांधकाम करण्यात आलं होतं. किल्ल्याच्या चहूबाजूनं खंदक आहेत. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. उत्तरेकडचा दरवाजा बाणकोटच्या खाडीच्या दिशेनं आणि पश्‍चिम दरवाजा एका पठाराच्या दिशेनं आहे. उत्तरेच्या प्रमुख दरवाजावर पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. थोड्या अंतरावर नगारखाना आहे. पश्‍चिम दरवाजातून बालेकिल्ल्यापर्यंत जाता येतं. बालेकिल्ल्याजवळच एक भुयार आहे. हा बालेकिल्ला जंजिऱ्याच्या सिद्दींनी बांधला होता. बाणकोटमधलं रामेश्‍वर मंदिर मोरोबादादा फडणवीस यांनी, तर काळभैरवाचं मंदिर नाना फडणवीसांनी बांधलं आहे.

वेळासचं प्रमुख आकर्षण म्हणजे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येणारी ऑलिव्ह रिडली टर्टल्स. या जातीच्या कासवांच्या माद्या दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या सुमारास किनाऱ्यावरील वाळूत अंडी घालण्यासाठी येतात. अंडी घातल्यानंतर ती वाळूखाली झाकून ती मागे न पाहता पुढच्या वर्षापर्यंत समुद्रात निघून जाते. अंड्यातून पिलं बाहेर पडल्यानंतर स्वतःच पाण्याच्या ओढीनं समुद्रापर्यंत जातात. ही वाट त्यांच्यासाठी मोठी खडतर असते. त्यांची शिकार करणारे पक्षी आणि कोल्ह्यांसारखे प्राणी याच काळाची वाट पाहात असतात. विशेष म्हणजे या कासवांचे नर अंड्यातून बाहेर आल्यानंतर कधीच किनाऱ्यावर येत नाहीत. तथापि, २००६ पासून चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेनं संवर्धनाची जबाबदारी घेतल्यानं, या जातीच्या कासवांची संख्या वाढली आहे. फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत त्यांचा कासव महोत्सव चालू असतो.

कसे जाल? ः पुण्याहून तीन मार्गांनी वेळासला जाता येतं. पहिला मार्ग पुणे-मुंबई रस्त्यानं खोपोली-पेण-वडखळ मार्गे, ताम्हिणी घाटमार्गे आणि भोर-वरंध घाट मार्गे जाता येतं. ताम्हिणी मार्गे अंतर सुमारे १९४ किलोमीटर. मुंबईहून २२५, दापोलीहून सुमारे ४५ आणि श्रीवर्धनहून २१ किलोमीटर आहे. वेळास आणि बाणकोट या दोन्ही गावांत अनेक रिसॉर्ट आणि होम स्टे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tortoise village velas