ते दोन अविस्मरणीय पावसाळी दिवस

gadchiroli-rains-
gadchiroli-rains-

समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या निर्झर बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती.

५ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरहून परत घरी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे जाण्यास निघालो. नागपूर ते हेमलकसा जवळपास ३५० किलोमीटर अंतर आहे. वाटेत स्व. बाबा आमटेंची मुख्य कर्मभूमी आनंदवन लागत. ते नागपूरहून १०० किलोमीटर आहे. १२ वाजता तिथे पोहोचलो. आजीची (स्व. साधनाताई आमटे) भेट घेतली. काका-काकूंना भेटलो आणि सुमारे १ वाजता पुढील प्रवासासाठी निघालो.

टाटा सुमो गाडी होती. मी आणि चालक दोघच. सोबतीला दवाखान्याची औषधे आणि शाळेतील मुलांच्या सामानाची खरेदी (प्रकल्पात लागणाऱ्या सर्व सामानाची खरेदी नागपुरातून केल्या जाते). गाडी खचाखच भरली होती. दोन समोरच्या सीट्स फक्त मोकळ्या होत्या चालक आणि माझ्यासाठी. २ वाजता चंद्रपुरात पोहोचलो. नुकतीच पावसाला सुरवात झाली होती. हळूहळू गाडीचा आणि पावसाचा वेग वाढू लागला. सुमारे ४ वाजताच्या सुमारास आम्ही आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली या प्रकल्पात पोहोचलो. अजून पुढे ६० किलोमीटर हेमलकसा होते.

नागेपल्ली प्रकल्प हा शेती प्रकल्प आहे. तिथे जगन मचकले नावाचे आमचे कार्यकर्ते राहतात. २५ एकर जमीन आहे. तिथे येणारे थोडेफार भाजीपाल्याचे उत्पन्न हेमलकसा च्या शाळेसाठी वापरले जाते. हेमलकसा प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळात आनंदवन ते हेमलकसा एका दिवसात पोहोचणे केवळ अशक्य होते, कारण नागेपल्ली नंतर रस्ताच नव्हता. हे ६० किलोमीटर अंतर जाण्यासाठी प्रचंड घनदाट जंगल, नद्या, अनेक ओढे तुडवत चालत किंवा सायकलने जावे लागायचे. २ दिवस त्यात जायचे. म्हणून आनंदवन येथून येणारा माणूस किंवा बाबा-आजी पहिल्यांदा नागेपल्ली ला मुक्काम करायचे.

आनंदवन ते नागेपल्ली छोटा रस्ता होता. त्यामुळे तिथ पर्यंत गाडी येऊ शकत होती. सुमारे १२ वर्ष हा त्रास झाला. सुरवातीचे १२ वर्ष पावसाळ्यानंतरचे ६ महिने जगाशी कसलाही संपर्क नसायचा. जगन मचकले त्या काळात आनंदवनातील निरोप घेऊन चालत किंवा सायकलने हेमलकसाला यायचा. तसेच इकडचा निरोप तिकडे पोहोचवायचा. खूप पाऊस असलाकी ते पण शक्य होत नसे. असो.

नागेपल्ली प्रकल्पात चहा कॉफी घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. गाडीचे वायपर सुरु होते पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे चालकाला गाडी अगदी हळू चालवावी लागत होती. तसाही रस्ता अतिशय फुटला असल्याने गाडी काही ५० च्यावर नेता येत नाहीच. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपा भारतात अनेक ठिकाणी आढळून येईल. नागेपल्लीहून सुमारे ४० किलोमीटर दूर एक कुडकेली नावाचे गाव आहे. त्या गावाच्या शेजारून एक ओढा वाहतो. त्याला कुडकेली चा नाला म्हणतात. तिथ पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो.

४० किलोमीटरचे अंतर आम्ही ९० मिनटात कापले. ओढ्यावर अगदीच लहान पूल होता. इकडे आम्ही त्याला रपटा म्हणतो. नागेपल्ली प्रकल्पातून निघतांना मनात धाक-धुक होतीच. इतका पाऊस पडतो आहे तर कदाचित आपण १० रपटे असलेल्या या रस्त्यावर कुठेतरी अडकू. आणि झालेही तसेच. कुडकेलीचा नाला प्रचंड वेगात रपटयाच्या सुमारे ३ फूट वरून वाहत होता.

