पर्यटनामुळे चौकुळची चौफेर प्रगती...

चौकुळ हे आंबोलीला लागून असलेले आणि काहीशी तशीच जैवविविधता लाभलेले गाव.
Choukul village
Choukul villagesakal
Updated on

चौकुळ या आंबोलीजवळ असलेल्या गावाने मागासलेपणाच्या वेदना सहन केल्या; पण एका क्षणी गावाने ठरवले. गाव एकवटले आणि पर्यटनाच्या नकाशावर आपले नाव मिरवू लागले.

चौकुळ हे आंबोलीला लागून असलेले आणि काहीशी तशीच जैवविविधता लाभलेले गाव. येथे सुविधा आणि रोजगाराच्या संधी याची मोठी वानवा. त्यामुळे इथला स्थलांतराचा वेग प्रचंड. बारा वाड्यांच्या या गावातील बरीचशी घरे बंदच असायची. अशा गावात पर्यटन वाढू शकते, ही कल्पनाच मुळात स्वप्नवत होती.

सिंधुदुर्गात ग्राम विकासामध्ये काम करणार्‍या लुपिन फाउंडेशन या संस्थेने कोकणभूमी प्रतिष्ठानच्या साथीने येथे पर्यटनासाठी प्रयत्न करायचे ठरवले. योजना, विकास आराखडे असा भडिमार न करता आधी लोकांना विश्‍वासात घेतले. इतकी वर्षे ज्या भौगोलिक प्रतिकूल स्थितीमुळे गाव मागासलेला राहिला त्याचाच वापर करून क्रांती कशी घडू शकते हे पटवून दिले.

यातूनच गावकरी एकत्र आले. १ जुलै २०१२ ला चौकुळमध्ये ग्राम पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सुरूवातीला काही पर्यटकांना येथे आणून येथील लोकजीवन , गावरान जेवण, येथील वेगळेपण, निसर्ग याचा आनंद आणि पाहुणचार देण्यात आला. हळूहळू ही संकल्पना आकार घेवू लागली. पर्यटकांसाठी लोकांनी आपली घरे खुली केली. कुटुंबवत्सल पर्यटकांचा ओघ वाढू लागला.

पहिल्या तीन वर्षात चढत्या क्रमाने पर्यटकांचा ओघ पाहून गावकरीही आणखी उत्साहाने यात उतरले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांशी चौकुळवासियांचे नातेच तयार झाले. पर्यटकांना काय हवे याचा अंदाज स्थानिकांना येवू लागला. त्यातून त्यांनी आपल्या घरांमधील सुविधांमध्ये सुधारणा केल्या. काहींनी पर्यटकांसाठी खोल्या बांधल्या.

काहींनी अस्सल गावरान जेवणाची सोय केली. मुंबईकर चाकरमान्यांनी आपली बंद घरे पर्यटकांसाठी खुली केली. या सगळ्या सुविधांसाठी गावकऱ्यांनी केलेली वैयक्तिक गुंतवणूक जवळपास दीड कोटीच्या घरात पोहोचली. काही चांगली हॉटेल्सही सुरू झाले. यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सुमारे चाळीस कुटुंबांना रोजगार मिळू लागला.

गावकर्‍यांचा पुढाकार आणि वाढते पर्यटन पाहून प्रशासनासनानेही काही योजना चौकुळमध्ये आणल्या. विशेषतः रोजगार हमीतून याठिकाणी रस्ते झाले. यामुळे काही पर्यटनस्थळे नव्याने पर्यटकांशी जोडली गेली. पाणलोटमधून बंधारे उभारले गेले. रस्त्याच्या माध्यमातून आंबोली ते चौकुळ पारगड किल्ला व कुंभवडे बाबा धबधबा ही ठिकाणे जोडली गेली.

बीएसएनएलने नव्या चार मोबाईल मनोऱ्यांचे काम हाती घेतले. वनविभागही आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाय योजना करताना दिसत आहे. हे सगळे विकासात्मक बदल केवळ गावकऱ्यांनी पर्यटनाच्या दिशेने टाकलेल्या पावलामुळे घडले.

या सगळ्यामुळे गावाचा चेहरामोहराच बदलून गेला. मागासलेपणाचा शिक्का कधीच पुसला गेला. या विकासात शंभर टक्के स्थानिकांनाच रोजगार मिळाला. स्थानिकांच्या सहभागामुळे दारू आणि इतर अनैतिक, बेशिस्त प्रकार वेशीवरच थांबले. त्यातून कुटुंबवत्सल पर्यटक येथे येवू लागले. तिसरा टप्पा आला तो हे पर्यटन स्थिरावण्याचा.

पर्यटनात असलेला विकास समजलेले गावकरी यात अधिक भक्कमपणे उतरले. त्यांनी आपला ग्राहक वर्ग तयार केला. लुपिन या संस्थेने हळूहळू आपला सहभाग कमी कमी करत नेला. आता हे पर्यटनाचे स्थिरावलेले मॉडेल गावकरी सक्षमपणे पुढे नेत आहेत. नवनवे पर्यटक या गावाला जोडले जात आहेत.

संस्कृती हेच मुख्य आकर्षण..

पर्यटनाचे हे मॉडेल याच्या मूळ गुंतवणुकीमुळेही वेगळे ठरते. एखाद्या गावात सरकारी यंत्रणेला पर्यटन विकास करायचा असल्यास आधी कागदावर आराखडे तयार होतात. यात लोकांना काय हवे आणि गावची संस्कृती काय आहे याचा विचार होत नाही. शिवाय करोडो रूपये खर्च केले जातात. यात मूळ गावकरी दुरावतात.

चौकुळमध्ये मात्र गावकऱ्यांनीच पर्यटन कसे हवे हे ठरवले. गावाची ओळख कायम ठेवत तेथील संस्कृती हे पर्यटकांसाठीचे मुख्य आकर्षण असल्याचे मांडले. हे सगळे करण्यासाठी लुपिन या संस्थेने प्रमोशनसाठी अवघा २ लाख १६ हजार इतका खर्च केला. यातूनच गाव बदलून गेले.

शाश्‍वत विकास महत्त्वाचा

गावकऱ्यांच्या एकीमुळे येथे पर्यटन स्थिरावले आहे. याचे फायदे १०० टक्के स्थानिकांना होत आहेत. आमचे हे मॉडेल शाश्वत विकासाला वाहिलेले आहे.

- गुलाबराव गावडे, सरपंच, चौकुळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com