

Narayan Surve Poetry and Literature
esakal
मयूर भावे - mayur.bhave@esakal.com
उपेक्षितांचे जिणे, कष्टप्रद जीवन, संघर्ष-अवमान हीच जमापुंजी आणि रोज न भागणारी पोटातली भूक... वाटेला येऊनही आपल्या कसदार शब्दांनी कविवर्य नारायण सुर्वे यांनी तो काळ स्वतःसाठी सृजनशील आणि इतरांसाठी प्रेरणादायी केला. सुर्वें यांची हीच शब्दकळा अधिक सजगपणे उलगडणारे पुस्तक म्हणजे ‘उजेडाची फुले’! ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांनी सुर्वे यांच्या कवितांचा आस्वादक वेध या पुस्तकात १६ लेखांच्या माध्यमातून घेतला आहे.
सुर्वे यांची कविता कामगारांची, उपेक्षितांची विद्रोहाची आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या विभागातलीच आहे असा सर्वसाधारण समज दूर करून त्यांच्या समग्र कवितेतील विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न दवणे यांनी केला आहे. त्यामुळे उंबरठ्यावर थबकलेला सामान्य मध्यमवर्गही सुर्वेंच्या कवितेच्या परिघात सहजपणे येऊ शकेल. काव्याचा रसास्वाद असे हे लेखन असून, ही ‘शास्त्रकाट्याची कसोटी’ नाही, हे लक्षात घ्यावे. लेखकासाठी सुर्वे यांची कविता केवळ कानावर पडलेली किंवा पुस्तकात वाचून भावलेली आहे असं नाही, तर त्या शब्दांना कवीच्या प्रत्यक्ष सहवासाचा स्पर्श झाला आहे. हे लेखन केवळ ‘पुस्तकी’ वाटत नाही.