Himalaya
HimalayaSakal

अनुभव अष्टहजारी अष्टाध्यायातला...

गिर्यारोहणातील सर्वोच्च आव्हानांपैकी एक म्हणजे माउंट एव्हरेस्ट; जगातील सर्वांत उंच शिखर. माउंट एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न न पाहणारा गिर्यारोहक विरळाच.

गिर्यारोहणातील सर्वोच्च आव्हानांपैकी एक म्हणजे माउंट एव्हरेस्ट; जगातील सर्वांत उंच शिखर. माउंट एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न न पाहणारा गिर्यारोहक विरळाच. आम्ही गिरिप्रेमींनी पाहिलेले एव्हरेस्टचे स्वप्न २०१२ मध्ये सत्यात उतरविण्यात यश आले. आम्ही जेव्हा एव्हरेस्ट चढाई यशस्वी केली तेव्हा आम्हाला सर्वांनी एकच प्रश्न विचारला, एव्हरेस्ट झाले आता पुढे काय?

एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे व या शिखरावर चढाई यशस्वी करणे आव्हानात्मक आहे, हे मान्य. मात्र एव्हरेस्ट एवढीच किंबहुना त्याहून अधिक आव्हानात्मक शिखरं हिमालयात वसलेली आहेत. यात अष्टहजारी शिखरांचा प्रामुख्याने समावेश होतो. अष्टहजारी शिखरे म्हणजे ज्या शिखरांची उंची ही आठ हजार मीटरपेक्षा अधिक आहे. अशी जगात १४ शिखरे आहेत. ही सर्व शिखरे हिमालयातच वसलेली आहेत. या अष्टहजारी शिखरांचा बॉलगेमच वेगळा असतो. आठ हजार मीटर उंची म्हणजे डेथ झोनची सुरवात. इतक्या उंचीवर असते ती हाडे गोठवणारी थंडी, उणे ३० ते ४० अंश तपमान, प्रतितास ६० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वाहणारा वारा आणि हवेतील प्राणवायूचे प्रमाण केवळ १ ते २ टक्के. इतक्या आव्हानात्मक परिस्थितीशी तोंड देत चढाई करणे म्हणजे खरंतर अशक्यप्रायच.

जगातील काही अवलियांनी हे आव्हान स्वीकारले व सर्व १४ अष्टहजारी शिखरांवर चढाई केली. जगात अशी कामगिरी करणाऱ्या केवळ ५० व्यक्ती आहेत, यात भारतीय व्यक्ती एकही नाही. त्यामुळे जेव्हा एव्हरेस्टनंतर काय असा प्रश्न विचारला गेला तेव्हा आपसूकच उत्तर होते इतर अष्टहजारी शिखरे.

२०१२ च्या एव्हरेस्ट चढाईनंतर आजपर्यंत गिरिप्रेमीच्या शिलेदारांनी माउंट ल्होत्से (जगातील चौथे उंच शिखर), माउंट मकालू (जगातील पाचवे उंच शिखर), माउंट च्यो ओयू (जगातील सहावे उंच शिखर), माउंट धौलागिरी (जगातील सातवे उंच शिखर), माउंट मनासलू (जगातील आठवे उंच शिखर), माउंट कांचनजुंगा (जगातील तिसरे उंच शिखर) व माउंट अन्नपूर्णा (जगातील दहावे उंच शिखर) अशा १४ पैकी आठ शिखरांवर यशस्वी चढाई करून भारताचा तिरंगा फडकविला. या आठही मोहिमांचे नेतृत्व मला करण्यास मिळाले, याचा मला आनंद आहे. या आठही मोहिमांदरम्यान व्यतीत केलेल्या ‘हिमालयातील दिवसां’नी मला प्रगल्भ बनवले.

२०१३ मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर साक्षात रेन्होल्ड मेस्नर यांच्याशी भेट झाली. सर्व १४ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करण्याची कामगिरी करणारे मेस्नर म्हणजे गिर्यारोहण क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांची भेट एव्हरेस्ट बेस कॅम्पसारख्या गिर्यारोहकांच्या पंढरीत व्हावी, या पेक्षा दुग्धशर्करा योग दुसरा कुठलाच नाही.

याच अष्टहजारी शिखर मोहिमांच्या प्रवासात जगातील सहावे उंच शिखर माउंट च्यो ओयू या शिखरावरील मोहिमेत आलेले अनुभव हे आम्हा सर्वांसाठीच नवीन होते. च्यो ओयू हे शिखर चीनच्या अधिपत्याखाली असलेल्या तिबेटमध्ये वसलेले आहे. या शिखरावर चढाई करण्यासाठी आम्हाला चीन सरकारकडून लवकर परवानगी मिळाली नाही. अगदी शेवटच्या क्षणी व्हिसा मंजूर झाला. संपूर्ण तिबेटच्या प्रवासात एक वेगळाच रुक्षपणा जाणवला. तोच हिमालय, तीच माणसं, तरी देखील थोडासा दुरावा वाटला, नेहमीच आपलेपणा यात नव्हता. सतत कोणीतरी पाळत ठेवतंय, असे सतत वाटायचे. मोहीम संपल्यावर आम्हाला भारताचे वेध लागले होते.

