निसर्गसंपन्न जव्हार

अरविंद तेलकर
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

"विकएंडला"फिरायला जायचंय, नवीन ठिकाणांची माहिती हवी आहे... तर मग वाचा दर शुक्रवारी "सकाळ पुणे टुडे"च्या "मैत्रीण" पुरवणीतील "विकएंड पर्यटन" हे सदर...

वीकएंड पर्यटन
पालघर या नव्यानंच झालेल्या जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या सुरवातीच्या रांगांमध्ये छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे. जव्हार हे त्या ठिकाणाचं नाव. एखाद्या कसलेल्या चित्रकारानं काढलेल्या अचूक चित्रासारखंच! जव्हार ओळखलं जातं त्याच्या सांस्कृतिक वारशामुळे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० फूट उंचीवर सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेलं हे ठिकाण मिनी महाबळेश्‍वर या नावानं ओळखलं जातं. आदिवासी राजघराणं असलेल्या फार थोड्या संस्थानिकांपैकी जव्हार हे एक. शेवटचे संस्थानिक यशवंतराव मार्तंडरावजी मुकणे आणि आदिवासींची वारली चित्रकला, या दोन ठळक गोष्टीमुळे जव्हार तालुका ओळखला जातो. वारली चित्रकला ही या प्रदेशाची जागतिक ओळखच बनली आहे.

महादेव कोळी या आदिवासी जमातीचे वीर राजा जयबा मुकणे यांनी १३४३मध्ये जव्हार संस्थानाची स्थापना केली. जयबा हे जमीनदार होते. उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी परिसरातले २१ किल्ले जिंकून घेतले. भूपतगड हा त्यापैकीच एक मोठा किल्ला. मोगलांनी ज्या काळात देवगिरीवर स्वाऱ्या करून करून यादवांचं राज्य नामशेष केलं, त्याच काळात जव्हार संस्थान आकारास येत होतं. जयबांना दोन पुत्र. पहिले धुळबा आणि दुसरे होळकरराव. जयबा शिवभक्त होते. काळवण या नावानं प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशाचं नाव बदलताना त्यांनी स्वतःच्या नावातला जय आणि शंकराचे भक्त असल्यानं हर हे दोन शब्द जुळवून जयहर असं नाव दिलं. कालांतरानं ते जव्हार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. १ डिसेंबर १६६१मध्ये जव्हारचे तत्कालीन राजे विक्रमशहाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. या भेटीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना भेटीदाखल शिरपेच दिला होता. ज्या ठिकाणी हा सोहळा पार पडला, ते ठिकाण पुढं शिरपामाळ या नावानं प्रसिद्ध झाला. अनेक स्थित्यंतरातून सहीसलामत पार पडून, या राजघराण्यानं तब्बल ६००हून अधिक वर्षं राज्य केलं. ब्रिटिश राजवटीत हा प्रदेश मुंबई इलाख्यात गणला जात होता. संस्थानाचा पसारा तसा मोठा असला, तरी वस्ती प्रामुख्यानं वारली जमातीच्या आदिवासींची आहे. परिणामी, अपेक्षित महसूल मिळत नसल्यानं, या संस्थानाचा फारसा विकास होऊ शकला नाही. तथापि, राजा चौथे पतंगशहा आणि पाचवे आणि शेवटचे पतंगशहा (यशवंतराव मुकणे) यांच्या राजवटीत संस्थानाचा काही प्रमाणात विकास होऊ शकला. स्वातंत्र्यानंतर हे संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झालं.  हिरव्यागार पानझडीच्या गर्द राईत वसलेल्या जव्हार परिसरात पर्यटकांना आवडतील अशी अनेक ठिकाणं आहेत. त्यात शिरपामाळ, सनसेट पॉइंट, मुकणे घराण्याचा जय विलास राजवाडा, दाभोसा, काळ मांडवी धबधबे, खडखड धरण, हनुमान पॉइंट आणि भूपतगड हा किल्ला ही प्रमुख आहेत. पाश्‍चात्त्य आणि भारतीय शैलीचा मिलाफ करून बांधलेला या राजवाड्याची पडझड झाली आहे. हा वाडा गुलाबी रंगाची झाक असलेल्या सायनाईट प्रकारच्या दगडांनी बांधला आहे.

कसे जाल? - पुण्याहून ठाणे, मनोर, विक्रमगड किंवा ठाणे, वडपे, वाडा किंवा नारायणगाव, सिन्नर, देवळाली, मोखाडामार्गे २७० किलोमीटर, मुंबईहून १४१ किलोमीटर, ठाण्याहून ११८ किलोमीटर, नाशिकहून ८० किलोमीटर. 

भोजन, निवास - जव्हारमध्ये निवास आणि भोजनाच्या सोयी उपलब्ध आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travelogue By Arvind Telkar In Maitrin Of Sakal Pune Today