- कीर्तिदा फडके, keertida@gmail.com
माझ्या या अन्नाविषयीच्या सदराची सुरुवात काही फुलांचा खाद्यपदार्थांमध्ये कसा वापर केला जातो, हे सांगत करतेय. वैश्विक खाद्यसंस्कृतीला मी दिलेली ही इवलीशी पुष्पांजली! आपण मोगऱ्यापासून सुरुवात करू या. मी १२ वर्षांची असताना काकांकडे गेले होते, तेव्हा त्याला पिण्याच्या पाण्याच्या तांब्यात मोगऱ्याच्या टपोऱ्या कळ्या टाकताना पाहिले. काही तासांनंतर थोड्या धास्तीनेच मी त्या पाण्याचे काही घोट घेतले आणि त्या मोगऱ्याने सुगंधित झालेल्या पाण्याने कोकणातील घामट वातावरणात माझे मन प्रसन्न झाले.