Premium|Shivaji Maharaj vs Mughals : उंबरखिंडी ते लालमहाल; मुघलांना थकवणाऱ्या शिवरायांच्या युद्धनीतीची कहाणी

How Shivaji Weakened Mughal Forces : छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ ते १६६३ दरम्यान गनिमी कावा, रसदबंदी आणि छुप्या हल्ल्यांच्या माध्यमातून मुघल सैन्याला मानसिक व लष्करीदृष्ट्या कमजोर करत क्षययुद्धाची प्रभावी रणनीती विकसित केली.
How Shivaji Weakened Mughal Forces

How Shivaji Weakened Mughal Forces

esakal

Updated on

जानेवारी १६६१चे उंबरखिंडीचे युद्ध ते एप्रिल १६६३चा लालमहालावरील छापा यामधील दोन वर्षांच्या काळात मुघलांविरुद्ध झालेल्या क्षयकारी युद्धाच्या फारशा नोंदी नाहीत. मराठ्यांची सत्त्वपरीक्षा पाहणारी आणि मुघलांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकविणारी ही युद्धनीती आजही अभ्यासाचा विषय आहे. पुढे भविष्यात १६८१ ते १७०७ ही २७ वर्षे मुघलांशी कशा पद्धतीने लढायचे? याचे जणू प्रशिक्षणच या काळात मराठ्यांना घडले.

मे १६६०मध्ये एक लाखाचा फौजफाटा घेऊन स्वराज्यात दाखल झालेल्या शायिस्ताखानाने १६६०च्या अखेरीपर्यंत सुपे, इंदापूर, पुणे, चाकण, कल्याण प्रांतावर ताबा मिळविला होता. मात्र उत्तर कोकणातील प्रांतावर ताबा मिळविणे व टिकविणे अवघड जात होते. जानेवारी १६६१च्या उंबरखिंडीतील मानहानिकारक पराभवामुळे मुघलांना चांगलाच धडा मिळाला. त्यामुळे औरंगजेबाने डिसेंबर १६६१मध्ये गुजरातचा सुभेदार महाराजा जसवंतसिंहाला अधिकची कुमक देऊन पाठविले. ज्यामुळे मार्च १६६३ पर्यंत मुघलांनी कोकणातील चौलवरही ताबा मिळविला. दरम्यान १६६१ ते १६६३ या काळात मोठ्या मोहिमा झाल्या नसल्या तरी झालेल्या छोट्या झटापटींमधून आपल्याला मराठ्यांच्या या अभिनव युद्धतंत्राबाबत अंदाज लावावा लागतो.

मुघलांना जेरीस आणणारी युद्धनीती

प्रचंड सामर्थ्यवान शत्रूला थेट न भिडता छुप्या हल्ल्यांनी थकवायचे, चिकाटीने त्याला क्षीण करून जेरीस आणावयाचे आणि आपले राजकीय ध्येय स्वीकारण्यास भाग पाडायचे. या क्षययुद्धाच्या रणनीताचा वस्तुपाठच शिवरायांनी या काळात झालेल्या मुघलांविरुद्धच्या संघर्षातून आखून दिला. बलाढ्य मुघल सैन्याशी समोरासमोरचा संघर्ष टाळून, अत्यंत सूत्रबद्ध हालचाली; गतिमानता व अनपेक्षित हल्ला यांचे आपल्या सैन्याला प्रशिक्षण देऊन, शत्रूची लढण्याची शक्ती क्षीण केली. मुघल सैन्य किल्ला जिंकण्यासाठी येई, तेव्हा फिरत्या गतिमान घोडदळाद्वारे त्यांच्यावर चौफेर हल्ले केले जाई; याशिवाय त्यांची रसद तोडणे; त्यांचे घोडे, शस्त्रसाठा व किंमती साहित्य लुटून नेणे; त्यांच्या तुकड्यांना मुख्य सैन्यापासून विलग करणे; मागे राहिलेल्या सैन्यावर हल्ले करणे; मुघल सैन्य येताच गावे मोकळी करणे, त्यांना लुटता येईल असे काहीही मागे न ठेवता डोंगरदऱ्यांमध्ये आश्रय घेणे... असे छुपे हल्ले व रसदेला अडथळे केल्याने मुघलांचा पराजय होणार नाही, हे राजांना माहिती होते. मात्र मुघली सेनासागर सतत मानसिक दबावाखाली राहील, त्यांची लढण्याची शक्ती क्षीण होत जाईल, हेच अनोखे युद्धतंत्र राजांनी याकाळात विकसीत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com