पुरुषांनो, स्वत:च घर सोडण्याची आहे का हिंमत?

ऊर्मिला देवेन
रविवार, 8 सप्टेंबर 2019

राणी, आमच्या सर्वांची लाडकी. लग्नाच्या बोहल्यावर मला तिचं बालपण आठवत होतं. माझ्या लग्नात मलाच बोलली होती, ‘ताई तू आता घर सोडून जाशील, तू तुझं घर सोडतेस, मला नाही जमणार हं..’ आणि म्हणाली होती, ‘मला नाही लग्न करायचं..

राणी, आमच्या सर्वांची लाडकी. लग्नाच्या बोहल्यावर मला तिचं बालपण आठवत होतं. माझ्या लग्नात मलाच बोलली होती, ‘ताई तू आता घर सोडून जाशील, तू तुझं घर सोडतेस, मला नाही जमणार हं..’ आणि म्हणाली होती, ‘मला नाही लग्न करायचं.. माझ्या आईबाबांचं घर मी का सोडणार? कोण तो नवरा मुलगा, येईल ना माझ्याच घरी राहायला.. तो तर मुलगा असतो ना, त्यानं घर सोडावं..’ आणि आज तीच घर सोडून जाणार होती. पाठवणीच्या वेळी माझ्याकडे अक्षदा लावायला आली आणि मिस्कीलपणे म्हणाली, ‘ताई, आज माझा टर्न आहे ना, घर सोडून जाण्याचा..’ मीही तिच्या डोक्‍यावर हात ठेवत म्हटलं, ‘हो तुझाही टर्न आला, हा टर्न कुणालाच चुकत नाही राणी.. ही हिंमत नैसर्गिक आणि पारंपरिक आहे. मुलीच हिंमत करू शकतात, एक घर सोडून दुसऱ्या घराला आपलंसं करण्याची.’

मनात वाटलं किती पिढ्यांपासून फक्त मुलीच हिंमत करतात ना, आईबाबांच राहत घर सोडून नवीन घरात पाय ठेवण्याची. आधीच्या काळात मुली पाठवणीच्या वेळी खूप रडायच्या. आता जरा कमी झालंय. पण, घर सोडून जाण्याची पद्धत मात्र तीच. मुख्य म्हणजे आपण ती आजही खूप रीतीभातीने करतो. लग्नाच्या एवढ्या मोठ्या आनंदात ती एकच रीत असते, जेव्हा प्रत्येक मुलीचे डोळे थोडे तरी पाणावतात. पण, तरीही ती माघार घेत नाही. खूप हिमतीने एका घराचा उंबरठा ओलांडून ती दुसऱ्या नवीन घरात पाऊल ठेवते. 

घरी परत येताना माहेर वाटेत लागलं. म्हटलं थोडा वेळ माहेरी घालवावा. माहेरच्या गोष्टीत रमलेच होते, तोच नवरोबाचा मेसेज आला, ‘निघायचं नाही आहे का? जायला वेळ होईल.’ मीही भानावर आले. पटापट तयारीला लागले. अर्ध्या तासात घरी जायला तयार. आईने खूप आग्रह केला थांबण्यासाठी. पण मला वाटलं, यांचं उद्या ऑफिस, मुलींची शाळा. आणि समोरून नवरोबा इशारे करत होता ते वेगळंच. मी म्हटलं, ‘नाही आई, आता नाही, सावकाश येते नंतर.’

महिन्याभराने, सासूकडे जाण्याचा योग आला. शेजारी वास्तुशांती होती. संध्याकाळपर्यंत परत येण्याचा प्लॅन होता. नवऱ्याने सकाळपासून नुसती घाई लावली होती निघण्याची. आम्ही अगदीच वेळेवर पोचलो आणि सगळं चारपर्यंत संपलं होत. मी दिवाणखान्यात मुलींसोबत निघण्याची तयारी करत होते आणि हे आतल्या खोलीत आईशी बोलत होते. एक तास झाला तरी बाहेर येण्याचं नाव नाही. मग मीही तोच फंडा लावला, मेसेज केला.. समोरून उत्तर आलं, ‘थांब ना.. किती दिवसांनी आलो.. कळत नाही तुला?’ आता सात वाजले. पण, रावांचा काही मूड दिसत नव्हता निघण्याचा. मी परत म्हटलं तर उत्तर भेटलं, ‘माझं राहत घर आहे हे, माझं बालपण, तरुणपण इथेच गेलं. आता नोकरीसाठी बाहेर असतो, पण मनात हेच घर आहे माझ्या आणि तू असं मला इथून निघण्यासाठी घाई करतेस.’

आठ वाजले अंधार झाला होता, नवरोबा जवळ आले, ‘आता निघायचं का? मी म्हणाले, इथे कितीतरी वेळा येतो, पण प्रत्येक वेळेस तुमचं काही ना काही कारण असतं इथून न निघण्याचं. ‘लगेच महिन्याआधीचा त्यांचाच मॅसेज दाखवला आणि म्हटलं, ‘तुम्ही आता तयारीला लागले ना तर सकाळ होईल. अर्ध्या तासात तयार व्हायला तुम्ही मी होऊच शकत नाही. आणि घरातून तुमचा पाय का निघत नाही हे मी समजू शकते. पण, तो पाय काढण्याची हिंमत कुठल्याच जन्मात पुरुषांत तरी येणार नाही.’

मैत्रिणींनो, जगात सर्वांत जास्त हिंमत फक्त स्त्रीतच असते. जी आपल्यांना सोडून परक्‍यांना जवळ करू शकते... ‘ती जग जिंकू शकते.’

बस.. जी हिंमत आईबाबांचं घर सोडताना आंतरिक मनातून येते, ती आयुष्य जगतानाही असू द्या. मग बघा तुमची हिंमत तोडण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila deven article about will man dare to leave his own house