esakal | हिमालयपुत्र सह्याद्रीपुत्र होतो तेव्हा...!
sakal

बोलून बातमी शोधा

Himalaya

हिमालयपुत्र सह्याद्रीपुत्र होतो तेव्हा...!

sakal_logo
By
उमेश झिरपे

‘हिमालयातील दिवसां’मध्ये मला काही माणसं भेटली आणि ती माझ्या आयुष्याचा कायमचा भाग होऊन गेली. त्यातील सर्वांत विलक्षण व अनपेक्षितपणे भेटलेली व्यक्ती म्हणजे टेकराज अधिकारी ऊर्फ कांचा.

सन २००१ मध्ये गंगोत्री-हिमालयातील ‘माऊंट सुदर्शन’ शिखरावर मोहीम आयोजित केली गेली होती. मोहिमेचा बेस कॅम्प ट्रेक हा गंगोत्री हिमनदीतून वाट काढत, हिमभेगा पार करत पूर्ण करायचा होता. बरोबर भरपूर सामानही होतं. त्यामुळे आम्ही उत्तरकाशीहून पोर्टरचा एक मोठा जथाही आमच्यासमवेत घेतला होता. हे सगळे पोर्टर मुख्यत्वे भारत-नेपाळ सीमेवरच्या नेपाळी जिल्ह्यांतले होते. हातावर पोट असतं यांचं. सामान वाहून बेस कॅम्पला सोडायचं, आपला हिशेब करून खाली परत जायचं अशी त्यांची पद्धत होती. त्या जथ्यात १६-१७ वर्षांचा एक चुणचुणीत व दिसायला काटक दिसणारा मुलगा होता.

मात्र, सामान वाहून नेताना त्याला काहीसा त्रास होत आहे हे जाणवत होतं. त्यानं कधी तक्रार केली नाही किंवा कामात कुचराईही केली नाही. मात्र, त्याला काहीतरी त्रास होत आहे, हे लालबुंद होणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत होतं. आम्ही जेव्हा बेस कॅम्पला पोहोचलो तेव्हा हा मुलगा सामान ठेवल्यावर कोसळलाच. त्याच्या अंगात ताप भरला होता. आम्ही त्याला इंजेक्शन दिलं व आराम करायला सांगितलं. ‘अशा परिस्थितीत खाली ट्रेक करत जाशील तर जिवावर बेतेल,’ हेदेखील बजावलं. ‘मोहीम होईपर्यंत आमच्याबरोबरच थांब, खाण्या-पिण्याची-राहण्याची काळजी करू नकोस. परत जाताना आम्ही तुला आमच्याबरोबर खाली घेऊन जाऊ,’ असं सांगून त्याला थांबवून घेतलं

दोन दिवसांत बरा झाल्यावर, आमच्या टीमचा सदस्य असावा अशा पद्धतीनं तो आमच्यात मिसळून गेला. त्या १६-१७ वर्षांच्या मुलाचं नाव होतं टेकराज अधिकारी. लाडानं सगळे त्याला ‘कांचा’ म्हणत. कांचा म्हणजे नेपाळी भाषेत लहान भाऊ. म्हणून आम्हीही त्याला कांचा असं संबोधू लागलो.

साधा चहाही करू न शकणारा कांचा, त्याच्यावर सोपवलेली सगळी कामं, अवघ्या आठवड्या-दोन आठवड्यांत शिकला. आमच्या टीम-मेम्बर्सना जमू न शकणारं वॉकीटॉकी चालवण्याचं कामही तो शिकला. ‘‘तू इतक्या कोवळ्या वयात पोर्टर का झालास,’’ असं त्याला बोलता बोलता विचारलं असता त्याचं उत्तर होतं : ‘‘माओवादी होण्यापेक्षा पोर्टर होणं बरं आहे!’’

सन २००१ मध्ये नेपाळ हा देश अत्यंत अस्थिर होता. तिथं माओवाद्यांचा प्रभाव वाढत होता. कोवळ्या वयातल्या आणि कमी शिकलेल्या मुलांना ते चळवळीत ओढत असत. त्यांची उपयुक्तता संपल्यावर त्यांना ठार मारायलाही कमी करत नसत. या सर्व त्रासापासून कांचाला दूर ठेवण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला गावातील लोकांबरोबर पोर्टर म्हणून उत्तरकाशीला पाठवलं होतं. आमच्या मोहिमेतील काम संपल्यावर, पुढचं काम मिळालं तर ठीक, नाहीतर कांचा गावाकडे परत जाणार होता. त्याला पुन्हा अडचणीत टाकण्यापेक्षा, त्याला पुण्याला घेऊन यावं, असा विचार माझ्या मनात आला. मात्र, ‘कोण कुठला हा मुलगा, कशाला नसती उठाठेव करतोस...’ असं माझे सहकारी मला म्हणाले. मी मात्र ठाम होतो.

