‘दिवस माउंट एव्हरेस्ट’चा!

मानवजातीच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना २९ मे १९५३, बरोबर ६९ वर्षांपूर्वी घडली...
umesh zirpe writes about Mount Everest highest peak of world
umesh zirpe writes about Mount Everest highest peak of worldsakal

मानवजातीच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी घटना २९ मे १९५३, बरोबर ६९ वर्षांपूर्वी घडली. याच दिवशी सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांच्या रूपाने मानवाचं पहिलं पाऊल ‘माउंट एव्हरेस्ट’ या जगातील सर्वोच्च शिखरावर पडलं. एव्हरेस्ट म्हणजे खरं तर पृथ्वीचा तिसरा ध्रुवच. या एव्हरेस्टचं वलय हे सर्वश्रुत आहे. जगातील असंख्य लोकांना एकदा तरी या माउंट एव्हरेस्टचं ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन घ्यायचं असतं. अनेकांना माउंट एव्हरेस्टच्या शिखरमाथ्याचं, जगातील सर्वोच्च शिखरावरून दिसणाऱ्या दृश्याबद्दल कुतूहल असतं, तर अनेक ध्येयवेड्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखर चढाई करण्याचा ध्यास असतो. हा ध्यास गेल्या शंभर वर्षांत अनेकांनी घेतला, त्यांतील काही हजार लोकांचं स्वप्न पूर्णदेखील झालं. काहींना अर्ध्यातून परतावं लागलं, तर काही जणांनी एव्हरेस्टच्या कुशीतच चिरनिद्रा घेतली. गेल्या सात दशकांत एव्हरेस्टने अनेक स्थित्यंतरं पाहिली. एका मोसमात बोटांवर मोजण्याइतक्या गिर्यारोहकांनी शिखरमाथा गाठला, तर तीन वर्षांपूर्वी शिखरमाथ्याच्या खाली चक्क गिर्यारोहकांची लांबच लांब रांग पाहायला मिळाली. आजपर्यंत अंदाजे ७ ते ८ हजार गिर्यारोहकांनी किमान एकदा एव्हरेस्ट शिखरमाथा गाठला आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा अतिशय कमी आहे. मात्र, यात दरवर्षी १० टक्क्यांनी भर पडतेय. नेपाळ सरकार सुमारे ३०० ते ४०० गिर्यारोहकांना एव्हरेस्ट चढाईचा परवाना देतं. या गिर्यारोहकांसोबत किमान एक शेर्पा गिर्यारोहक एव्हरेस्ट शिखरमाथा गाठतो. म्हणजे अंदाजे ७०० गिर्यारोहक एव्हरेस्ट शिखर चढाई करतात. दरवर्षी १० टक्क्यांची भर हा आकडा तसा मोठाच आहे.

८८४८.४६ मीटर उंच एव्हरेस्ट शिखर
८८४८.४६ मीटर उंच एव्हरेस्ट शिखरsakal

८८४८.४६ मीटर उंच असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्याची आव्हानं ही खडतरच आहेत. अनेक वेळा एव्हरेस्ट शिखर चढाई केलेले, एव्हरेस्ट चढाईचा मार्ग अंगवळणी पडलेले शेर्पा गिर्यारोहकदेखील बेस कॅम्पपासून कॅम्प १ च्या चढाईमार्गावर असलेल्या खुम्बू आइसफॉलमधून जाताना-येताना देवाचा धावा करतात. तसंच, कितीही अनुभवी गिर्यारोहक असो वा नवखा; शिखरमाथ्याच्या आधी हिलरी स्टेपवरून चढाई करताना धडकी ही भरतेच. आठ हजार मीटर उंचीपेक्षा वर गेल्यावर हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण विरळ होत जातं. थंडी तर हाडं गोठवणारी असते. सोबतीला जोरात वाहणारा वारा तुम्हाला स्थिर उभं राहू देत नाही. हिमवृष्टी तर या उंचीवर नित्याचीच... त्यामुळे एव्हरेस्ट चढाई ही आव्हानात्मक आहेच. १९५३ असो वा २०२२; एव्हरेस्ट शिखर चढाई ही तेवढीच परीक्षा पाहते. आजच्या काळात अत्याधुनिक संसाधनांमुळे व तगड्या शेर्पा सपोर्टमुळे शिखर चढाई गिर्यारोहकांना आवाक्यात वाटते आहे, एवढंच. २१ वेळा एव्हरेस्ट चढाई यशस्वी केलेल्या व एकेकाळी सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट चढाईचा विक्रम नावावर असलेल्या आपा शेर्पाच्या मते तर एव्हरेस्ट शिखरमाथ्याजवळ त्यामानाने कमी हिम पाहायला मिळतो आहे, त्यामुळे दगड उघडा पडतो व चढाई ही कठीण होते आहे. अशा ठिकाणी गिर्यारोहकांची तयारी महत्त्वाची ठरते, असं आपा शेर्पा सांगतात. तुम्ही कोणत्याही जाणत्या गिर्यारोहकाला विचारा, ते हेच सांगतील, की एव्हरेस्ट चढाई ही मनःशांतीसाठी करतात. एव्हरेस्ट चढाईचं स्वप्न बघितल्यापासून ते शिखरमाथा गाठून खाली सुखरूप परत येईपर्यंतचा संपूर्ण प्रवास हा रोमांचकारी असतो. आम्हीदेखील हा प्रवास २०१२ व २०१३ मध्ये अनुभवला आहे. २०१२ मध्ये भारतातील सर्वांत मोठी नागरी मोहीम घेऊन आम्ही एव्हरेस्टचं ध्येय ठेवलं होतं. २०१२ मध्ये ८, तर २०१३ मध्ये ३ गिर्यारोहकांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकाविला आहे. आम्ही इथंच थांबलो नाही, त्यानंतर इतर अष्टहजारी शिखरं व भारतीय हिमालयातील अनेक शिखरांना गवसणी घातली. आज गिरिप्रेमींमध्ये एकूण १२ एव्हरेस्ट शिखरवीर आहेत. आम्ही सर्वच जण गिर्यारोहण व साहस शालेय मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत रुजावं, यासाठी प्रयत्नशील असतो. आम्ही गिर्यारोहक साहसाचे, त्यातून मिळणाऱ्या आनंदाचे प्रचारक म्हणून काम करत असतो. ‘गिर्यारोहणातून, साहसातून आनंद’ या ज्येष्ठ-श्रेष्ठांनी घालून दिलेल्या संकल्पनेवर आम्ही काम करत आहोत. मात्र, या संकल्पनेला गेल्या काही काळात तडे जाताना दिसत आहेत व गिर्यारोहण ही जगतासाठी धोक्याची घंटा आहे, असं मला वाटतं.