आमच्या आधी २ सरकारी बसेस तिथे येऊन थांबल्या होत्या. संध्याकाळचे ६ वाजले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. सुमारे ६.३० वाजता पुलावरील पाणी १ फुटाने खाली गेले. मग एका बस चालकाने त्या २ फूट पाण्यातून बस काढली. माझ्या सोबत असलेला चालक थोडा घाबरत होता गाडी काढायला. आमची गाडी तशी छोटी होती. त्याला भीती वाटणे स्वाभाविक होते. मग मी त्याला बाजूला बसविले आणि गाडी चालू केली. पाणी जरी कमी झाले होते तरी जोर खूप होता प्रवाहाचा. गाडी बंद पडणे धोकादायक ठरू शकते हे माहित होते.

लहानपणी अश्या अनेक प्रसंगातून बाबाने (प्रकाश आमटे) रस्ता, पूल नसतांनाही गाडी काढलेली आम्ही पाहिले होते. जर अजून आपण इथे जास्त वेळ घालवला तर पुढील सर्वच ओढे आपल्याला अडवतील आणि इथेच अडकून पडावे लागेल. आधी २ वेळा चालत जाऊन मी तो पूल व्यवस्थित आहे का? की वाहून गेलाय याची नीट खात्री करून घेतली. मग संपूर्ण विचार करून मी गाडी पुढे न्यायला सुरवात केली. गाडीचा वेग वाढविला. माझी गाडी २ फूट उंच पाण्याची धार कापत दुसऱ्या तीरावर सुखरूप पोहोचली. ७०-८० फुटाचे ते अंतर होते. मध्ये एके ठिकाणी प्रवाहामुळे गाडी थोडी जास्त हलल्याचे जाणविले एवढेच. गाडी जोरात नेल्याने ओढ्याचे पाणी जोरात समोरील काचेवर आपटत होते. गाडी सुखरूप निघाल्याचा आम्हा दोघानाही आनंद झाला. पण धाक-धुक होतीच.

पलीकडच्या तीरावर पोहोचल्या बरोब्बर पावसाने परत कोसळण्यास सुरवात केली. तसेच आम्ही पुढे निघालो. पुढे १० किलोमीटर वर ताडगाव नावाचे छोटे खेडे लागते. तिथून २ किलोमीटर अंतरावर पुन्हा एक छोटा ओढ वाहतो. त्या ओढ्याचे नाव ताडगाव नाला. ताडगाव पार करून आम्ही हेमलकसाच्या दिशेने पुढे निघालो. तेव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. आता १० किलोमीटर दूर होते घर. २० मिनिटांचा वेळ लागणार होता. दोघानाही चांगलीच भूक लागली होती. कधी घरी पोहोचतोय असे झाले होते. पण ताडगाव नाल्याजवळ येताच गाडी थांबवावी लागली.

हा ओढाही फुगला होता. अंधार पडला होता म्हणून नेमके त्या पुलावरून किती फुट पाणी वाहतंय याचा अंदाज घेता येत नव्हता. पावसाचा वेग काही केल्या कमी होईना. तो वाढतच होता. अंधारात गाडी पुलावरून पाणी असतांना नेणे धोकादायक होते. म्हणून आम्ही दोघे गाडीत बसून पाऊस कमी होण्याची वाट पाहायला लागलो. पाऊस पडत असल्याने पुलावरील पाण्याची पातळी चांगलीच वाढल्याचे आम्हाला गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात दिसले. आणि आज घरी काहीही केले तरी पोहोचता येणार नाही याची खात्री झाली.

रात्रीचे ८ वाजले होते. पोटात कावळे बोंबलत होते. मग विचार केला की ताडगाव गावात जाऊन एखादे दुकान किंवा छोटे हॉटेल सुरु असेल तर काहीतरी खाऊन यावे. म्हणून गाडी वळवली. ताडगाव ची हद्द जिथे संपते तिथलाही ओढा आता प्रचंड वेगाने पुलाच्या वरून वाहायला लागला होता. त्यामुळे गावात जाणे पण अशक्य झाले होते. २ किलोमीटरच्या अंतरा मध्ये आणि २ ओढ्यांच्या मध्ये आम्ही अडकलो होतो. परत गाडी वळवली आणि ताडगाव नाल्या जवळ येऊन थांबलो.

