नयनरम्य गंगोत्री

गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री परिसर गढवाली लोकांचे माहेरघर. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या चार धाम यात्रेतील प्रमुख केंद्रदेखील याच परिसराच्या आसपास आहे.
Gangotri
GangotriSakal

विस्तीर्ण पसरलेल्या हिमालयाची विविध रूपे आहेत. लेह- लडाखमध्ये असणारा हिमालय आणि सिक्कीम परिसरात आढळणारा हिमालय हा संपूर्णपणे वेगळा आहे. येथील भौगोलिक सौन्दर्य विभागानुसार बदलतेच, सोबतीला येथील इतिहास, लोकांचे जीवनमान देखील बदलत हाते. हिमालयातील असाच रंजक व नयनरम्य परिसर म्हणजे गढवाल हिमालयातील गंगोत्री.

गंगा नदीचे उगमस्थान असलेल्या गंगोत्री परिसर गढवाली लोकांचे माहेरघर. हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या चार धाम यात्रेतील प्रमुख केंद्रदेखील याच परिसराच्या आसपास आहे, त्यामुळे ऐतिहासिक व भौगोलिक महत्वांसोबत गंगोत्री परिसर हा धार्मिकदृष्ट्या देखील तेवढाच महत्वाचा आहे. समुद्र सपाटीपासून ३०४२ मीटर उंचीवर असलेल्या गंगोत्रीला गंगा मातेचे मंदिर आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वांचे असलेले व चार धामपैकी एक असलेल्या गंगामातेच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात. या मंदिराच्या निर्मितीची कथा देखील तेवढीच सुरस आहे. १७ व्या शतकापर्यंत सेमवाल पुजारी बांधव गंगेच्या प्रवाहाची पूजा करत असे. १८ व्या शतकात जेव्हा गढवाल हिमालयाचे गुरखा सेनापती अमरसिंह थापा हे नेपाळ मधून गंगोत्री परिसरात भेटीसाठी आले तेव्हा स्थानिक पुजाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी गंगा मातेचे मंदिर उभारले. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी ज्या ठिकाणी बसून तप केला, त्याच ठिकाणी हे मंदिर उभारले आहे. या मंदिराला हिंदू धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे.

गोमुख मात्र गंगोत्रीपासून १८ किलोमीटर दूर असून तेथे पोहोचण्यासाठी ट्रेकिंग करत जावे लागते. गंगोत्री हिमनदीच्या मुखाशी गंगेचा उगम होतो, हे उगमस्थान गोमुख म्हणून ओळखले जाते. गंगोत्री हिमनदी ही हिमालयातील प्रमुख हिमनद्यांपैकी एक असून ३० किलोमीटर लांब व २ ते ४ किलोमीटर रुंद आहे. या हिमनदीची घनता ही २७ घनकिलोमीटरहून अधिक आहे. गंगोत्री हिमनदी परिसर हा चंचल असून यात सतत बदल घडत असतात. गेल्या काही वर्षांत झालेल्या तापमान बदलाचा मोठा परिणाम या हिमनदीवर झाला आहे. १९८६ मध्ये मी पहिल्यांदा गंगोत्री परिसरात आलो होतो, तेव्हा गंगोत्री हिमनदी आजच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात वितळलेली होती. आता या हिमनदीची दिशा देखील बदलत चालली आहे. यांमुळे या हिमनदीतून ट्रेकिंग करत जाणे- येणे धोक्याचे ठरते आहे. या परिसरात असलेल्या अनेक हिमशिखरांच्या पायथ्याशी जाण्यासाठी गंगोत्री हिमनदीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, हिमनदीत होणाऱ्या बदलांमुळे हिमशिखरांच्या पायथ्याशी जाणारी वाट धोकादायक बनत चालली आहे.

गोमुखहुन उगम पावलेली गंगा नदी ही सुरुवातीच्या टप्प्यात भागीरथी नदी म्हणून ओळखली जाते. पुढे देवप्रयाग येथे भागीरथी व अलकनंदा नदीचा संगम होऊन पुढे या नदीला गंगा असे संबोधतात. भागीरथी नदीचे पात्र विस्तीर्ण असून प्रचंड वेगाने नदी पर्वतांमधून वाट काढत खालच्या दिशेला वाहते. या नदीच्या परिसरात असलेला निसर्ग हा अनुभवण्यासारखा आहे. येथे असलेला सप्ततालचा ट्रेक तर डोळ्याचे पारणे फेडतो. याच परिसरात असलेल्या शिनोली गावात पंचमुखी महादेवाचे मंदिर आहे, जे संपूर्ण उत्तराखंड राज्यातील एकमेव पंचमुखी महादेव मंदिर आहे. गढवाल हिमालयाच्या परिसरात बद्रीनाथजी, केदारनाथजी, यमुनोत्री व गंगोत्री अशी हिंदूंची श्रद्धास्थाने असलेली महत्वाची मंदिरे आहेत. ही सर्वच मंदिरे उंचीवर, पर्वतांच्या सान्निध्यात वसलेली आहेत. हिवाळी दिवसांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्याने नोव्हेंबर ते मे या हिवाळी दिवसांत ही मंदिरे बंद असतात. दिवाळीला या सर्व मंदिरांमध्ये पूजा होते व पुढील काही महिन्यांसाठी येथील देव खालच्या भागात येऊन राहतात, अशी समजूत आहे. पुन्हा अक्षय्यतृतीयेच्या दिवशी ही मंदिरे अधिकृतपणे भाविकांसाठी खुली होतात. दिवाळी ते अक्षय्य तृतीया या काळात केदारनाथजी जोशी मठ येथे, यमुनोत्री खरसली येथे, गंगोत्री मुखवा येथे तर बद्रीनाथजी उखी मठ येथे मुक्कामासाठी येतात. सदर ठिकाणी या सर्व देवांची यथासांग पूजा-अर्चा होते व उन्हाळयात पुन्हा एकदा आपल्या मूळ ठिकाणी हे देव विराजमान होतात.

