चक्रीवादळं, पर्यावरणबदल आणि सुंदरबन

बदलतं तापमान, पाऊसमान, किनारपट्टीजवळ जाणवणारी समुद्राची वाढलेली पातळी आणि समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढल्यानं वारंवार येणारी चक्रीवादळे, असे सुंदरबनातील पर्यावरणाचं बदलतं चित्र चिंताजनक होतंय.
Sundarban
SundarbanSakal

बदलत्या पर्यावरणाचा सुंदरबनसारख्या संवेदनशील त्रिभुज प्रदेशावर मोठा परिणाम होतो आहे. हा परिणाम केवळ भौगोलिक नाही. इथं वास्तव्य करणाऱ्या समुदायांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवरही त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. चक्रीवादळांची वारंवारता वाढल्याने त्यात भरच पडली आहे.

बदलतं तापमान, पाऊसमान, किनारपट्टीजवळ जाणवणारी समुद्राची वाढलेली पातळी आणि समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढल्यानं वारंवार येणारी चक्रीवादळे, असे सुंदरबनातील पर्यावरणाचं बदलतं चित्र चिंताजनक होतंय. पृष्ठभागावरील तापमान सातत्यानं वाढत असल्याचं गेल्या दोन दशकांमधील अभ्यासातून दिसून आलं आहे. तसंच, पावसाळ्याचे दिवस कमी होत असतानाच एकूण पाऊस पडण्याचं प्रमाण मात्र वाढत चालल्याचंही दिसून आले आहे. म्हणजेच, कमी कालावधीत अधिक मुसळधार पाऊस पडतो आहे. गेल्या शतकापासून जूनमध्ये पडणाऱ्या पावसात घट झाली. त्यामुळे पारंपरिक पीक पद्धतीवर आणि कृषी उत्पादनावरही विपरीत परिणाम झाला आहे. मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूननंतरही अनियमित पडणाऱ्या पावसामुळं कृषी उत्पादकता कमी झाली आहे, शिवाय भौतिक आणि आर्थिक प्रभावही पडला आहे. या भागातील समुद्रपातळी किती प्रमाणात वाढली, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये अद्याप एकमत नसले तरी, ती दरवर्षी साधारणपणे २.३६ मिमी ते १७.८ मिमी या वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे. समुद्राची पातळी वाढण्याच्या जागतिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण जास्तच आहे.

एकुणात, समुद्र पातळी चढत्या प्रमाणात वाढ होत असल्याचं सर्वच संशोधनातून सिद्ध झालं आहे. आणखी सुमारे तीस वर्षांनी, म्हणजे २०५० मध्ये सुंदरबनाजवळील समुद्राची पातळी दरवर्षी २० मिमी या वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या दहा दशकांमधील चक्रीवादळांची माहिती तपासली तर, वारंवार आणि तीव्र चक्रीवादळे येण्याचे प्रमाण वाढले असून त्यांची परिणामकारकताही वाढत असल्याचे दिसून आले आहे. ऐला (२००९), बुलबुल (२०१९), अम्फन (२०२०) आणि यास (२०२१) या चक्रीवादळांच्या प्रभावामुळे जनतेच्या रोजीरोटीवरही परिणाम झाला आहे. नैसर्गिक आपत्तीसाठीची पूर्व तयारी आणि निवारणाच्या सक्षम यंत्रणेचा अभाव, कमकुवत यंत्रणेत आणि आपत्ती प्रतिसाद प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याची मानसिक तयारी नसणे याचा एकत्रित परिणाम म्हणून या भागातील जीवनमानाचे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठी जीवितहानीही सहन करावी लागली आहे.

मॉन्सूनचा पाऊस कोसळण्याच्या मुख्य कालावधीत बदल झाल्याने भातलावणीच्या पारंपरिक वेळेवर पाणीच उपलब्ध नसण्याचे प्रकार घडत आहेत. चक्रीवादळांमुळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या नुकसानीशिवाय, अनियमित पावसामुळे पेरणी आणि कापणी अशा दोन्ही प्रमुख वेळी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. याचवेळी, मानवी हस्तक्षेपाचीही त्यात भर पडल्याने सुंदरबनच्या परिसंस्थेवर परिणाम होत आहे.

