

Trump international policy
esakal
अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या जखमा ताज्या असतानाच नव्या जागतिक व्यवस्थेच्या जडणघडणीत मोलाचा पुढाकार घेतला होता. मित्रराष्ट्रांची सैन्ये युरोपमध्ये शिरण्याआधीच अमेरिकेने एका आंतरराष्ट्रीय संस्थेची गरज ओळखत त्या दिशेने काम करायला सुरुवात केली होती. १९३०च्या दशकातील ग्रेट डिप्रेशन या आर्थिक संकटकाळाच्या आठवणी अद्याप ताज्या होत्या. आर्थिक अराजकता आणि विषारी राष्ट्रवादाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एका जागतिक संस्थेची गरज असल्याची अमेरिकेची भूमिका होती. पहिल्या महायुद्धानंतर उदयास आलेल्या आदर्शवादी उदार आंतरराष्ट्रीयतावाद यातून बहुपक्षीयतेचा जन्म झाला. इमॅन्युएल कांट, नॉर्मन एंजेल आणि वुड्रो विल्सन यांसारख्या विचारवंतांच्या प्रेरणेने आकारास आलेली ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक वास्तववादी झाली. तिने केवळ सहकार्यावर नव्हे, तर सत्तास्पर्धेच्या वास्तवाशी तडजोड करणाऱ्या संस्थात्मक चौकटीचा आकार घेतला. जुलै १९४४ मध्ये अमेरिकेच्या धोरणकर्त्यांनी न्यू हॅम्पशायरमध्ये घेतलेल्या एका सभेत जागतिक चलन स्थिर ठेवण्याच्या आणि हानिकारक व्यापार धोरणांना लगाम घालण्याच्या उद्देशाने जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांची स्थापना झाली. त्यानंतर जून १९४५मध्ये अमेरिकेने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आयोजित एका परिषदेत सामूहिक सुरक्षा, मानवाधिकार आणि राजनैतिक सहकार्य यांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेत कळीची भूमिका बजावली. त्यानंतर दशकानुदशके अमेरिकेने बहुपक्षीयतेला उत्तेजन दिले, केवळ एक नैतिक कर्तव्य म्हणून नव्हे, तर जागतिक नियम आकारण्याचे धोरणात्मक मार्ग म्हणून. १९४५नंतर अमेरिकेला खात्री पटली; की वाढ एकाकी राहून नव्हे, तर जगाशी संवाद साधत सहकार्यानेच शक्य आहे.