

US Midterm Elections 2026 and Trump Political Setback
esakal
संदीप कामत - Twitter : @sankam
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मध्यावधी निवडणूक पूर्णपणे शोकांतिका ठरली आहे. सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सनी किमान सात नव्या जागा पटकावून ५४ विरुद्ध ४४ एवढ्या फरकाने स्पष्ट बहुमत कमावले. त्याचबरोबर खालच्या सभागृहात, म्हणजे ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्येही २० ते २५ जास्त जागा मिळवून डेमोक्रॅट्सनी २१८ विरुद्ध २१४ असे बहुमत मिळवले. दोन्ही सभागृहे ट्रम्प यांनी गमावलीच, त्याशिवाय एकूण सगळेच निकाल धक्कादायक लागले. या निकालाचे भारतासह जगावर काय परिणाम होतील, याचा घेतलेला वेध.
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये ट्रम्पविरोधी डेमोक्रॅट पक्षाने ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवला. ट्रम्प यांच्या दुसऱ्या पर्वातल्या चार वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यावर त्यांच्या पक्षाला मतदारांनी जोरदार फटकारले. या डेमोक्रॅट सुनामीला आता त्यांच्या निळ्या झेंड्यामुळे ‘ब्लुनामी’ म्हणून ओळखलं जातंय. या निवडणुकीत ट्रम्प यांची प्रतिष्ठा पणाला लागली होतीच, शिवाय अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क यांनी ४५ कोटीपेक्षा अधिक डॉलर लाल प्रचारासाठी, म्हणजे रिपब्लिकन पक्षासाठी ओतले होते. यातले अर्ध्याहून अधिक पैसे रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या टेक्सास राज्यात प्रचाराला वापरले गेले. तिथे तर चक्क ३८ वर्षांनी पहिल्यांदा डेमोक्रॅट सिनेटर जेम्स टॅलारिको निवडून आले. तसेच कॅन्सस राज्यामध्ये तब्बल १९३२नंतर, म्हणजे अगदी ९४ वर्षांनी पहिल्यांदा डेमोक्रॅट सिनेटर निवडून आले. याशिवाय साउथ आणि नॉर्थ कॅरोलिना, आयोवा, ओहायो, आणि मेन या ‘लाल’ राज्यांतही सिनेटच्या जागा ‘निळ्या’ होऊन पलटल्या. ओहायोच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीत ट्रम्प समर्थक विवेक रामास्वामी यांना मोठा पराभव सहन करावा लागला. काही मतदारसंघात तर २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ट्रम्प यांना मिळालेली मते २० टक्क्यांपर्यंत खाली घसरली. यामुळे गेली अनेक वर्षे तराजूच्या पारड्यात असलेल्या वरिष्ठ सभागृहात, म्हणजे सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सनी किमान सात नव्या जागा पटकावून ५४ विरुद्ध ४४ एवढ्या फरकाने स्पष्ट बहुमत कमावले. त्याचबरोबर खालच्या सभागृहात, म्हणजे ‘हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्येही २० ते २५ जास्त जागा मिळवून डेमोक्रॅट्सनी २१८ विरुद्ध २१४ असे बहुमत मिळवले. दोन्ही सभागृहे ट्रम्प यांनी तर गमावलीच, त्याशिवाय एकूण सगळेच निकाल धक्कादायक लागले. गेल्या काही वर्षात ट्रम्प यांच्या मेक अमेरिका ग्रेट अगेन (मागा) चळवळीमुळे अमेरिकी राजकारण पुन्हा ख्रिस्ती-श्वेतवर्णीय प्रधान होत आहे असे वाटत असतानाच टेक्सासमध्ये पहिली हिस्पॅनिक महिला गव्हर्नर, जॉर्जियामध्ये पहिली कृष्णवर्णीय महिला गव्हर्नर आणि देशातील पहिले मुस्लिम सिनेटर अशा ऐतिहासिक विजयांनी हा निकाल अधिक ठळक झाला.