esakal | यतीची गोष्ट!
sakal

बोलून बातमी शोधा

Yeti

यतीची गोष्ट!

sakal_logo
By
उमेश झिरपे

विस्तीर्ण पसरलेला हिमालय म्हणजे घनदाट जंगलांचं, दुर्गम हिमशिखरांचं, मानवी अस्तित्वाचा गंधही नसलेल्या हिमनद्यांचं माहेरघर! हिमालयात अशा अनेक जागा आहेत, जिथं आजतागायत मानवाचं पाऊल पडलेलं नाही. या जागांनी, तिथं अस्तित्वात असलेल्या सजीव सृष्टीनं, झाडा-फुलांनी अनेक रहस्यमय गोष्टी आपल्या पोटात दडवून ठेवलेल्या आहेत. या गूढ गोष्टींची उकल कधी होईल हे माहीत नाही. मात्र, यातून निर्माण होणाऱ्या अनेक रहस्यमय व तेवढ्याच रंजक गोष्टींची रसभरीत चर्चा आजही अनेक जण अत्यंत आवडीनं करत असतात. यातील मी अनुभवलेली सर्वात रंजक व रहस्यमय गोष्ट आहे ती ‘यती’ची!

ते वर्ष होतं १९८८. उत्तरकाशी येथील ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग’ इथून गिर्यारोहणाचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण करून मी ‘माऊंट थेलू’या गंगोत्री हिमालयातील सहा हजार मीटर उंचीवरील पर्वतशिखरावर मोहिमेसाठी गेलो होतो. माझा गिर्यारोहणक्षेत्रातील गुरू व जवळचा मित्र अविनाश फौजदार यानं ‘माऊंट सुदर्शन’या ६५२९ मीटर उंच व चढाईसाठी अत्यंत कठीण असलेल्या शिखरावर नैर्ऋत्य धारेनं चढाई करण्याचं ठरवलं होतं.

या मार्गाचा अभ्यास करण्यासाठी मी थेलू शिखरमोहीम करावी असं ठरलं. थेलूशिखर हे सुदर्शनशिखराच्या अत्यंत जवळ असून शिखरमाथ्यावरून सुदर्शनशिखराच्या नैर्ऋत्य धारेचा अंदाज घेता येतो, छायाचित्रं काढता येतात. त्यामुळे मी स्थानिक गाईड प्रेमसिंग रावत याला सोबतीला घेऊन मोहिमेसाठी निघालो. रक्तवर्ण ग्लेशिअरवर आम्ही बेस कॅम्प लावून पुढील चढाई करणार होतो. त्या संपूर्ण परिसरात आमच्या दोघांशिवाय चिटपाखरूदेखील नव्हतं. नीरव शांतता होती.

आम्ही आमच्या तंबूत झोपलो होतो. मात्र, त्या वेळी अचानक विचित्र आवाज ऐकू येऊ लागला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं; पण तो आवाज काही थांबेना. कुणीतरी आहे असंच वाटू लागलं. आमच्याशिवाय तिथं कुणीच नव्हतं. नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी मी प्रेमसिंगला उठवलं. त्यालाही तो आवाज ऐकू आला. त्या आवाजानं तो चांगलाच घाबरला. इथं कुणीतरी ‘सुपरनॅचरल’ शक्ती आहे, असं त्याला वाटू लागलं. कुणीतरी काल्पनिक प्राणी, महाकाय व मायावी शक्ती असलेला कुणीतरी इथं आला असेल...याआधी या भागात मृत्युमुखी पडलेल्या गिर्यारोहकांचा आत्माही असेल...असे बरेच अंदाज त्यानं वर्तवले. त्या अंदाजांना दुजोरा देणाऱ्या कथादेखील त्यानं सांगितल्या. त्यात सगळ्यात रंजक गोष्ट होती ती म्हणजे यतीची! हिमालयाच्या दुर्गम भागात राहणारा, अक्राळविक्राळ दिसणारा केसाळ प्राणी...‘सुपरह्युमन!’

