प्रथा अशाही!

हिमालयाचं आणि माझं अतूट नातं आहे. माझ्यासाठी हिमालय म्हणजे मोठा भाऊच! वयाच्या तेराव्या वर्षी मी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या ट्रेकच्या निमित्तानं हिमालयात गेलो आणि हिमालयाचाच झालो.
Kanchenjunga Mountain
Kanchenjunga MountainSakal

हिमालयाचं आणि माझं अतूट नातं आहे. माझ्यासाठी हिमालय म्हणजे मोठा भाऊच! वयाच्या तेराव्या वर्षी मी ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ या ट्रेकच्या निमित्तानं हिमालयात गेलो आणि हिमालयाचाच झालो. गेल्या चाळीस वर्षांत एव्हरेस्टसह इतर पन्नासहून अधिक हिमशिखरांवरील मोहिमांच्या निमित्तानं नियमितपणे हिमालयाच्या सान्निध्यात-संपर्कात आहे. हिमालयानं मला गिर्यारोहणाबरोबरच काय दिलं असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मी आवर्जून सांगतो : ‘हिमालयानं मला आयुष्याचे विविध दृष्टिकोन आत्मसात करण्यास मदत केली. हिमालयातील डोंगर-दऱ्यांनी, हिमशिखरांनी, निसर्गसंपदेनं, तिथं राहणाऱ्या माणसानं मला आयुष्य खऱ्या अर्थानं जगण्याची कला कळत-नकळत शिकवली. हिमालयातील अनुभवांनी माझं जगणं समृद्ध केलं.’ असाच एक अनुभव मी सन २०१७ ला नेपाळमध्ये घेतला.

‘गिरिप्रेमी’च्या सहाव्या अष्टहजारी मोहिमेच्या निमित्तानं मी माझ्या संघासोबत नेपाळमध्ये होतो. माऊंट मनास्लू या ८१५६ मीटर उंच - जगातील आठव्या उंच- शिखरावर आम्ही मोहिमेला निघालो होतो. मनास्लू हे शिखर तुलनेनं दुर्गम भागात आहे. १० दिवसांचा ट्रेक करत बेस कॅम्प गाठावा लागतो.

या दहा दिवसांच्या पायी प्रवासात अनेक लोक भेटले, त्यांचं आयुष्य, चाली-रीती जाणून घेण्याची संधी मिळाली. या प्रवासात सामदू नावाच्या गावाहून समागावकडे जात असताना रस्त्यात दोरची ग्याल्जेन यांच्या टी हाऊसमध्ये आमचा मुक्काम होता. टी हाऊस म्हणजे छोटेखानी हॉटेल. तिथं राहण्या-खाण्याची व्यवस्था केलेली असते. अगदी पारंपरिक शेर्पा पद्धतीनं हे टी हाऊस तयार केलेलं असतं. तिथं राहण्याचा अनुभव हा अतिशय समृद्ध असतो. प्रत्येक वेळी मोहिमेला निघालो की एखाद्या तरी छान अशा टी हाऊसमध्ये मुक्काम ठरलेलाच असतो. अशाच टी हाऊसमध्ये आम्ही दाखल झालो. पायपीट करून थकलो होतो.

Nepal Tea House
Nepal Tea HouseSakal

तिथं पोहोचताच ग्ल्याल्जेन यांनी आम्हाला ‘शेर्पा टी’ नावाचं अद्भुत रसायन प्यायला दिलं. मी पाच-सहा वर्षांपूर्वी शेर्पा टी पहिल्यांदा प्यायला होता, तेव्हापासून मी या चहाच्या प्रेमात पडलो आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यात हा चहा आग्रह करून तीन-चार कप तरी पाजला जातो. तशी प्रथाच शेर्पा समाजात आहे. तुम्ही हा चहा एकदाच घेतलात तर किंवा चहा घेण्यास नकार दिलात तर यजमान शेर्पा कुटुंब नाराज होतं. त्यामुळे मन तृप्त होईपर्यंत हा चहा प्यावाच लागतो. या चहात दूध व पाण्याबरोबरच कमी प्रमाणात चहापावडर, थोडंसं मीठ, त्यात चंपा व ‘नाक’च्या (स्त्रीलिंगी ‘याक’) दुधाचं बटर/लोणी घातलं जातं. या सर्व मिश्रणापासून अत्यंत चविष्ट चहा तयार होतो. हिमालयात गेल्यावर तर मी हाच चहा पितो. या मिश्रणाचा उष्मांक अधिक असतो. अतिथंडीच्या ठिकाणी शरीरातील तापमानाचा समतोल राखण्यासाठी या पेयाचा उपयोग होतो, म्हणून सर्वच गिर्यारोहक ‘शेर्पा टी’ अगदी आनंदानं पितात. मलादेखील या ‘शेर्पा टी’नं भुरळ घातली आहे.