नेपाळ सरकारच्या अर्थव्यवस्थेची ‘कॅश काऊ’ ही एव्हरेस्ट आहे. प्रत्येक चढाईमागे नेपाळ सरकार ११ हजार अमेरिकन डॉलर परवाना शुल्क घेतं. एव्हरेस्ट किंवा इतर अष्टहजारी शिखरांवर चढाई करण्यासाठी शेर्पा एजन्सीज हवा तो ‘सपोर्ट’ देतात, फक्त चांगले पैसे मोजण्याची तुमची तयारी हवी. गरम पाणी, ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक अशी सर्व काही सेवा तुम्हाला उपलब्ध असते, त्यामुळे एव्हरेस्ट चढाई ही काही अंशी पर्यटन स्वरूपाची झाली आहे, असा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच काही गिर्यारोहकांना हा चढाईचा आनंद, स्वतःच्या क्षमतांना आव्हान देऊन स्वतःला स्वतःशी सिद्ध करणं अशा गिर्यारोहणातील तत्त्वांशी काही घेणं-देणं उरलं नाही. काहीही करून एव्हरेस्ट चढाई करायची, त्यात कमी वेळेत चढाई, अमक्या देशातील, राज्यातील, शहरातील, समाजातील पहिला चढाई करणारा, अशी बिरुदं मिळवून, मानमरातब हवा आहे, त्यातून प्रसिद्धी हवी आहे, त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. आपल्‍या कामाचं कौतुक होणं, पाठीवर थाप मिळविणं यात काही गैर नाही, मात्र फक्त काहीतरी लाभासाठी अट्टहास करून एव्हरेस्ट चढाई करणं, हे सर्वस्वी चुकीचं आहे. आज जगभरात काही चढाईवीर असे आहेत, ज्यांनी एव्हरेस्ट चढाई केली व त्याच्या पुण्याईवर अक्षरशः दुकान थाटलं. भारतीय हिमालयात तुलनेने अनेक कमी उंचीची, पण चढाईच्या दृष्टीने अतिशय खडतर व एव्हरेस्टच्या पलीकडची शिखरं आहेत, त्या शिखरांकडे हे लोक ढुंकूनही पाहत नाहीत, याबद्दल एक गिर्यारोहक म्हणून खेद वाटतो. त्याउलट २६ वेळा एव्हरेस्ट चढाई यशस्वी करणारा कामी रिता शेर्पा जेव्हा एव्हरेस्ट व त्यावरील चढाईविषयी बोलतो, तेव्हा त्याच्या साधेपणामुळे, एव्हरेस्टविषयी असणाऱ्या त्याच्या श्रद्धेविषयी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. विश्वविक्रम आपल्या नावावर असूनही कसलाही अभिनिवेश तो दाखवत नाही. तो म्हणतो, ‘‘माझ्यासोबत असलेल्या गिर्यारोहकाला शिखर चढाई करेपर्यंत व पुन्हा खाली येईपर्यंत साथ देणं, हे माझं काम आहे.’’ त्याचा साधेपणा बघून तुम्ही आवाक झाल्याशिवाय रहात नाही.

