

Tripura Development Model
esakal
मयूर भावे - saptrang@esakal.com
निसर्गसौंदर्य आणि साधनसंपत्तीचे वरदान लाभलेल्या त्रिपुरासारख्या छोट्या राज्यातील नागरिकांच्या महत्त्वाकांक्षा काही वर्षांपासून पल्लवित झाल्या आहेत. स्थानिक उत्पादने आणि कुशल मनुष्यबळ जागतिक बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी सज्ज होत आहे. हेच या राज्याच्या अभ्यासदौऱ्यात जाणवले.
अवघ्या आठ जिल्ह्यांंचं राज्य असलेल्या त्रिपुरामध्ये इतिहास, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम झालेला दिसून येतो. शिक्षण, पर्यटन, कृषी, विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा विकास व्हावा यासाठी ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या (डोनर) अखत्यारीत कार्य करणाऱ्या ईशान्य परिषदेने (एनएईसी) विविध संस्थांना निधी देत विकासकामे करण्याचा धडाका लावला आहे. हा निधी पुरेसा आहे किंवा यामुळे सर्व प्रश्न सुटले आहेत असे नसले, तरी विकासाची दिशा फारसे कोणाचे लक्ष नसलेल्या या सीमावर्ती भागातील नागरिकांना गवसली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
पारंपरिक शिक्षणाबरोबरच आधुनिक उच्च शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळावे आणि त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने सरकारकडून त्रिपुरामध्ये नवीन शिक्षणसंस्था स्थापन केल्या जात आहेत. त्रिपुराची राजधानी असलेल्या आगरताळामध्ये डिसेंबर २०२२मध्ये ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’ सुरू करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे. सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी या महाविद्यालयासाठी देण्यात आला आहे. पदवी आणि पदविका हे दोन्ही अभ्यासक्रम ‘जेएनयू’मार्फत चालवले जातात. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी काही जणांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये नोकरी मिळाल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आधुनिक साधनांच्या खरेदीसह विविध सुविधांसाठीही आतापर्यंत सुमारे एक कोटी ७० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यापैकी एक कोटी ३२ लाख रुपयांची कामे करण्यात आली आहेत. त्या भागात तेवढे एकच पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असल्याने नागरिकांना त्याची नितांत गरज आहे.