याउलट अनुभव आम्हाला कांचनजुंगा मोहिमेच्या वेळी आले. भारत- नेपाळच्या सीमेवर वसलेल्या कांचनजुंगा शिखरावर गिरिप्रेमीच्या १० गिर्यारोहकांनी २०१९ मध्ये यशस्वी चढाई केली. कांचनजुंगा शिखरावर यशस्वी होणारी ही सर्वांत मोठी मोहीम होती. या संपूर्ण आंतरराष्ट्रीय मोहिमेचे अघोषित नेतृत्व गिरिप्रेमी करत होती. जेव्हा मोहीम संपली, तेव्हा बेस कॅम्प सोडवत नव्हता. त्या पर्वताशी, तेथील निसर्गाशी एक अनामिक नाते जडले होते. पण गिर्यारोहणात भावनिकतेला वस्तुनिष्ठतेपुढे ठेवून चालत नाही. मोहीम संपली की पर्वताचा निरोप हा घ्यावाच लागतो, डोळ्यात कितीही अश्रू आले तरी. अष्टहजारी मोहिमा यशस्वी होताना आम्ही सर्वांनीच वेगवेगळे चित्रविचित्र अनुभव घेतले.

२०१३ ला जेव्हा आशिष माने जगातील चौथे उंच शिखर असलेल्या माउंट ल्होत्से शिखरमाथ्यापासून काही मीटर अंतरावर होता, तेव्हा त्याच्यासमोर अवघड प्रश्न उभा राहिला. शिखरमाथ्याच्या काही मीटर खाली एक अरुंद घळ आहे, या घळीतून वाट काढतच मार्गस्थ व्हावे लागते. या घळीच्या एका टोकाला एका गिर्यारोहकाचा मृतदेह दोराला लटकलेला होता. आधीच्या वर्षी खराब हवामानामुळे या गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. घळ ओलांडून वर जायचे असेल तर या मृतदेहाला ओलांडून, त्याचा आधार घेऊनच चढाई करावी लागणार होती. आशिषचे मन धजावत नव्हते. काही क्षण तो तिथेच थांबला, शेवटी मात्र मृतदेहाच्या पाया पडून, मनात माफी मागून त्याचाच आधार घेत तो वर चढला.

असाच काहीसा प्रसंग २०१६ साली प्रसाद जोशीने देखील अनुभवला. जगातील सातवे उंच शिखर असलेल्या माउंट धौलागिरीवर चढाई करण्यासाठी प्रसादला खूप झुंजावे लागले. प्रचंड हिमवृष्टीमुळे चढाई मार्ग धूसर झाला होता.

नेमकं शिखरमाथा कधी येतोय याचा अंदाज येत नव्हता. प्रसादच्या मनात मात्र शिखरमाथा आला आहे, हे ओळखण्याची खूण मनात पक्की होती, ती खूण म्हणजे एका इराणी गिर्यारोहकाचा मृतदेह. २००९ साली एका इराणी गिर्यारोहकाचा माउंट धौलागिरी शिखरमाथ्यावर मृत्यू झाला. तेव्हापासून त्याचा मृतदेह तिथेच आहे. आजूबाजूला सर्व हिम असल्याने मृतदेहाचे फारसे विघटन झालेले नाही. इतक्या उंचीवरून मृतदेह खाली आणणे देखील कठीण आहे. म्हणून २००९ पासून हा मृतदेह तसाच आहे. गेल्या काही वर्षात हा मृतदेह दिसला म्हणजे शिखरमाथा आला, असा संकेत तयार झाला आहे. प्रसादला जेव्हा पहिल्यांदा हा मृतदेह दिसला तेव्हा हायसे वाटले, कारण त्याने शिखर गाठले होते. मृतदेह बघून हायसे वाटणे हा किती विचित्र संयोग आहे. तरीही गिर्यारोहकांना आपल्या भावनांना आवर घालून पुढे जावे लागते. असे एक ना अनेक गोड व कटू प्रसंग आम्ही या अष्टहजारी शिखर मोहिमांदरम्यान अनुभवले. शिखर चढाईचा आनंद असतो, मोहिमेच्या यशस्वी झाल्याचा आनंद असतोच मात्र सोबतीला आयुष्य प्रगल्भ बनविणारे अनुभव देखील बरेच काही शिकवून जातात.

(सदराचे लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com