अतिशय शांत जंगलात, निर्मनुष्य जागी आणि प्रचंड काळोखात माझी गाडी उभी होती. फक्त आवाज होता तो पावसाचा. गाडीच्या पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा. त्या घनदाट जंगलात मी आणि चालक नामदेव असे दोघच होतो अडकलेलो. सरकारी बस चालकाने बस आधीच ताडगाव मध्ये उभी केली होती. त्यात ७-८ प्रवासी होते. ते गावात अडकल्याने सुखी होते. आता आम्हाला गाडीतच बसल्या सीटवर झोपावे लागणार होते. ते ही उपाशी. तेवढ्यात मला आठवलेकी नागेपल्ली प्रकल्पातून मुक्ताकाकू (जगन मचकले यांची पत्नी) ने मला आवडतो म्हणून चिवडा दिला होता. मग त्या चिवड्यावर आम्ही ताव मारला आणि तो फस्त केला. त्याने काही पोट भरले नाही. पण पोटाला आधार मिळाला. आता अजून गाडीत काहीही खायला नव्हते. आणि तसेच झोपावे लागणार होते. मग आम्ही दोघेही झोपायचा प्रयत्न करू लागलो. प्रवासाचा थकवा असल्याने अधे-मध्ये झोप लागत होती. कशी बशी रात्र सरली.

सकाळी ६ वाजता सुद्धा पाऊस सुरु होता. पण रात्रीपेक्षा थोडा जोर कमी झाला होता. ६ ऑगस्ट हा माझा वाढदिवस असतो. अर्थात मी कधीही तो साजरा करत नाही. पण अनेकांचे फोन, ईमेल आणि मोबाईलवर संदेश येत असतात. संवाद साधण्याचे हे एक निमित्त मिळते एवढेच. आधीच पावसामुळे इकडील फोन आणि वीज गेले ७-८ दिवसांपासून बंदच होती. नागेपल्ली प्रकल्पापर्यंत फोन आणि वीज नीट सुरु होती.

मी परत आलो नाही म्हणजे मी कुठेही अडकलो नाही असे नागेपल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांना वाटले आणि इकडे आई-बाबांना वाटले की मी नागेपल्ली येथे पाऊस असल्याने थांबलो असेन. दोन्ही कडील लोक असा विचार करून सुखी होती. फोन बंद होता हे बरेच झाले. नाहीतर नागेपल्ली येथून हेमलकसाला मी कुठे आहे हे कळले असते आणि इकडे आई-बाबा आणि इतरांना काळजी लागून राहिली असती.

उठल्या बरोब्बर मी नाला चालत पार करून पाहून आलो. दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण या ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचा सिमेंट कॉन्क्रेट चा स्लाब वाहून गेला होता. पुलावर ८ फूट रुंद आणि सुमारे दीड फूट खोल असा मोठा खड्डा पडला होता. असे काही होईल याची खात्री होती म्हणूनच रात्री गाडी काढायचा मी प्रयत्न केला नाही. अजूनही त्या पुलावर ३ फूट पाणी होते. ते पाणी पूर्णपणे उतरेपर्यंत गाडी काढणे शक्य नव्हते.

सकाळी ६ ला कमी झालेल्या पावसाने ८ वाजता परत जोर धरण्यास सुरवात केली. म्हणून आम्ही लगेच गाडी वळवली आणि ताडगाव ला जावून काहीतरी खायला मिळतंय का ते पाहू असे ठरविले. ताडगाव जवळील नाला ओसरला होता. परत भरण्या आधी ताडगाव ला जाणे गरजेचे होते. गावात पोहोचलो. पण सर्व हॉटेल्स बंद होती. विचारले असता पावसात आम्ही काहीही करत नाही असे उत्तर मिळाले.