हा यतीच असा आवाज काढत असेल असं प्रेमसिंगला वाटत होतं. पुराणात जसे काल्पनिक प्राणी वर्णिलेले असतात अगदी तसाच. हिमालयातील स्थानिक लोकांची अशा काल्पनिक गोष्टींवर अगाध श्रद्धा व विश्वास असतो. प्रेमसिंगही त्याला अपवाद नव्हता. माझा मात्र अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास नव्हता; पण प्रेमसिंगनं सांगितलेले किस्से ऐकल्यावर मीदेखील विचार करू लागलो. खरंच असतील का अशा अद्भुत शक्ती? की कुणाचा आत्मा असेल? की खरंच यती आला असेल? अशा एक ना अनेक विचारांनी माझ्या मनात घर करण्यास सुरुवात केली.

मात्र भूत, अद्भुत शक्ती, आत्मा किंवा यतीसारखा सुपरह्युमन असं काही नसतंच असा माझा सकारात्मक दृष्टिकोन मला सांगत राहिला. तसं असतं तर आपल्याला कधीतरी दिसलंच असतं काहीतरी. या दोन टोकांच्या विचारांच्या द्वंद्वात माझी रात्र कशी निघून गेली हे कळलंच नाही. त्या दिवशीचे विचार जरी तिथंच थांबले असले तरी यतीनं मात्र माझ्यातील कुतूहल चांगलंच जागवलं होतं.

हा यती म्हणजे कल्पोलकल्पित असलेला महाकाय प्राणी, अगदी मानवासारखा दिसणारा...तो दहा-वीस फूट उंच असतो...अती उंचीवर राहतो आणि त्याच्याकडे कदाचित अद्भुत शक्तीही आहेत असा समज आहे. मात्र, आजपर्यंत हा प्राणी कधी कुणी पाहिलेला नाही. म्हणजे ‘आम्हाला यती दिसला,’ असे दावे अनेक केले जातात...मात्र, त्याच्या अस्तित्वाचा कोणताही शास्त्रीय पुरावा आजपर्यंत तरी कुणाला सिद्ध करता आलेला नाही...पावलांचे ठसे वगळता! ‘पावलांचे ठसे दिसले म्हणजे यती असावा,’ या एका तर्कावर यतीचा शोध सुरू आहे. या शोधमोहिमेची मुहूर्तमेढ रोवली ‘माऊंट एव्हरेस्ट एक्स्प्लोरर’ एरिक शिप्टन यांनी. माऊंट एव्हरेस्टवर जाण्याचा मार्ग शोधण्याच्या कामात शिप्टन यांचा मोठा वाटा आहे. गिर्यारोहणक्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेले शिप्टन यांनी सन १९५१ मध्ये एक छायाचित्र प्रसिद्ध केलं. मानवाच्या तळव्याला असलेल्या अंगठ्याप्रमाणे दिसणारा, मात्र आकारानं अतिशयच मोठा असा ठसा त्यांना दिसला.

त्याचा तुलनात्मक ‘प्रचंड’पणा समजण्यासाठी शेजारी आईस ॲक्स ठेवून काढलेलं छायाचित्र त्यांनी प्रसिद्ध केलं व ‘हा ठसा यतीचा तर नाही ना!’ अशी शक्यताही बोलून दाखवली. आता शिप्टन यांच्यासारखा दिग्गज असं म्हणतो आहे म्हटल्यावर, यतीच्या अस्तित्वाबद्दल जगभर चर्चा होणं स्वाभाविकच होतं. त्यामुळे यतीचा शोध घेण्याची अनेकांची सुप्त इच्छा जागृत झाली. सन १९५०-६० च्या दशकांत तर ‘यती शोधायचाच!’ या महत्त्वाकांक्षेनं अनेकांनी जंग जंग पछाडलं होतं. त्यासाठी १९५४ मध्ये ‘डेली मेल’ या ब्रिटिश वृत्तपत्रानं, आजच्या काळात दहा कोटी रुपये होतील, इतका खर्च तेव्हा करून यतीची शोधमोहीम आखली होती. नेपाळ-तिबेट सीमेवर मकालू-बरून व्हॅलीमध्ये तब्बल ३७५ पोर्टर्सना घेऊन इतर शंभरहून अधिक प्राणितज्ज्ञ, पत्रकार, गिर्यारोहक यांचा ताफा घेऊन ही मोहीम आयोजिली गेली होती. तब्बल १५ आठवड्यांच्या शोधानंतरही त्यांच्या हाती काहीच लागलं नाही.

