देवभूमी हिमालय

भारताच्या उत्तरेला वसलेला हिमालय हा भारतीय संस्कृतीचा प्राचीन काळापासून अविभाज्य भाग आहे. हिंदू धर्मात तर हिमालयाला देवच मानतात. वेद असोत वा महाभारत, हिमालयाचं वर्णन विविध रूपांत आढळतं.
Himalaya
HimalayaSakal

भारताच्या उत्तरेला वसलेला हिमालय हा भारतीय संस्कृतीचा प्राचीन काळापासून अविभाज्य भाग आहे. हिंदू धर्मात तर हिमालयाला देवच मानतात. वेद असोत वा महाभारत, हिमालयाचं वर्णन विविध रूपांत आढळतं. भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्णानं ‘माझं एक रूप म्हणजे हिमालय’ असं सांगितलं आहे. पांडवांनी शेवटची स्वर्गयात्रा ‘स्वर्गरोहिणी’ शिखराच्या येथून म्हणजे याच हिमालयातून केली, अशी आख्यायिका आहे. कैलासपर्वत म्हणजे शिव-पार्वतीचं निवासस्थान, उत्तरेकडील वैष्णोदेवी, अमरनाथ, नेपाळमधील पशुपतिनाथ, मनालीतील हिडिंबादेवी, केदारनाथ इत्यादी हिमालयातच वसलेले आहेत.

भारतीय संस्कृती ज्या नद्यांच्या खोऱ्यात बहरली त्या नद्या म्हणजे गंगा-यमुना-सरस्वती-सिंधू-ब्रह्मपुत्रा इत्यादी. या नद्यांचा उगमही हिमालयातच झाला आहे. चारधाम यात्रा ही हिमालयातीलच. उंच शिखरांवर, तर कधी पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये देव आढळतो. हृषीकेश, उत्तरकाशी, देवप्रयाग, उत्तरप्रयाग यांसारखी देवस्थानं, शिवलिंग, नंदादेवी, मेरुपर्वत, कांचनजुंगा, ओमपर्वत, गौरीशंकर, आदिकैलास ही शिखरं म्हणजे देवाची विविध रूपंच. इतकंच नव्हे तर, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हेही ‘जगन्माता’ म्हणजे जगाची माता म्हणूनही ओळखलं जातं! एव्हरेस्ट मोहीम असो वा काही वर्षांपूर्वी सातत्यानं भारतीय हिमालयात आयोजित मोहिमा, गिर्यारोहण करता करता ‘देवभूमी हिमालय’देखील अनुभवता आली. हो, देवभूमीच. कारण, आजही हिमाचल अथवा उत्तराखंड येथील हिमालयात जा, ‘देवभूमी हिमालय में आपका स्वागत है’ अशाच पाट्या दिसून येतात.

गंगोत्री-हिमालयपरिसर ही माझी कर्मभूमी. तब्बल २० वर्षं दरवर्षी ट्रेकिंग-गिर्यारोहणाच्या निमित्तानं मी तिथं जात आहे. हा परिसर आध्यात्मिक व पवित्र आहे असं मी मानतो. इथं गंगामातेचं दर्शन घेण्याबरोबरच अनेक विलक्षण

साधू-साध्वींचंही दर्शन होतं. अनेक साधूंनी आपल्या गृहस्थाश्रमातून विश्रांती घेत मोक्षप्राप्तीसाठी अध्यात्माची कास धरली आहे. अशा व्यक्तींचा लाभणारा सहवास हा विलक्षण असतो. असाच सहवास मला व माझा मित्र-सहकारी अजित ताटे याला २००७ मध्ये ‘गिरिप्रेमी’च्या ‘माउंट शिवलिंग मोहिमे’च्या वेळी लाभला. त्या वेळी आम्ही १५ दिवस शिवलिंग शिखराच्या बेसकॅम्पवर मुक्कामी होतो. समुद्रसपाटीपासून १४६४० फुटांवर वसलेला हा बेस कॅम्प ‘तपोवन’ या प्रसिद्ध व पवित्र ठिकाणी आहे. तपोवन इथं अगदी प्राचीन काळापासून ऋषी-मुनी तपश्चर्येसाठी ध्यानस्थ होत असत, असं म्हणतात. या ठिकाणाहून शिवलिंग, भागीरथी, सतोपंथ यांसारखी शिखरं अगदी जवळ आहेत. असंच गंगेचं उगमस्थान गोमुखही जवळच आहे. अशा पवित्र ठिकाणी एका साध्वीजींशी आमचा परिचय झाला. त्या जवळच असलेल्या एका गुहेत कायमस्वरूपी वास्तव्याला होत्या. इथं वर्षातील चार ते पाच महिने सतत हिमवृष्टी होत असते. त्यात या साध्वीजी ज्या गुहेत वास्तव्यास आहेत तिच्यावर किमान पंधरा-वीस फूट तरी हिम हिवाळ्यात साठत असेल. अशा वातावरणात, अगदी उन्हाळी दिवसांत थंडीपासून बचाव व्हावा म्हणून आम्ही नखशिखान्त गरम कपडे, हातमोजे, बूट अशा सरंजामात वावरत होतो, तिथं या साध्वीजी, आपण थंडी नसलेल्या ठिकाणी जसे कपडे घालू, तशा अत्यंत साधारण कपड्यात वावरत होत्या.