याच मनास्लू मोहिमेच्या बेस कॅम्पच्या प्रवासात आणखी एक विलक्षण अनुभव आम्ही घेतला. मनास्लू हे शिखर मुस्तांग-मनांग या दुर्गम भागात आहे. हा भाग तिबेटला अगदी लागून आहे. सन १९५०- ६० च्या दशकात तिबेटमध्ये झालेल्या उठावानंतर असंख्य तिबेटी लोक भारत-नेपाळमध्ये हिमालयाच्या खिंडीतून दाखल झाले. त्यातील काही मुस्तांग-मनांग भागात वसले. त्यांची संस्कृती-खानपान, राहणीमान मूळ नेपाळी लोकांपेक्षा वेगळं आहे. त्यांच्या काही प्रथा तर खूपच वेगळ्या आहेत.

या प्रवासामध्ये आम्हाला असंख्य गिधाडं नजरेस पडली होती. या बेदरकार पक्ष्याकडे बघताच धडकी भरते. हे पक्षी इतक्या दुर्गम भागात एवढ्या मोठ्या संख्येनं का असावेत हा प्रश्न आम्हाला सर्वांना पडला होता. यावर आमच्याबरोबर असलेल्या दोरची शेर्पानं सांगितलं ते असं : ‘या भागात जी लोकवस्ती व गावं आहेत तिथं एक अनोखी प्रथा आहे. जर माणूस म्हातारपणानं अथवा आजारानं मृत्यू पावला तर त्याचा अंत्यविधी दहनाद्वारे केला जातो. मात्र, एखादी धडधाकट व्यक्ती काही कारणानं वारली तर तिचा मृतदेह स्वच्छ धुतला जातो, शरीराचे छोटे छोटे तुकडे केले जातात व हे तुकडे स्मशानभूमीत, म्हणजे एका मोकळ्या जागी, टाकले जातात. तिथं सर्व गिधाडं या मानवी शरीराचे तुकडे खाण्यासाठी जमतात. हा सर्व विधी संपूर्ण गाव एका ठिकाणी उभं राहून बघतं.’

हे सर्व ऐकून माझ्या अंगावर शहारा आला. क्षणभर भीतीदेखील वाटली. मात्र, या प्रथेमागील भावना समजल्यानंतर या स्थानिक लोकांविषयीचा आदर आणखी वाढला. धडधाकट मृत व्यक्तीचं जर दहन केलं अथवा दफन केलं तर त्याच्या शरीराचा निसर्गाला थेट उपयोग कमी होतो. त्याऐवजी मांसावर जगणाऱ्या गिधाडासारख्या पक्ष्याला ते खायला घातलं तर त्याचा उपयोग, या नष्ट होत जाणाऱ्या पक्ष्याच्या प्रजातीला होईल, अशी प्रामाणिक भावना या प्रथेमागं होती. बौद्ध धर्मातून मिळालेल्या भूतदयेच्या शिकवणुकीचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं.

अशा एक ना अनेक प्रथा, परंपरा, संस्कृती इत्यादी मी गेली तीसहून अधिक वर्षं अनुभवत आलो आहे. यात काही चांगले प्रसंग आहेत, काही वाईट घटना आहेत, काही विलक्षण माणसं आहेत, काही अचंबित करणाऱ्या घटना आहेत, गिर्यारोहणाचा, शिखरचढाईचा थरार, रोमांच तर आहेच...या सर्व गोष्टी मला हिमालयानं-गिर्यारोहणानं शिकवल्या. माझ्या लेखी गिर्यारोहण ही खऱ्या अर्थानं जीवनशैलीच आहे. मला आलेले अनुभव, रंजक कथा ‘हिमालयातील दिवस’ या सदरातून मी तुम्हाला या आठवड्यापासून सांगणार आहे. तिकडच्या जगण्याची कला सांगणाऱ्या प्रथा या पहिल्या भागात मी तुम्हाला सांगितल्या. पुढच्या भागांमध्ये साहस, धाडस यांबरोबरच हिमालय व त्याचे बहुरंगी पैलू गिर्यारोहकाच्या नजरेतून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीन.

(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com