#Article370: तुम्हाला‌ माहितीय‌‌ का‌ जगात पाक‌ तोंडावर का आपटला?

उमेश उपाध्याय 
Sunday, 18 August 2019

आर्थिक परिस्थिती 
ज्या देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असत नाही; त्या देशाचे भविष्य अडचणीत असते, असे मानले जाते. सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये केला जातो. दुसरीकडे, पाकिस्तानने मात्र 80च्या दशकानंतर कट्टरवादी जिहादी मानसिकता निर्माण करण्यावर प्रमुख्याने गुंतवणूक केलेली दिसून येते. भारताचा बदला घेण्याच्या आंधळ्या स्पर्धेत पाकिस्तानने आपल्याच देशात धार्मिक उन्माद निर्माण केला आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडले आहे असून, हा देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

जी गोष्ट करण्याची तुमच्या विरोधकांची इच्छा नाही; मात्र तरीही त्यांना ती करावी लागत असेल, तर असे मानायला हरकत नाही की आंतरराष्ट्रीय कूटनीतीमध्ये तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहात. जम्मू आणि काश्‍मीरशी संबंधित असलेले "कलम 370' आणि "35-अ' रद्द करून भारताने अशाच पद्धतीचा कारनामा केला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर भारताला चर्चेसाठी राजी करण्याचे सातत्याने प्रयत्न केले असल्याचे दिसून येते. त्याचे कारण इम्रान यांना भारताबद्दल फार प्रेम आहे असे नसून, पाकिस्तानची बिघडलेली आर्थिक घडी हे आहे. कलम 370 रद्द करण्याची भारताने घोषणा केल्यानंतर पाकिस्तानकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे तर त्यांची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिघडत जाणार आहे. भारताला केली जाणारी निर्यात बंद करण्यात आल्यामुळे पाकिस्तानात महागाई वाढणार आहे. दुसरीकडे, भारतावर मात्र त्याचा फारसा परिणाम पडणार नाही. दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारावर बंदी घातल्यामुळे आणि भारताबरोबरचे राजनैतिक संबंध घटविल्यामुळे इम्रान खान यांचे सरकार एका वेगळ्याच चक्रात फसले आणि त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडत जाणार आहे. त्यामुळे हे निर्णय घेणे पाकिस्तानला का भाग पडले, याचा शोध घेणे आवश्‍यक ठरते. 

योग्य वेळी योग्य निर्णय 
योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम चांगलेच होत असतात! महाकवी क्षेमेन्द्र यांनी बृहत्‌ कथा "मंजरी'मध्ये उद्‌धृत केलेले हे वाक्‍य जम्मू आणि काश्‍मीरमधून कलम 370 हटविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयालाही लागू होते. हा निर्णय घेण्यासाठी सध्याचीच वेळ योग्य होती. आंतरराष्ट्रीय राजनयामध्ये निर्णय घेण्याच्या वेळेला अत्यंत महत्त्व असते. चुकीच्या वेळी घेतलेला एक निर्णयही भू-राजकीय आणि सामरिक दृष्ट्या मोठे नुकसान करणारा ठरू शकतो. सध्याचे आंतरराष्ट्रीय शक्ती संतुलन, भू-सामरिक परिस्थिती, आर्थिक आणि राजनैतिक परिस्थिती अशा सगळ्याच आघाड्यांवर भारतासाठी अनुकूल परिस्थिती आहे. या चारही मुद्द्यांवर सखोल विचार होणे अपेक्षित आहे. 

आंतरराष्ट्रीय शक्ती संतुलन 
अमेरिका ही सध्याची एकमेव महासत्ता आहे. असे असले तरी अमेरिकेच्या या स्थानाला चीनकडून सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न होत असतो. सध्या दिसून येणारे आंतरराष्ट्रीय शक्ती संतुलन पुढील एक किंवा दोन दशकांमध्ये पूर्णपणे बदलले असू शकते. भारताला नाराज करण्याचे धाडस सध्या अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश करू शकत नाहीत. शेजारी असल्याने भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे अमेरिकेलाही आंतरराष्ट्रीय शक्ती संतुलन कायम ठेवण्यासाठी भारताची साथ हवी आहे. 

चीन हा आपला सर्वांत घनिष्ठ मित्र असल्याची पाकिस्तानची भावना आहे. त्यामुळे भारताने कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी तातडीने चीन गाठले होते. भारताला फटकारणारा राजनैतिक निर्णय चीनने घ्यावा, अशी पाकिस्तानची इच्छा होती. मात्र, चीनने असे कुठलेही पाऊल उचलले नाही. लडाखबद्दल चीनने तिखट प्रतिक्रिया दिली असती, तरी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाबाबत पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळण्यास चीनने नकारच दिल्याचे दिसून येते. 