आम्हाला या साध्वीजींबद्दल प्रचंड कुतूहल होतं. त्या तिथं कशा रहात असतील, काय खात असतील, त्यांना हे सगळं कसं जमत असेल असे एक ना अनेक प्रश्न आम्हाला पडले होते. या साध्वीजींशी जेव्हा आमच्या गप्पा झाल्या तेव्हा या सर्व प्रश्नांची त्या हसत हसत सहज उत्तरं द्यायच्या. त्यांच्या मते, ‘आपल्या बंद मुठीत मावेल एवढंच अन्न-धान्य आपल्या शरीराला पुरेसं असतंं, बाकी सगळे आपल्या जिभेचे चोचले.’ त्यांच्या या उत्तरानं आमचं काही समाधान झालं नाही.

आम्ही सतत त्यांना याविषयी विचारात असू. त्या सांगत असत, ‘अनेक वर्षांची तपश्चर्या केल्यानंतर पंचमहाभूतांच्या शक्तीनं शरीरावर, मनावर असं नियंत्रण मिळवता येतं.’ आम्हाला नवल वाटलं. आमच्यासाठी हे सर्वच नवीन, अद्भुत होतं. मात्र, खालच्या गावामध्ये जेव्हा आम्ही काही लोकांशी साध्वीजींबद्दल विचारलं तेव्हा कळलं की त्या मूळ बंगळुरूच्या असून, गेल्या १५ वर्षांपासून त्या या गुहेत, परिसरात वास्तव्याला आहेत. या साध्वीजींशी चर्चा करताना आणखी एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, त्यांनी त्या वेळी ‘अमेरिकेचं भारताविषयी धोरण’ या विषयावर आमच्याशी विस्तृत चर्चा केली! सन २००७ चा तो काळ होता. तेव्हा मोबाईलची रेंजदेखील त्या भागात नव्हती. साधा एसटीडी फोन-कॉल करण्यासाठी आम्हाला १२० किलोमीटर दूर असलेल्या उत्तरकाशीला जावं लागत असे. अशा ठिकाणी बातम्या किंवा इंटरनेटची उपलब्धता असण्याची तीळमात्र शक्यता नव्हती. तरीही या साध्वीजींकडे असलेली इत्थंभूत माहिती आश्चर्यकारक होती. त्यांना ही माहिती कुठून मिळाली असेल याचं आम्हाला नवल वाटलं. त्यांना ही माहिती कुणी सांगितली, त्यांच्याशी कुणी कधी काही चर्चा केली होती का हे सगळंच अनाकलनीय होतं.

हाच गंगोत्रीपरिसर स्वामी सुंदरानंद यांच्यासारख्या योगींची कर्मभूमी आहे. गेल्या वर्षी स्वामींचं ९४ व्या वर्षी निधन झालं. सुंदरानंद स्वामी हे गंगोत्री हिमनदीतून अत्यंत खडतर अशा प्राचीन मार्गानं चारधाम यात्रेसाठी जात असत. या भागातून ट्रेक करत पायी चारधाम यात्रा करणं हे कसलेल्या गिर्यारोहकांसाठीही आव्हानात्मक असतं. मात्र, अनेक साधू अत्यंत कमी संसाधनांच्या साह्यानं ही यात्रा लीलया पूर्ण करत असत. अशा विलक्षण साधू-योगींबरोबरच अंगाला राख फासून, चरस-गांजा ओढून भीक मागणारे व स्वतःला साधू म्हणवून घेणारे लोकही या परिसरात मला बघायला मिळाले.

हिमालय ही फक्त हिंदूच नव्हे तर, बौद्ध व इतर धर्मीयांसाठीही ‘देवभूमी’च आहे. धर्मशाला या ठिकाणी असलेले दलाई लामा, नेपाळमध्ये जागोजागी असणारे बौद्ध स्तूप, मोनेस्ट्री यांनीही हिमालय नटलेला आहे. आजही एव्हरेस्ट शिखरचढाईला जाणारे शेर्पा व इतर गिर्यारोहक एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या आधी असलेल्या पांग्बोचे येथील मोनेस्ट्रीत दर्शन घेऊन, तेथील पवित्र गंडा बांधून मगच पुढं जातात हे मी स्वतः अनुभवलं आहे.

सन १९७८ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी मी जेव्हा पहिल्यांदा हिमालयात ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ ट्रेकला गेलो होतो, तेव्हा उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात १५ हजार फुटांवर असलेल्या ‘हिमकुंड साहिबजी’ या ठिकाणी गुरुद्वाराचं काम सुरू होतं. तेव्हा अवघ्या ३० रुपयांना मिळणारं सिमेंटचं पोतं वरपर्यंत पोहोचवण्यासाठी कामगार ६० रुपये घेत असत. हिमकुंड साहिबजी हे शिखधर्मीयांसाठी अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंगजी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती.

हिमालय हा सर्वार्थानं अद्भुत आहे, म्हणूनच तो विविध रूपांतून आपल्याला खुणावत असतो. हिमालय म्हणजे काय हे दरवेळी नव्यानं समजत असतं. कुणासाठी हिमालय ही जन्मभूमी, कुणासाठी कर्मभूमी...कुणाचा हिमालय हा सखा, तर कुणासाठी हिमालय हाच पाठिराखा. मात्र, देवांचा अधिवास असलेला, पृथ्वीवरचा जणू स्वर्गच असलेला हिमालय म्हणजे खऱ्या अर्थानं ‘देवभूमी हिमालय’!

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com