गंगोत्री परिसरात असलेली नेलॉन्ग व्हॅली ही पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. २०१५ साली नेलॉन्ग व्हॅली पर्यटनासाठी खुली करण्यात आली, त्याआधी तब्बल ६० वर्षे सामान्य नागरिकाला या परिसरात जाण्याची मुभा नव्हती. आजही विदेशी नागरिकांना नेलॉन्ग व्हॅलीला भेट देण्याची परवानगी नाही. हा परिसर तिबेट सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटरवर आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर संवेदनशील असल्याने येथे जाण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते. भैरवघाटी येथे असलेल्या भारतीय सैन्यदलाच्या चौकीपासून २०-२२ किलोमीटर पुढे गेल्यावर नेलॉन्ग व्हॅलीत प्रवेश करता येतो. ११ हजार फुटांवर वसलेल्या व्हॅलीतून मनमोहक व विस्तीर्ण पसरलेले तिबेट पठार अगदी सुस्पष्ट पाहता येते. याच परिसरात असलेल्या गरतांग गली येथून प्राचीन काळात तिबेट व भारतामध्ये व्यापार होत असे. या व्यापारी मार्गाच्या खुणा आजही दीडशे वर्षांनंतर येथे पाहण्यास मिळतात. मी याचवर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात याच प्राचीन व्यापारी मार्गावर गेलो होतो. या ठिकाणी आता प्राचीन लाकडी मार्ग पुनर्जीवित केला आहे. सुदैवाने मी जेव्हा तिथे पोहोचलो त्याच्या एक दिवस आधीच उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांच्या हस्ते या मार्गाचे उदघाटन करण्यात आले होते.

एका बाजूला असलेल्या अजस्त्र हिमालयाच्या दगडामध्ये लाकूड खोचलेले आहे व त्याला खालच्या बाजूने आधार दिला आहे. पायरीप्रमाणे या लाकडांची रचना असून लाकडाचा ७५ टक्के भाग हा अधांतरी आहे. देवदारच्या भक्कम लाकडापासून बनविलेला हा मार्ग दोनशे वर्षांपूर्वी गरतांग गल्लीमध्ये असलेल्या प्राचीन मार्गाचे आधुनिक रूप आहे. १-२ किलोमीटर लांबीच्या मार्गावरून चालत जाणे एक प्रकारचे थ्रिलच आहे. एका बाजूला भव्य हिमालय तर दुसऱ्या बाजूला काही शे फूट खोल दरी व त्यातून वाहणारी भागीरथी नदी.. हा संपूर्ण प्रवास रोमांचकारी व धडकी भरवणारा आहे. १५०-२०० वर्षांपूर्वी जेव्हा व्यापारी आपला माल घेऊन येथून मार्गस्थ होत असत तेव्हा त्यांना काय अडचणींना सामना करावा लागत असेल, याची कल्पनाच करवत नाही.

गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसर हा आम्हा गिर्यारोहकांना देखील आकर्षित करतो. या परिसरात असलेली शिखरे अफाट आहेत. येथे दिसणाऱ्या हिमालयाचे भव्य रूप पाहून धडकी भरते. गढवाल हिमालयात आले कि माझ्या समोर नाशिक परिसरातील सह्याद्री डोळ्यासमोर उभा राहतो. अलंग- मदन- कुलंग सारखे अजस्त्र सह्यकडे जसे दिसतात, अगदी तसाच भव्य हिमालय येथे दिसतो. हा हिमालय आम्हा गिर्यारोहकांची सर्वच पातळीवर कसोटी पाहतो. त्यामुळे येथे गिर्यारोहण मोहीम आखणे व त्यात यश मिळविणे हा वेगळाच आनंद असतो. सुदैवाने हा आनंद एक गिर्यारोहक म्हणून मला नुकताच एकदा नव्हे तर दोनदा घेता आला. आम्हा गिरिप्रेमीच्या संघाने माउंट मंदा-१ या ६५१० मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. या शिखरावर खडतर मार्गाने होणारी ही पहिलीच चढाई होती. या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर अवघ्या १० दिवसांत गिरिप्रेमीच्या मुलींच्या संघाने माउंट गंगोत्री-१ या ६६७२ मीटर उंच शिखरावर भारतीय तिरंगा फडकावीत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष अभिनव रूपात साजरे केले.

गंगा मातेचे प्राचीन मंदिर असलेला, ऋषी मुनींचे, साधू संतांचे वर्षानुवर्षे हक्काचे घर असलेला, गौरीकुंड- सूर्यकुंड सारखे निसर्गाची आविष्कार असलेला, अविस्मरणीय हिमशिखरांचे माहेरघर असलेला गढवाल हिमालयातील गंगोत्री परिसर हा धार्मिक पर्यटकांना, आम्हा गिर्यारोहकांना, सर्व स्थानिकांना नेहमीच आकृष्ट करतो. विविध रूपांतून विलोभनीय, विलक्षण व नयनरम्य वाटणाऱ्या गंगोत्री परिसराला एकदा भेट दिली की आपण त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय रहात नाही.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com