२९ मे अर्थात ‘एव्हरेस्ट डे’ हा गिर्यारोहणासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. गिर्यारोहणजगताला याच घटनेमुळे कलाटणी मिळाली. नेपाळमध्ये हा दिवस एका सणापेक्षा कमी नसतो. दरवर्षी नेपाळमध्ये विशेषतः काठमांडूमध्ये मोठा जल्लोष असतो. विविध कार्यक्रम, सत्कार समारंभ, पुस्तक प्रकाशन इत्यादी कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. गेली दोन वर्षं कोरोना साथीमुळे हा जल्लोष करता आला नाही, त्यामुळे या वर्षीच्या ‘एव्हरेस्ट डे’ला मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे. दरवर्षी असंख्य गिर्यारोहक नवी स्वप्नं घेऊन एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी येतात. काहींना यश मिळतं, काही आल्या पावली परत जातात, तर काही इथंच समाधिस्थ होतात, कायमचंच. मात्र, सर्व जण एव्हरेस्टचं ‘एव्हरेस्ट’पण अबाधित ठेवण्यात हातभार लावतात. हा असा सिलसिला कायम राहावा, हीच जगन्मातेला अर्थात एव्हरेस्टला प्रार्थना!

एव्हरेस्ट मॅरेथॉन

दरवर्षी २९ मे रोजी एव्हरेस्ट दिनाचं औचित्य साधून ‘एव्हरेस्ट मॅरेथॉन’चं आयोजन केलं जातं. ५२८४ मीटरवर स्थिर एव्हरेस्ट बेस कॅम्पपासून ही मॅरेथॉन सुरू होते. सोलोखुंबू परिसरात विविध भागांमधून नामचे बाजारपर्यंत मॅरेथॉनचा मार्ग आखलेला असतो. ६० किलोमीटर लांबीची एक्स्ट्रीम अल्ट्रामॅरेथॉन, ४२ किलोमीटर लांबीची फूल मॅरेथॉन, तर २१ किलोमीटर लांबीची हाफ मॅरेथॉन अशा तीन विभागांत ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. देशविदेशांतील विविध स्पर्धक यात सहभागी होतात. २९ मे १९५३ रोजी एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम मानवी पाऊल ठेवून इतिहास रचला. त्यांच्या या कामगिरीला मानवंदना म्हणून ‘जगात सर्वांत उंच ठिकाणी आयोजित करण्यात येणारी मॅरेथॉन स्पर्धा’ असं बिरुद असणारी व तेनसिंग-हिलरी एव्हरेस्ट मॅरेथॉन असं नामकरण केलेली मॅरेथॉन स्पर्धा सुरू करण्यात आली.

पहिली एव्हरेस्ट चढाई १९२४ मध्येच?

१९२४ मध्ये ब्रिटिश एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान जॉर्ज मॅलरी व अँड्रयू एरव्हीन ही जोडगोळी एव्हरेस्ट शिखरमाथ्याजवळून गायब झाली. १९९९ मध्ये जेव्हा मॅलरी यांचा मृतदेह ८१०० मीटर उंचीवर सापडला, तेव्हा त्यांच्याकडे असणारी सर्व संसाधनं ७५ वर्षांनीही आहे त्या स्थितीतच होती. या जोडगोळीने एव्हरेस्ट चढाई केली होती व परतत असताना त्यांचा अपघात झाला, असं अनेकांचं आजही म्हणणं आहे. अर्थात, या दाव्यांना पुष्टी देणारा पुरावा आज तरी उपलब्ध नाही. मात्र, जेव्हा मॅलरी यांचा मृतदेह सापडला, तेव्हा त्यांच्या सोबत KODAK चा कॅमेरादेखील होता. मात्र, चिनी गिर्यारोहकांनी तो कॅमेरा गायब केला असं काहींचं म्हणणं आहे. कारण या कॅमेऱ्यातून मिळणाऱ्या छायाचित्रांतून एव्हरेस्ट चढाई यशस्वी झाल्याचं सिद्ध झालं असतं. मॅलरी व एरव्हीन यांनी उत्तर बाजूने म्हणजेच तिबेट-चीनच्या बाजूने चढाई केली होती. त्यांच्या यशस्वी चढाईमुळे १९६० मध्ये चीनने पहिल्यांदा उत्तर बाजूने केलेली एव्हरेस्ट चढाई झाकोळली गेली असती, म्हणून त्यांनी हा कॅमेरा जगासमोर आणलाच नाही, असं म्हटलं जातं.

व्हरेस्ट हवामान केंद्र

नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या तज्ज्ञ संघाने ‘जगातील सर्वांत उंच ठिकाणी असलेलं हवामान केंद्र’ उभारलं आहे. ८८३० मीटर उंचीवर, म्हणजे एव्हरेस्ट शिखरमाथ्याच्या काही मीटर खाली हे हवामान केंद्र असून, हवामानविषयक विविध नोंदी या केंद्रात नोंदविल्या जाणार आहेत. सौरऊर्जेवर चालणारं हे स्वयंचलित केंद्र असून हवेतील तापमान, वाऱ्याची दिशा व गती, हवेतील दाब, पृष्ठभागावरील हिमाचं प्रमाण इत्यादी बाबींची इत्थंभूत माहिती याद्वारे मिळणार आहे. यातून एव्हरेस्ट चढाई आणखी सुकर होण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com