त्यामुळे सर्वच सामाजिक - पर्यावरण सृष्टीवर प्रभाव पडत आहे. गंगा नदीवर धरणे किंवा कालवे बांधून, शेती किंवा उद्योगांसाठी तिचा प्रवाह वळवून तिच्या प्रवाह मार्गात केलेल्या हस्तक्षेपांमुळे सुंदरबनाच्या त्रिभुज प्रदेशाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या तिच्या उपनद्या आटल्या. या हस्तक्षेपाचा परिणाम नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होण्यात, नदीच्या खोऱ्यात गाळ साचून राहण्यात आणि नदीच्या त्रिभुज प्रदेशात गाळ आणून टाकण्याच्या प्रमाणात घट होण्यात झाला. तसेच, नदीकिनाऱ्यांची आणि किनारपट्टीचाही झीज झाली. हुगळी नदीमधील (गंगा नदीचा शेवटाकडील प्रवाह) सर्वांत मोठा हस्तक्षेप म्हणजे हल्दीया बंदरासाठी जलमार्ग निर्माण करण्यासाठी नदीपात्रात भिंत बांधण्यात आली. त्यामुळे जलसाठ्याच्या स्थितीमध्ये मोठा बदल घडून आला आणि त्रिभुज प्रदेशाच्या भागातच मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप झाली. पर्यावरण बदल आणि मानवी हस्तक्षेप यांच्या एकत्रित परिणामातून या प्रदेशावर कोणाचा अधिक प्रभाव आहे, हे शोधण्याचा कधीही प्रयत्न झाला नाही.

परिसंस्था आणि नागरिकरणावरील प्रभाव

वातावरणातील तापमान आणि पाऊसमान यांच्यात झालेला बदल, समुद्रपातळीतील वाढ आणि वारंवार येणारी चक्रीवादळे यामुळे परिसंस्थेवर आधारित जीवनमानावर प्रभाव पडत आहे. या बदलांमुळे नैसर्गिक सांस्कृतिक वारसा हरवत चालला असून समाजाच्या काही पारंपरिक पद्धतीही बदलाव्या लागत आहेत.

पर्यावरणाशी संबंधित घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने लोकांच्या जीवनमानाला फटका बसत आहे. या लोकांना जगण्याचे दुसरे साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांनी नवी पद्धत वेगाने अंगीकारणे, ही एक आवश्‍यकता बनली आहे. यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रयत्नांमध्ये अपयश येत असल्याने या परिसंस्थेवर लोकांच्या गरजा भागविण्याचा मोठा ताण पडत असून तिची चहूबाजूंनी हानी होत आहे.

लोकांच्या जीवनमानाचे संरक्षण करण्यासाठीचे प्रयत्न ज्यावेळी अपुरे ठरतात, त्यावेळी ते इतर अनेक मार्गांनी उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, यापूर्वी जे लोक शेती करत होते, ते हळूहळू नदीतील मासेमारीकडे, खेकड्यांची विक्री करण्याकडे वळले. काही जण रोजंदारीवरही कामे करू लागली. नोकरीच्या संधी नसणे आणि लोकांमध्ये योग्य कौशल्यांचा अभाव यामुळे लोकांनी इतर जिल्हे आणि राज्यांमध्ये मजुरी करण्यासाठी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. खात्रीशीर उत्पन्न मिळविण्यासाठी आणि कुटुंबाला जगविण्यासाठी विशेषत: पुरुषांनी स्थलांतराचा मार्ग स्वीकारला. अशा पद्धतीने, कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेचे रूपांतर हळूहळू मजुरीवर आधारित अर्थव्यवस्थेवर झाले.