अमेरिकी संशोधक डॅनियल टेलर यांनी आयुष्याची ६० वर्षं यतीचं रहस्य उलगडण्यात घालवली. भारतीय हिमालयात बालपण घालवलेले टेलर यांना अगदी सुरुवातीपासूनच यतीचा शोध घेण्याच्या ध्येयानं झपाटलं होतं. सहा दशकं शोध घेऊनही, अथक् परिश्रम करूनही त्याच्यासुद्धा हाती ठोस असं काही लागलं नाही. शिप्टन किंवा इतरांना दिसलेले पावलाचे ठसे हे आशियाई काळ्या अस्वलाचे असावेत असा टेलर यांचा दावा होता, तसंच भारतीय करडं अस्वल व ध्रुवीय अस्वलाचा हिमालयीन प्रकार यांच्या संकरातून तयार झालेला महाकाय प्राणी म्हणजेच यती असं अनेकांचं म्हणणं होतं. टेलर यांच्या अभ्यासातून त्यांचा निष्कर्ष असा होता, ‘आशियाई काळ्या अस्वलाचे ठसे म्हणजेच लोकांना वाटलेले यतीचे ठसे आहेत.’ या काळ्या अस्वलाचं अधिक आक्रमक, महाकाय रूप म्हणजे यती असावा, असं त्यांना वाटे.

आजही इतक्या वर्षांनंतर यती हे एक अजून गूढच आहे. अती उंचीवर मानवी पावलांसारखे दिसणारे अतिशय मोठे ठसे हे कधीतरी कुणाला तरी आढळतात अन् मग पुन्हा यतीच्या चर्चा झडू लागतात. यती असेल तर, त्याच्या पावलांचे ठसे असतील तर मग यती आजतागायत कुणाला दिसला का नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. यतीच्या ठशांचं रहस्य यात भरच घालत राहतं. मात्र, असंही असू शकतं की, हिमालयातील मोहिमांमध्ये हिमातून चालत असताना जेव्हा गिर्यारोहकांच्या बुटांचे ठसे हिमावर उमटतात तेव्हा ते ठसे पुढं जोरात वाहणाऱ्या वाऱ्यांनी प्रसरण पावतात. त्यामुळे त्यांचा आकार हा दुपटीनं अथवा तिपटीनं वाढतो. असे प्रसरण पावलेले ठसे दिसले की, हे ठसे यतीचेच आहेत, असा अनेकांचा समज होतो. ‘यती आहे’ असं ठशांवरून मानणाऱ्या गटाबरोबरच ‘यती खरोखर दिसला’ असं मानणाराही मोठा गट आहे.

मात्र, यामागं वेगळी शास्त्रीय कारणं आहेत असं मला वाटतं. आपण जेव्हा अती उंचीवर जातो तेव्हा हवेतील प्राणवायूचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा तुलनेनं कमी होतो. यातून हॅल्युसिनेशन, म्हणजे विविध प्रकारचे भास होणं, ही शक्यता निर्माण होते. अती उंचीवर गेल्यावर गिर्यारोहकांना अनेकदा असे भास झालेले मी स्वतः अनुभवलेले आहेत. अगदी जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तंबूच्या फडफडण्याचा आवाजदेखील शिट्टीसारखा भासतो. या हॅल्युसिनेशनमुळेच अनेकांना यती ‘दिसला’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही!

यती खरंच आहे का, या प्रश्नाचं ठाम उत्तर कुणाकडंच नाही. मात्र, यतीचं रहस्य हे मानवाला कायमच खुणावत आलेलं आहे. अगदी एव्हरेस्टवर पहिलं मानवी पाऊल ठेवणाऱ्या द्वयीपैकी एक असलेले एडमंड हिलरी, दिग्गज गिर्यारोहक रेन्होल्ड मेस्नर यांसारख्या गिर्यारोहकांनीही यतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हिमालयात राहणारे स्थानिक लोक काही अजब वा चमत्कारिक घडलं तर ‘ते यतीनं केलं असेल’ असं मानतात. माझ्या लेखी मात्र ‘यती’चं अस्तित्व हे गूढ कथांपुरतं किंवा मोहिमेदरम्यान होणाऱ्या मनोरंजनापुरतंच. हिमालय हा गूढ आहेच, त्याच्या पोतडीतून अनेक गोष्टी बाहेर पडायच्या अद्याप बाकी आहेत. यतीदेखील त्यातलाच एक असेल तर तो जगासमोर येईलच. तोपर्यंत मात्र तो विषय रंजक चर्चांपुरताच!

(सदराचे लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)

loading image