अमेरिका, रशियानेही हात झटकले 
अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी आहे. मात्र, सध्या आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला आपण खरेदी करू शकतो, अशा विश्वासही अमेरिकेला आहे. कलम 370 रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेकडून देण्यात आली होती. रशियानेही पाकिस्तानला दिलासा देण्यास नकार देत भारताने घेतलेला निर्णय त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत हात झटकले होते. आपण मुस्लिम देशांचे नेतृत्व करतो, असा कितीही आव पाकिस्तानने आणला; तरी या मुद्द्यावर मुस्लिम देशांनीही पाकिस्तानच्या बाजूने वक्तव्य केलेले नाही. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियानेही हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पदरी निराशाच पडली आहे. दुसरीकडे, शेजारी असलेल्या श्रीलंका आणि मालदीवने जाहीरपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतली आहे. भारताच्या निर्णयावर एखादे निवेदन प्रसिद्ध करण्यापलीकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने काहीही करण्यास नकार दिलेला दिसतो. त्यामुळे भारतावर दबाव वाढविण्याचा कुठल्याही देशाचा विचार नसावा, असे मानायला हरकत नाही. 

भू-सामरिक परिस्थिती 
दक्षिण चिनी समुद्रात चीन करीत असलेली दादागिरी सध्या अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पश्‍चिमी देशांची मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे जपानपासून कोरियापर्यंत आणि ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत सर्वच देश चीनच्या या कृत्याला वैतागलेले आहेत. त्यामुळे या संघर्षात या सर्वांनाच भारताची साथ हवी आहे. हॉंगकॉंगमध्ये सुरू असलेल्या मोठ्या आंदोलनांमुळे चीन चिंतेत असल्याचे दिसते. काश्‍मीरमध्ये इस्लामी कट्टरवादी दहशतवाद फोफावला, तर त्याचा फटका चीनलाही बसणार आहे. 

तालिबानचेही खडे बोल 
अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांची तालिबानशी चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानात मदत करून काश्‍मीरमध्ये आपल्याला अमेरिकेने मदत करावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. मात्र, खुद्ध तालिबानच्या प्रवक्‍त्यानेच ही शक्‍यता फेटाळून लावत पाकिस्तानलाच खडे बोल सुनावले आहेत. त्यामुळे सौदेबाजी करण्याची पाकिस्तानची ताकद अगदीच नगण्य झाली आहे. 

आर्थिक परिस्थिती 
ज्या देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असत नाही; त्या देशाचे भविष्य अडचणीत असते, असे मानले जाते. सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये केला जातो. दुसरीकडे, पाकिस्तानने मात्र 80च्या दशकानंतर कट्टरवादी जिहादी मानसिकता निर्माण करण्यावर प्रमुख्याने गुंतवणूक केलेली दिसून येते. भारताचा बदला घेण्याच्या आंधळ्या स्पर्धेत पाकिस्तानने आपल्याच देशात धार्मिक उन्माद निर्माण केला आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडले आहे असून, हा देश सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

राजनैतिक परिस्थिती 
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठल्याही देशाची राजनैतिक प्रतिष्ठा ही त्या देशाच्या आर्थिक-सामरिक-रणनीतीच्या बळावरच निश्‍चित होत असते. जगात तुमच्या देशाला नेमकी काय किंमत दिली जाते, हेही यावरूनच ठरत असते. 9/11च्या घटनेनंतर पाकिस्तानची प्रतिष्ठा सातत्याने घटत चालली आहे. जगात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यास त्याचे पाकिस्तान कनेक्‍शन समोर येत असते. त्यामुळे पाकिस्तान आणि त्या देशातील नेत्यांवर आज जगाचा विश्वास उरलेला नाही. 

एकूणच, कलम 370 च्या मुद्द्यावर आपण एकटे पडलो आहोत, याची जाणीव पाकिस्तानला होऊ लागली आहे. असे असले तरी काश्‍मीरमधील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान थांबविणार नाही. येथील हिंसाचाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याचा प्रयत्नही पाकिस्तानकडून केला जाणार, हे निश्‍चित. कारण, पाकिस्तान हा हारलेली लढाई खेळतो आहे. त्यामुळे आक्रमक रक्षात्मक धोरण अवलंबिलेल्या भारताला या पुढेही सदैव जागरूक राहावे लागणार आहे. भारताने घेतलेल्या या मोठ्या निर्णयांमुळे जम्मू आणि काश्‍मीरमधील हिंसेचे दुष्चक्र थांबले जाऊन काश्‍मीर खोऱ्यात नवा सूर्य उगविण्याची आशा करूया! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umesh Upadhay writes about article 370 Kashmir and Pakistan