मला कांचा आंतर्बाह्य कळला होता. गिर्यारोहणाची हीच तर खासियत आहे. १५-२० दिवस पर्वतांत एकत्र राहिल्यावर माणसाचे स्वभाव उघडे पडतात. कोण कसा आहे हे ताबडतोब कळतं. मला कांचा कळला होता. मी माझ्या मतावर ठाम होतो. तरीदेखील, एकदा उत्तरकाशीला गेल्यावर कांचाच्या घरी फोनवर बोलू व निर्णय घेऊ असं ठरवलं. तोपर्यंत मी पुण्यात ‘माझ्या राहत्या घराच्या सोसायटीत रात्रपाळीचा वॉचमन’ ही नोकरी कांचासाठी पक्की केली होती.

आम्ही उत्तरकाशीला येऊन त्याच्या घरी फोन करण्याच्या बेतात असतानाच नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. नेपाळचे राजे बीरेंद्र यांची व त्यांच्या कुटुंबातील इतर नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण देशात अराजक माजलं, त्यामुळे कांचाच्या गावाशी संपर्क तुटला आणि कांचा आमच्याबरोबर पुण्याला आला. कांचाच्या नवीन आयुष्याची ही सुरुवात होती. रात्री आमच्या सोसायटीत वॉचमन म्हणून काम करणं, दिवसा माझ्या कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम करणं अशी दुहेरी भूमिका तो सहज पार पाडू लागला.

यादरम्यान आम्ही कांचाच्या घरी सातत्यानं पत्रव्यवहार सुरू ठेवला होता. कधीतरी एखादं पत्र कांचाच्या घरी मिळेल आणि त्यांचा फोन येईल या प्रतीक्षेत आम्ही सलग आठ महिने अविरतपणे पत्र पाठवणं सुरूच ठेवलं. शेवटी, एक दिवस भारताच्या सीमेलगतच्या भागातून आम्हाला फोन आला. नेपाळमधून काही मैल पायपीट करत कांचाचे वडील भारताच्या सीमेवर फक्त फोन करण्यासाठी आले होते. ते मला फोन वर म्हणाले : ‘‘मी आता फक्त त्याचा नामधारी वडील आहे, त्याचे खरे पालक तुम्हीच.’’ त्यांच्या या बोलण्यानं कांचा पुण्यातच स्थायिक होणार हे निश्चित झालं.

‘गिरिप्रेमी’मुळे कांचावर गिर्यारोहणाचे चांगले संस्कार घडले. त्यानंही ते मन लावून आत्मसात केले. ‘गिरिप्रेमी’ची मोहीम निघाली की कांचा मोहिमेत असणारच हे ठरूनच गेलेलं होतं. त्यानं ‘माऊंट सुदर्शन’, ‘माऊंट जॉनली’, ‘माऊंट नून’ अशा भारतीय हिमालयातील अत्यंत अवघड शिखरांवर चढाई केली.

हिमालयात अती उंचीवर असलेल्या ‘जुमला’ या भागात जन्मलेला ‘हिमालयपुत्र’ होता तो! कांचाला डोंगर-दऱ्यांची, पर्वतशिखरांची गोडी लागली नसती, असं शक्यच नव्हतं. त्यामुळे सन २०१२ मध्ये जेव्हा ‘गिरिप्रेमी’नं एव्हरेस्ट मोहीम आयोजित केली तेव्हा त्या संघात त्याचा समावेश पक्का होता. माझा विश्वास सार्थ ठरवत ता. १९ मे २०१२ रोजी ‘गिरिप्रेमी’च्या इतर सात साथीदारांबरोबर त्यानंदेखील भारताचा तिरंगा जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर फडकवला. दहा वर्षांपूर्वी मालवाहू पोर्टर म्हणून काम करणारा कांचा आता ‘एव्हरेस्ट शिखरवीर’ झाला होता.

विजीगीषु वृत्ती व कष्ट उपसण्याची तयारी यांमुळे कांचाचं जीवनच बदलून गेलं. कांचा ‘क्विक लर्नर’ होता. फक्त नववी पास असलेल्या या मुलाने पुण्यात आल्यावर ‘नेपाळी-इंग्रजी’ असं भाषांतराचं पुस्तक आणून ती भाषा आत्मसात केली. तांत्रिक बाबी तर तो सहजच शिकायचा. त्याची कौशल्यं बघून कांचाला पुण्यातील एका प्रसिद्ध सायकलविक्रेत्या ब्रॅंडकडे ‘SAP तांत्रिक सहाय्यक’ म्हणून नोकरीही मिळाली. आज त्याचा ट्रेकिंग कंपनीचा व्यवसाय आहे. कांचा आता पक्का पुणेकर आहे. तो मराठी अस्खलित बोलतो. तो जन्मानं महाराष्ट्रीय नसून नेपाळी आहे यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, इतकं अस्खलित!

कळत-नकळत का होईना, टेकराज अधिकारी ऊर्फ कांचा याच्या रूपानं ‘हिमालयपुत्र सह्याद्रीचा पुत्र’ झाला एवढं मात्र नक्की.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

loading image