बदलाचे परिणाम

पूर्वीच्या काळी, या भागातील जातीव्यवस्थेचा धागा विशिष्ट व्यवसायाशी जोडलेला होता. उदाहरणार्थ, ‘जेले कोईबोर्तो’ हे लोक आधी नदीच्या पाण्यात मासेमारी करत असत. तेच आता शेतमजूर, रोजंदारी, खेकडे गोळा करणे अशी कामे करतात. मानवी वर्चस्ववादाचे हे युग स्पर्धात्मक ठरत आहे, त्याने रोजगारावर आधारित पारंपरिक जातीव्यवस्थेची कुंपणे मोडून काढली आहेत. याला सुंदरबनमधील मूलनिवासी असलेल्या काही जमाती मात्र अपवाद ठरल्या आहेत. त्रिभुज प्रदेशातील समुदायांमध्ये हा वर्ग अद्यापही वनांमधील स्रोतांवरच अवलंबून असलेला, गरीब आणि शोषित राहिला आहे. सुंदरबनमधील सर्व निवासी हे स्थलांतरीतच आहेत. ते एकतर छोटा नागपूर पठारावरील जमातींधून, बांगलादेशातून किंवा मेदिनीपूर/ओडिशाच्या किनारपट्टीवरून येथे दाखल झाले आहेत. या जमातीची लोकसंख्या त्रिभुज प्रदेशात छोट्या छोट्या भागांमध्ये, जवळपास प्रत्येक बेटावर विखुरलेली आहे. मातला नदीमुळे बांगलादेशी नागरिक किनाऱ्याच्या पूर्व भागापर्यंत सीमित राहिले असून उर्वरित समुदाय नदीच्या पश्‍चिम किनाऱ्यावर आढळतात. मातला नदीच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यांवर अत्यंत भिन्न सांस्कृतिक वारसा जपला जातो.

उपाय कोणते?

भारताच्या प्रचंड भूभागाच्या तुलनेत फारच अल्पप्रमाण असलेले त्रिभुज प्रदेश सहसा दुर्लक्षितच राहिले आहेत, सुंदरबनही त्याला अपवाद नाहीत. हा त्रिभुज प्रदेश ग्रामीण असून गरिबीत राहणाऱ्या लोकांचे प्रमाण मोठे आहे, त्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा आणि सेवाही फार मर्यादित आहेत. यातच भर म्हणून की काय, पर्यावरणाच्या बदलत्या स्थितीमुळे या त्रिभुज प्रदेशावर पडणाऱ्या अतिरिक्त ताणाचा त्यांच्या जीवनमानावरही विपरीत परिणाम होत आहे. चक्रीवादळानेही त्यांना चांगलेच तडाखे दिले आहेत. या भागातील बहुतेक पर्यावरणीय घडामोडींवर आणि समाजाच्या व्यवहारांवर पाण्याचे नियंत्रण आणि प्रभाव आहे. मग ते पाणी पावसाचे असो, नदीचे असो वा बंगालच्या उपसागराचे असो, व्यापकता आणि परिणामकारकता या दोन्ही अंगांनी हा प्रभाव दिसून येतो. म्हणजेच, सुंदरबनाकडे भूपृष्ठीय परिसंस्था म्हणून पाहण्यापेक्षा पाण्यावर आधारित परिसंस्था म्हणून पाहणे आवश्‍यक आहे. सुंदरबनाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी अनेक अल्पकालीन योजना, प्राधान्य क्रमाने करायच्या कृती यांचा समावेश असलेल्या एका दीर्घकालीन योजनेची अत्यंत आवश्‍यकता आहे. पर्यावरण बदल, परिसंस्थेशी संबंधित घटना आणि जीवनमान यांच्यातील परस्परसंबंध नीट समजावून घ्यायला हवेत. त्याबरोबरच संवेदनशील समाज आणि स्थिर परिसंस्थेसाठी नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्याची जय्यत पूर्वतयारी आणि नुकसान कमी करण्यासाठी पावले उचलणेही आवश्‍यक आहे. विकासाच्या आराखड्यात आपत्ती व्यवस्थापनाचाही समावेश असणे गरजेचे आहे.

- तुहीन घोष saptrang@esakal.com

(लेखक हे पश्‍चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठातील सागरीशास्त्र विभागाचे संचालक आणि प्राध्यापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com