गिर्यारोहणाचे संस्कार करणारे दोन गुरू

क्लबच्या उपक्रमांचा भाग म्हणून आम्ही ‘क्लब मेंबर्स’ सह्याद्रीतील गडकिल्ल्यांवर स्वच्छंद भटकंती करायचो. या भटकंतीत खूप मजा यायची, सोबतीला साहसी बीजं माझ्या मनात रोवण्याचे काम या छोट्या मोठ्या ट्रेक्सनी केले.
pune
punesakal

मी लहान असताना अत्यंत भित्रा होतो. नारायण पेठेत आम्ही ज्या वाड्यात रहायचो त्या वाड्याच्या पाठीमागच्या भागात रात्री एकटे जाण्याची माझी हिम्मत व्हायची नाही. महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया प्रशालेत त्यावेळी मी शिकत होतो. एकेदिवशी शाळेच्या ‘ट्रेकिंग क्लब’शी माझी ओळख झाली आणि माझ्यातील साहसी जीवनप्रवासाची नकळतपणे मुहुर्तमेढ झाली. आमचा ३०-४० जणांचा चांगला ग्रुप बनला.

क्लबच्या उपक्रमांचा भाग म्हणून आम्ही ‘क्लब मेंबर्स’ सह्याद्रीतील गडकिल्ल्यांवर स्वच्छंद भटकंती करायचो. या भटकंतीत खूप मजा यायची, सोबतीला साहसी बीजं माझ्या मनात रोवण्याचे काम या छोट्या मोठ्या ट्रेक्सनी केले. मात्र, साहसी वृत्तीची मुळे घट्ट झाली ती हिमालयाच्या पहिल्यावहिल्या ट्रेकच्या निमित्ताने.

आमच्या ‘ट्रेकिंग क्लब’चे वर्षभर सह्याद्रीत ट्रेक्स होत असे. या ट्रेक्समध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या काही निवडक विद्यार्थ्यांना घेऊन हिमालयात ट्रेक आयोजित केला जाणार आहे, असे आम्हाला आमच्या सरांनी सांगितले होते. त्यामुळे हिमालयात जाण्याच्या ओढीने मी अधिक मेहनत घेत होतो. शेवटी वार्षिक परीक्षा संपल्यावर मे महिन्यात हिमालयातील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे होणाऱ्या ट्रेकची घोषणा झाली व या ट्रेकसाठी घेऊन जाणाऱ्या ११ विद्यार्थ्यांमध्ये माझा नंबर लागला.

१९७८ चे ते वर्ष होते, मी अवघ्या १३ वर्षांचा होतो. आमच्या सर्वांसाठीच हा हिमालयातील पहिला ट्रेक होता. सुमारे १०० किलोमीटर पदभ्रमण आणि १४ हजार फुट उंचीवर चढाई करत जाणे, असे आमच्या ट्रेकची उद्दिष्ट्ये होती. ट्रेकची व्याप्ती तेव्हा लक्षात आली नाही. मी फक्त हिमालयात जायला मिळतंय या खुशीतच होतो. सह्याद्रीतील भटकंती आता हिमालयात ! असे घोषवाक्यच तयार झाले होते. कोणास ठाऊक का, पण जेव्हा हिमालयात जायला मिळणार, हे पहिल्यांदा कळल्यावर भीती वाटली नाही किंवा पोटात गोळा आला नाही; उलटपक्षी शब्दात व्यक्त करू शकणार नाही इतका आनंद झाला होता. खरंतर अगदी कोवळ्या वयात घरापासून दूर जावे लागणार, त्यात हिमालयासारख्या अनभिज्ञ ठिकाणी, सोबत घरचे कुणीच नाही, आम्ही मित्र व सोबतीला आमचे सर.. माझ्यासाठी सर्वकाही नवीन होते. तरीही कसलीही भीती किंवा दडपण मनात नव्हते, होता तो फक्त उत्साह!

‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’तेव्हाच्या उत्तर प्रदेशमध्ये (सध्या उत्तराखंड) असलेल्या चमोली जिल्ह्यात वसलेले आहे. पहिल्यांदा मी जेव्हा हिमालय पाहिला तेव्हाच मी हिमालयाच्या प्रेमात पडलो. का कोणास ठाऊक पण हिमालय म्हणजे आधार देणारा गुरुबंधू, वाट दाखवणारा जवळचा मित्र वाटला. सोबतीला आपल्या हाताला धरून काहीतरी शिकवतोय असे देखील मनात वाटून गेले. त्यावेळी फार काही समजले नाही, मात्र मनाला सुखावणारे ते क्षण होते.  पहिल्या दिवसापासून अतिशय उत्साहात आम्ही सर्व ११ मित्रांनी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मध्ये मनमुराद पदभ्रमंती केली. समुद्र सपाटीपासून इतक्या उंच ठिकाणी येण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. मात्र, या संपूर्ण ट्रेकमध्ये मला कोणताही त्रास झाला नाही. एकीकडे उभा असलेला धवल हिमालय, आसपास दिसणारे रंगबेरंगी फुले मनाला मोहून टाकत असत. त्यामुळे किती पायपीट झाली याचा विचार मनात येत नसे. त्या स्वच्छंद भटकंतीतून मिळणारा आनंद शब्दातीत होता. त्यावेळी ‘स्वर्गीय सुख’ नकळत अनुभवले होते. 

ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आमच्या अकरा जणांपैकी ३-४ जणांनी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ परिसरातील अनेक शिखरांपैकी एक असलेल्या सर्वोच्च ठिकाणी जाऊन आपल्या शाळेचा ध्वज फडकवावा, अशी आमच्या सरांची इच्छा होती. इच्छा काय, त्यांनी तर फर्मानच सोडले. मात्र आमच्यातील एकही जण ध्वज घेऊन जाण्यास तयार नव्हते. कारणही तसेच होते, जरी आम्ही ट्रेकचा मनमुराद आनंद लुटला असला तरी सलग तीस दिवस पायपीट करण्याचा माझा व माझ्या सर्व मित्रांचा पहिलाच अनुभव होता. आम्ही थकलो देखील होतो. थकव्यामुळे कोणीच ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’च्या सर्वोच्च शिखरावर जाण्यास तयार नव्हते. परंतू माझ्यावर जास्तच प्रेम करणारे शिरीष सर माझ्या मागे लागले. “काहीही झाले तरी उमेश तू शिखरावर जाणार!” असा आदेशच त्यांनी मला दिला. प्रकृतीने मी काही फार धडधाकट नव्हतो, कृश जरी नसलो तरी पेहलवान श्रेणीत देखील नक्कीच नव्हतो. माझ्यापेक्षा अंगकाठीने चांगली मुले असताना मीच का याचे उत्त्तर मला उमगत नव्हते. मी सरांना विनवणी केली, परंतु त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी मी शिखर चढाईची तयारी सुरु केली. त्यावेळी जरी मला उमगत नसले तरी गिर्यारोहणातील प्रत्यक्ष चढाईचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती.

शेवटी तो दिवस उजाडला, मी माझ्या सवंगड्यांसोबत चढाईला सुरवात केली. जस जसे मी वर चढत होतो तसे तसे मला चढण्याची गंमत वाटू लागली. एक अनामिक ओढ मला शिखराकडे नेत होती. माथ्यावरून जग बघण्याचे कुतूहल असेल किंवा शाळेचा ध्वज फडकविण्याचा आनंद, मी झपाट्याने शिखरमाथ्यावर जात होतो. ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’मधील १६ हजार फुट उंचीवर वसलेल्या सर्वोच्च शिखरावर पोहचल्यावर माझा शाळेचा ध्वज घेतलेला फोटो जेव्हा काढला तेव्हा माझ्या आनंदला पारावर उरला नव्हता. तो क्षण मला आजही ठळकपणे आठवतो.

शिखरावरून पायथ्याला परतलो. तेथून पुणे गाठले. परंतू या ट्रेकमुळे मला हिमालयाची ओढ लागली. वर्षातून एकदा तरी हिमालयात येईल या निश्चयानेच मी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ सोडले होते. या ट्रेकमुळे माझ्या हिमालयातील मोहिमांचा श्रीगणेशा झाला. गिर्यारोहणाचे बाळकडू मला इथेच मिळाले. पुढे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ला सुरु झालेला प्रवास ‘माउंट एव्हरेस्ट’पर्यंत पोहचला. या ट्रेकने मला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याचे बळ दिले. हे संस्कार नकळत घडले, मात्र ते आजही माझ्यासोबत आहेत. मी नेहमी म्हणतो, गिर्यारोहणाचे संस्कार घडवणारे माझे दोन गुरु आहेत, एक सह्याद्री व दुसरा हिमालय. अगदी लहान वयापासूनच मला माझ्या या दोन गुरूंनी दिलेल्या संस्कारांमुळे माझे आयुष्यच पालटले. सह्याद्रीने बीजारोपण केले, हिमालयाने हात धरून मोठे केले. हिमालयासारखा नकळत जडणघडण करणारा शिक्षक मला भेटला म्हणूनच मी गिर्यारोहणातील ऊंची गाठू शकलो. आजच्या शिक्षकदिनी गुरुतुल्य हिमालयाला शतशः नमन. 

माझा गुरु, माझा शिक्षक असलेल्या हिमालयाचे मनमोहक रूप .

लेखकाचा ई मेल- umzirpe@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com