तेवढ्यात माझा लोक बिरादरी शाळेतील जुना माडिया मित्र जुरू मला भेटला. तो सध्या शाळेत शिक्षक होता. त्याने आम्हाला घरी जेवायला घातले. २४ तासाच्या उपासानंतर आम्हाला जेवायला मिळाले होते. मी त्याचे आभार मानले. मला माहिती होते की जुरू इथे राहतो. पण उगाच कोणालाही आपल्यामुळे त्रास नको म्हणून मी त्याच्या घरी गेलो नाही. त्याने मला गाडीत बसलेला पाहिले. आणि घरी जेवायला येण्याचा खूप आग्रह केला. मला आणि मुख्य म्हणजे चालकाला जास्त भूक लागली होती. म्हणून का-कु न करता सरळ त्याच्याकडे आम्ही जेवायला गेलो. अतिशय साधी झोपडी होती त्याची. बायको २ मुलं असा परिवार. मी त्यांच्याकडे जेवतोय यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांना खूपच आनंद झाला आहे हे स्पष्टपणे त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होत. दुपारी सुमारे १२ वाजता आम्ही त्याच्याकडे जेवलो. पाऊस कमी होण्याचे नाव घेत नव्हता. आज अडकलात तर इकडे आमच्याकडेच रात्री जेवायला आणि झोपायला या असा जुरू सतत आग्रह करीत होता.

आम्ही १ वाजता परत गाडीत जाऊन बसलो आणि ताडगाव नाल्याजवळ येऊन थांबलो. ओढ्यावर पाणी तेवढेच होते. पाणी ओसरल्यावर पुलावरील खड्डा भरावा लागणार होता. तेव्हाच कुठे आमची गाडी निघणार होती. पाऊस थांबायची वाट आणि नाल्यावरील पाणी ओसरायची वाट पाहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. ६ तारखेची रात्र पण इथेच घालवावी लागणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. जुरुने आग्रह केल्याने आम्ही रात्रीचे जेवण त्याच्याकडेच केले. भात आणि आता थोडे वरण असे साधे त्यांचे जेवण असते. त्यात कधी कधी मासोळी किंवा चिकनचे तुकडे असतात. मी खात नाही म्हणून त्याने साधे जेवण केले. कोंबडी कापुका म्हणून त्याने विचारले होतेच. रात्रीचे जेवल्यावर आम्ही गाडीतच झोपलो. त्याचे घर लहान. जागा कमी. म्हणून आम्ही गाडीतच झोपणे पसंत केले. ६ ची रात्र पण तशीच गाडीत झोपून काढली.
६ ऑगस्टला रात्री १२ नंतर पावसाने विश्रांती घेतली. सकाळी ६ वाजता नाल्याचे पाणी पुलाच्या खाली गेले होते. आता तो पुलावरील खड्डा स्पष्ट दिसत होता. लगेच आम्ही दोघं दगड गोळा करून तो खड्डा बुजवायला लागलो. ४५ मिनिटात गाडी जाईल एवढा खड्डा आम्ही बुजविला. आणि लगेच गाडी काढली. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते.

हेमलकसाच्या आधी ४ किलोमीटर वर कुमरगुड्याचा नाला आहे. त्या नाल्यावरचा पुलाच्या स्लाब चा एक भाग वाहून गेला होता. पण एका बाजूने आम्हाला गाडी काढता आली. हा पूल रपटा एक वर्षा पूर्वीच नवीन बांधला होता. असो.

शेवटी ७ तारखेला ७.१५ मिनिटांनी आम्ही लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसात पोहोचलो. घरी आल्यावर ही कथा सर्वांना सांगितली. २ दिवसांची आंघोळ घरी आल्याबरोब्बर आटोपली. चालकाने पहिले जेवणे पसंत केले. ५-६ ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये २५ सेंटी मीटर पाऊस झाला या भागात. हेमलकासाचे स्वरूप ४ दिवस बेटा सारखे झाले होते. हेमलकसा पासुन ३ किलो मीटर असलेल्या ३ नद्यांना प्रचंड पूर आला होता. त्याचे पाणी हेमलकसाच्या कुंपणा पर्यंत आले होते. सर्व बाजूने लोक बिरादरी प्रकल्पाला पाण्याने वेढा दिला होता. ५-७ वर्षांनी एवढा पूर या भागात अनुभवायला मिळाला. २०१० मध्ये जी परिस्थिती या भागातील रस्ते आणि नाल्यावरील पुलांची होती तशीच परिस्थिती २०२० मध्ये आहे. गेल्या १० वर्षात यात काहीच सुधारणा झाली नाहीये. आज २२ ऑगस्ट २०२० रोजी भामरागड तालुक्याला पुराने वेढले आहे. पुढे सुधारणा होईल अशी आशा करूया.
हे लिहायचे कारण: असा अविस्मरणीय अनुभव मला पहिल्यांदाच आला. तो तुमच्या बरोबर शेअर करावा असे वाटले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com